जमीयत उलेमा महाराष्ट्रकडून सर्वधर्मीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची घोषणा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 6 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

अल्फिया शेख 

आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही होतकरू विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, यासाठी जमीयत उलेमा महाराष्ट्रच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या मुफ्ती किफायतुल्लाह मेमोरियल ट्रस्टने शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ साठी मोठ्या शैक्षणिक शिष्यवृत्तीची घोषणा केली आहे. याअंतर्गत उच्च शिक्षणापर्यंतच्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाणार असून, शिक्षणाच्या माध्यमाची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही.

कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी 'शहीद आझमी शिष्यवृत्ती' 

कायद्याचे शिक्षण घेऊन समाजात न्यायासाठी लढा देऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी संस्थेने विशेष तरतूद केली आहे. लॉ (LLB) चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'अॅडव्होकेट शहीद आझमी शिष्यवृत्ती' या नावाने विशेष मदत दिली जात आहे.

"पैशांअभावी कोणत्याही विद्यार्थ्याचे उच्च शिक्षण थांबू नये, हाच आमचा मुख्य उद्देश आहे," अशी माहिती संस्थेच्या एका पदाधिकाऱ्याने दिली.

लॉ (LLB) चे विद्यार्थी १५ जुलै २०२६ पर्यंत वेबसाईटवरून फॉर्म डाउनलोड करू शकतात आणि हे अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत २५ जुलै २०२६ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) निश्चित करण्यात आली आहे. यासोबतच पदव्युत्तर शिक्षण (Post-Graduation) आणि वैद्यकीय (Medical) अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.

सर्वधर्मीय विद्यार्थ्यांना घेता येणार स्कॉलरशिपचा लाभ

ही शिष्यवृत्ती केवळ महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी असून, यात जात किंवा धर्माचा कोणताही भेद केला जाणार नाही. मुस्लिम अर्जदारांना आपण जकात घेण्यास पात्र असल्याचे अर्जात नमूद करणे बंधनकारक आहे. तसेच, बिगर-मुस्लिम विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जकातीव्यतिरिक्त संस्थेच्या इतर फंडातून आर्थिक मदत पुरवली जाते.

या शिष्यवृत्तीचा लाभ एका कुटुंबातील केवळ एकाच विद्यार्थ्याला घेता येईल. शिष्यवृत्तीची मंजूर झालेली रक्कम रोख स्वरूपात न देता थेट संबंधित शाळा किंवा महाविद्यालयाच्या नावाने धनादेशाद्वारे (Cheque) दिली जाईल.

इच्छुक विद्यार्थ्यांनी www.jumaharashtra.com या वेबसाईटवरून अर्ज डाउनलोड करणे आवश्यक आहे. 

भरलेले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह मुफ्ती किफायतुल्लाह मेमोरियल ट्रस्ट, मुंबई (द्वारा: इमामवाडा कंपाउंड, इमामवाडा रोड, साबू सिद्दीक रुग्णालयासमोर, मुघल मशिदीजवळ, मुंबई, महाराष्ट्र-४००००९) येथे प्रत्यक्ष किंवा पोस्टाने जमा करावेत.

५ वी ते १२ वी च्या अर्जांची मुदत संपली 

ही शिष्यवृत्ती ५ वी ते १२ वी च्या शालेय विद्यार्थ्यांसाठीही दिली जाते. मात्र, चालू शैक्षणिक वर्षासाठी या विद्यार्थ्यांची अर्ज प्रक्रिया १० जून ते २५ जून २०२६ या कालावधीत राबवण्यात आली होती. हे अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत ६ जुलै २०२६ रोजी संपली आहे. त्यामुळे शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांनी आता शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू नयेत, असे आवाहन संस्थेने केले आहे.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter