NEPAL FLOODS: मृतांचा आकडा १,१२७ वर पोहोचला; ४,८५८ नागरिक अद्यापही बेपत्ता

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
नेपाळमधील पुरामुळे भीषण परिस्थिती, शोध आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
नेपाळमधील पुरामुळे भीषण परिस्थिती, शोध आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

 

काठमांडू 

नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढून १,१२७ वर पोहोचली आहे. हिमालयात झालेल्या या दुर्घटनेला एक हप्ता लोटल्यानंतरही सुरक्षा यंत्रणा आणि बचाव पथके अद्यापही बेपत्ता असलेल्या हजारो लोकांच्या शोधामध्ये गुंतलेली आहेत, अशी माहिती नेपाळ पोलिसांनी बुधवारी दिली.

नेपाळ पोलिसांनी दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, चितवनमधून ३४८, पूर्व नवलपरासीमधून २१७, पश्चिम नवलपरासीमधून १९० आणि नुवाकोटमधून १५५ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच गोरखा, धाडीद, रसुवा आणि तनहू जिल्ह्यातूनही अनेक मृतदेह हाती लागले आहेत. आतापर्यंत १,११३ मृतदेहांचे शवविच्छेदन आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्यातील ९५ मृतदेह नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आले आहेत. बेपत्ता असलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना मदत व्हावी म्हणून ९११ अनोळखी मृतदेहांची माहिती नेपाळ पोलिसांच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आली आहे.

सुरक्षा दलांचे बचावकार्य आणि मदत मोहीम

पूरग्रस्त भागातून आतापर्यंत ६,५४१ लोकांची सुखरूप सुटका करण्यात आली असून, अजूनही ४,८५८ नागरिक बेपत्ता असल्यामुळे शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. मदत आणि बचावासाठी ७,९१२ पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. २६ ऑगस्ट रोजी नेपाळ-तिबेट सीमेवर झालेल्या बर्फ आणि खडक कोसळण्याच्या दुर्घटनेमुळे उत्तर आणि मध्य नेपाळमधील अनेक शहरांना महापुराचा फटका बसला होता.



Latest News