नवी दिल्ली
फुकेतवरून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात झालेल्या भीषण टर्बुलन्स प्रकरणाच्या प्राथमिक अहवालातून मोठी माहिती समोर आली आहे. या विमानाचे पायलट प्राथमिक आणि पुष्टीकरणाच्या (confirmatory) ड्रग टेस्टमध्ये सायकोएक्टिव्ह सबस्टन्स (ड्रग्ज) सेवनासाठी 'नॉन-नेगेटिव्ह' आढळले आहेत. वैमानिकाकडून अशा पद्धतीचे सेवन करणे ही अत्यंत चिंतेची बाब असून, यादरम्यान नागरउड्यन महासंचालनालयाने (DGCA) प्राधान्याने योग्य ती कारवाई करावी, अशी शिफारस विमान अपघात तपास ब्युरोने (AAIB) केली आहे. या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू असून, अंतिम अहवाल योग्य वेळी प्रसिद्ध केला जाईल.
गेल्या ४ ऑगस्ट रोजी फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या 'AI2379' विमानाला अचानक ३०० फूट उंचीवरून खाली घसरल्यामुळे गंभीर टर्बुलन्सचा सामना करावा लागला होता. या दुर्घटनेत २० प्रवासी आणि ४ केबिन क्रू सदस्य जखमी झाले होते. सुरुवातीला एअर इंडियाने केवळ खराब हवामानामुळे हा प्रकार घडल्याचे म्हटले होते. मात्र, फ्रान्सच्या विमान उत्पादक कंपनीच्या अहवालानुसार, विमानाच्या हायड्रॉलिक प्रणालीतील दाब कमी झाल्यामुळे चार सेकंदांसाठी एलिव्हेटर आणि एयलेरॉनचे नियंत्रण सुटल्याचे स्पष्ट झाले होते.
तपास पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने बंगाल उपसागरावरून उड्डाण करून ओडिशा ओलांडल्यानंतर अवघ्या एका मिनिटात नऊ चेतावणी संदेश (warning messages) नोंदवले गेले होते. हायड्रॉलिक सिस्टीममधील कमी दाब, ऑटोपायलट डिस्कनेक्ट आणि लिफ्ट फ्लाईट-कंट्रोलमधील बिघाड नोंदवला गेला होता. याशिवाय, उड्डाणादरम्यान संबंधित पायलट कमीत कमी ३० ते ३५ मिनिटे झोपला होता, असेही सूत्रांनी सांगितले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत विमान वाहतूक प्राधिकरणाने कठोर कारवाईची तयारी सुरू केली आहे.