फराह मलिक भानजी : भारतातील सर्वात श्रीमंत मुस्लिम महिला

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
फराह मलिक भानजी
फराह मलिक भानजी

 

भक्ती चाळक 

तुम्ही आजवर जगातील सर्वात अमीर माणूस इलॉन मस्क किंवा आपल्या देशातील मुकेश अंबानी यांच्या श्रीमंतीच्या अनेक गोष्टी ऐकल्या असतील. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या भारतामधील सर्वात श्रीमंत मुस्लिम महिला कोण आहे? ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तब्बल २६ हजार कोटींच्या बिझनेस साम्राज्याची धुरा सांभाळणाऱ्या 'मेट्रो ब्रँड'च्या मॅनेजिंग डायरेक्टर फराह मलिक भानजी आहेत. अब्जाधीश रफिक मलिक यांच्या त्या सुकन्या.

आजच्या घडीला फराह भानजी या देशातील लाखो महिलांसाठी सक्षमीकरणाचा चालता-बोलता आदर्श आहेत. त्यांचे आजोबा मलिक तेजानी यांनी १९५५ मध्ये 'मेट्रो शूज'ची पहिली पायरी रचली होती. आज त्याच वारशाला फराह यांनी आपल्या अफाट प्रयत्नाने नव्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. चला तर मग जाणून घेऊया या अष्टपैलू महिला नेतृत्वाचा कुलाब्याच्या कॅश काउंटरपासून सुरू झालेला प्रवास!
 

सिनेमा हॉलवरून पडलं नाव अन् सुरू झाला मेट्रोचा प्रवास
जुना काळ मोठा मजेशीर होता. त्या काळी फुटवेअरचे विक्रेते आपल्या दुकानांची नावं प्रसिद्ध सिनेमा हॉलवरून ठेवत असत. फराह मलिक सांगतात, “त्याकाळी मुंबईच्या एमजी रोडवर मेट्रो नावाचे चित्रपटगृह होतं. त्या नावावरून आमच्या आजोबांनी आपल्या ब्रँडला 'मेट्रो' हे नाव दिलं.”

फराह यांचे आजोबा सुरुवातीला मुंबईच्या ग्रँट रोडवरील एका चपलांच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करायचे. नंतर त्यांनी कुलाबा इथं छोटं लाँड्रीचं दुकान घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि तिथून 'मेट्रो शूज'ची सुरुवात झाली.

त्या काळी लोकांची मनं जिंकण्यावर आणि ग्राहकांशी थेट नातं जोडण्यावर व्यवसायाचं यश अवलंबून होतं. फराह जुन्या आठवणींना उजाळा देत सांगतात, “मला वाटतं माझ्या आजोबांना ४० वेगवेगळ्या भाषांमध्ये 'हॅलो' कसं म्हणायचं हे माहीत होतं. त्यामुळे आमचं दुकान प्रसिद्ध झालं.”

लोक मुंबईत यायचे, तेव्हा मेट्रो, कला निकेतन आणि चिराग दिन या तीन ब्रँड्सना नक्की भेट द्यायचे. त्या काळातील बॉलिवूडचे दिग्गज कलाकार,  मग ते अमिताभ बच्चन असोत, गोविंदा असोत की जया बच्चन हे सर्वजण आवर्जून कुलाब्याच्या या दुकानात येत असत.
 

साडी पाहून ठरत होती चपलांची किंमत
मोठ्या संख्येने येणाऱ्या एअर होस्टेस आणि पारसी ग्राहकांमुळे या कुटुंबाला फॅशनची खरी नाडी सापडली. गंमत म्हणजे, त्या सुरुवातीच्या काळात दुकानात मालाचे दर आजच्यासारखे छापील किंवा ठरलेले नसायचे. चपलांची किंमत दुकानात आलेल्या महिलेने कोणती साडी नेसली आहे, यावर ठरायची! जर ती शिफॉन किंवा कॉटनची महागडी साडी असेल, तर त्यानुसार किंमत सांगितली जायची.

आजोबांनंतर फराह यांचे वडील रफिक मलिक या व्यवसायात आले. त्यांनी कामाची सुरुवात थेट दुकानाच्या वरच्या भागातून म्हणजेच माळ्यावरून केली. म्हणजे चपलांच्या साठवणुकीच्या खोलीतून. फराह यांच्या मते, “ग्राहकाला नक्की काय हवं आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं होतं आणि वर असणारी ती व्यक्ती ग्राहकाच्या पसंतीचा अंदाज घेण्यात तज्ज्ञ असते.” तिथून पुढे जात, रफिक मलिक यांनी ब्रँडचा विस्तार करत त्याचं राष्ट्रीय ब्रँडमध्ये रूपांतरण केलं.

गणिताची आवड अन् बिजनेसचं डिजिटायझेशन
अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासमधून गणितात पदवी घेतलेल्या फराह यांना सुरुवातीला कौटुंबिक व्यवसायात येण्याची अजिबात इच्छा नव्हती. फराह सांगतात, “माझी खरी आवड गणित आणि फायनान्समध्ये होती. पण मी इथे आले, तेव्हा मला जाणवलं की मला या कामात मजा येतीय आणि मी रोज नवनवीन गोष्टी शिकतीय.  आणि त्यानंतर मी या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला.”

२००० मध्ये फराह यांनी व्यवसायात पाऊल ठेवलं, तेव्हा डिजिटायझेशन नुकतंच सुरू झालं होतं. त्यांनी बारकोडिंग पद्धत लागू करून मालसाठ्यावर मॅन्युअल ऐवजी डिजिटल नियंत्रण सुरु केलं. तिसऱ्या पिढीतील उद्योजक आणि त्यातही एक स्त्री म्हणून काम करताना सुरुवातीला सप्लायरशी बोलणं अवघड जायचं. पुरुषप्रधान क्षेत्रात आदर मिळवणं हे मोठं आव्हान होतं. परंतु, वडिलांनी दिलेल्या स्वातंत्र्यामुळे त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. 

 
फराह सांगतात, “माझ्या वडिलांनी आम्हाला नेहमी चुका करण्याची परवानगी दिली. ते नेहमी म्हणायचे की, “आपण त्या चुकांमधून शिकतो आणि पुढे जातो. परंतु त्याच चुका पुन्हा पुन्हा करायच्या नाहीत.” फराह यांच्या धोरणामुळे २०१० मध्ये १०० स्टोअर्सची कंपनी आज भारतभर ८०० पेक्षा जास्त स्टोअर्सचं अवाढव्य नेटवर्क बनली आहे.

दुकानाचा मॅनेजरच आहे खरा मालक
मेट्रो ब्रँड्सची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची नैतिक मूल्यं. ते कस्टमर डिलाइट (ग्राहकाचा आनंद) या तत्त्वावर काम करतात. त्यांच्या प्रत्येक शाखेत स्वतः मालक बसू शकत नाही, म्हणूनच फराह यांच्या वडिलांनी अनोखं मॅनेजमेंट मॉडेल तयार केलं. आजतागायत मेट्रोचे सगळे मॅनेजर्स पूर्णपणे कमिशन शेअरवर काम करतात, त्यांना कोणताही ठराविक पगार मिळत नाही. 

फराह अभिमानाने सांगतात, “आमचे सर्व मॅनेजर्स संस्थेच्या आतूनच मॅनेजर पदापर्यंत पोहोचले आहेत, आम्ही बाहेरून थेट भरती करत नाही. ७०० हून अधिक मॅनेजर्स याच पद्धतीने लहानाचे मोठे झाले आहेत.” दुकानात 'स्टॉक बॉय' म्हणून कामाला लागलेल्या सामान्य कर्मचाऱ्याला थेट मालकासारखे निर्णय घेण्याचे अधिकार मिळणं, हे आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणाचं उत्तम उदाहरण आहे.

आता जमाना AI चा!
काळ बदलला तरी स्टोअरमधील ग्राहकांचा प्रत्यक्ष अनुभव हीच मेट्रोची खरी ताकद आहे. परंतु बॅक-एंडला मात्र फराह यांनी तंत्रज्ञानाची मोठी जोड दिली आहे. आज त्यांच्या सिस्टीममध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि डेटा ॲनालिटिक्सचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. कोणतं प्रॉडक्ट कोणत्या स्टोअरमध्ये जास्त विकलं जाईल, हे मशिनद्वारे ठरवलं जातं. चॅटजीपीटी आणि बिझनेस एआय सारख्या सिस्टीमचा अभ्यास करून त्या या व्यवसायात बदल करत आहेत. बदलत्या काळाशी जुळवून घेणं हाच यशाचा एकमेव मार्ग असल्याचं फराह सांगतात.

लोकांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचा ध्यास
तीन मुलांची आई, एक खंबीर पत्नी आणि यशस्वी उद्योजिका अशा सर्व भूमिका फराह अत्यंत कौशल्याने सांभाळत आहेत. निसर्गाच्या सानिध्यात राहणं, थ्रोबॉल खेळणं आणि एखाद्या तलावाच्या काठी वेळ घालनणं त्यांना आवडतं.  
 

व्यवसायापलीकडे जाऊन लोकांचं जीवन सुधारणं आणि प्रत्येकाला आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं करणं हेच त्यांच्या आयुष्याचं मुख्य ध्येय आहे. फराह म्हणतात, “आज आमचं ध्येय प्रत्येकाला त्यांच्या पायावर उभं करणं हे आहे. माझ्या आयुष्यात मला खूप काही मिळालं आहे आणि मला ते समाजाला पुढं द्यायचं आहे.”

भविष्यात कुटुंबातलं कोणी या व्यवसायात उतरो न उतरो, पण तरी पुढील १०० वर्षं हा व्यवसाय टिकून राहील असं भक्कम नियोजन फराह आजच करत आहेत. वडिलांनी दिलेल्या एका सुवर्णसल्ल्याचं त्या नेहमी पालन करतात. त्यांचे वडील नेहमी सांगायचे की,  “तुमचा दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. आयुष्य तुमच्यावर अनपेक्षित संकटं टाकत राहील, परंतु तुमच्यासोबत जे घडतं ते केवळ १०% असतं आणि ९०% ही तुमची त्यावर असणारी प्रतिक्रिया असते. तुम्ही संकटांना कशा प्रकारे तोंड देता, यावर सर्व अवलंबून असतं.” 

कौटुंबिक व्यवसाय पुढे नेण्याची जबाबदारी घरची मुलगीही उचलू शकते हा मोठा प्रेरणादायी संदेश फराह मलिक भानजी यांच्या या प्रवासातून मिळतो. 

कुलाब्याच्या एका छोट्याशा चपलांच्या दुकानापासून सुरू झालेला हा प्रवास आज हजारो कोटींच्या अवाढव्य साम्राज्यात बदलला आहे, तो केवळ जिद्द, दूरदृष्टी आणि बदलत्या काळाची पावले ओळखण्याच्या क्षमतेमुळे. फराह मलिक भानजी या केवळ देशातील सर्वात श्रीमंत मुस्लिम महिलाच नाहीत, तर त्या एका प्रगल्भ, आधुनिक आणि संवेदनशील नेतृत्वाचे चालते-बोलते उदाहरण आहेत. 

योग्य दृष्टिकोन, शिक्षणाची जोड आणि संकटांना धैर्याने सामोरे जाण्याची हिंमत असेल, तर यशाला कोणतीही सीमा नसते, हीच शिकवण फराह यांच्या या प्रेरणादायी प्रवासातून मिळते. स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभ्या राहून हजारो लोकांना रोजगाराच्या माध्यमातून सक्षम करणाऱ्या फराह भानजी यांची ही यशोगाथा, खऱ्या अर्थाने प्रत्येक स्त्रीला आकाशात उंच भरारी घेण्याची आणि स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची ताकद देणारी आहे. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter