मुंबई
दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन (Disha Salian) हिच्या मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, गेल्या सहा वर्षांत पोलिसांनी एफआयआर का नोंदवला नाही, यावरून मुंबई पोलिसांच्या तपासावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. पोलिसांचा तपास प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी उलट अधिक प्रश्न निर्माण करणारा असल्याاचे न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायमूर्ती सारंग कोटवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह राजा भोसले यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी २०२० मध्ये घडलेल्या या घटनेच्या परिस्थितीवर संशय व्यक्त करत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दिशा सालियन ८ जून २०२० रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यूमुखी पडली होती. त्यावेळी पोलिसांनी केवळ अपमृत्यूची नोंद (ADR) केली होती. आता न्यायालयाने सर्व कागदपत्रे तातडीने सीबीआयकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत.
तपासाबाबत बोलताना न्यायालयाने म्हटले की, मृत मुलगी तोंडावर पडली असेल तर केवळ चिमणीवर एकच दुखापत कशी होऊ शकते आणि चेहऱ्यावर एकही हाड कसे फ्रॅक्चर झाले नाही, हे पटण्यासारखे नाही. घटनास्थळी रक्त न सापडल्याबद्दलही न्यायालयाने शंका उपस्थित केली. तसेच, जोपर्यंत तपासात ठोस पुरावे गोळा होत नाहीत, तोपर्यंत कोणालाही आरोपी मानले जाऊ नये, असे स्पष्ट करत सीबीआयला स्वतंत्र एफआयआर नोंदवून सतीश सालियन यांच्याशी चर्चा करण्याचे निर्देश दिले आहेत.