काठमांडू
नेपाळ-तिबेट सीमेवर आलेली भयानक पूरस्थिती आणि हिमस्खलनामुळे त्रिशूल ३ए जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात नऊ दिवस अडकलेल्या दोन कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. संजय शाह आणि कबीर महर्जन अशी या दोन्ही कामगारांची नावे असून, त्यांना उपचारासाठी काठमांडू येथील लष्करी रुग्णालयात हेलिकॉप्टरने हलवण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात आलेल्या महापुरात सुमारे १३०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून, अद्यापही अनेकजण बेपत्ता आहेत.
बोगद्यामध्ये अडकलेल्या कामगारांच्या शोधासाठी बचाव पथकाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. बोगद्यात ऑक्सिजन पुरवणे आणि माती उपसण्याचे काम सुरू असतानाच बचाव पथकाला मानवी आवाजाची कुणकुण लागली. त्यानंतर केलेल्या अथक प्रयत्नांनंतर या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. नेपाळ विद्युत प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या मते, याच बोगद्यात अजूनही ३९ कामगार अडकले असण्याची दाट शक्यता असून त्यांच्या शोधमोहिमेला वेग देण्यात आला आहे.