मुन्नी बेगम
कोर्टातील ती शिस्त, वकिलांचा तो काळा कोट, कायदा अन् दाव्यांची ती चकचकीत दुनिया. एका यशस्वी वकिलासाठी हे सर्व काही मिळवणे म्हणजे करिअरचे शिखर गाठण्यासारखे असते. पण हा सगळा थाटमाट, नाव आणि पैसा बाजूला ठेवून एखादी व्यक्ती पुन्हा खडू-फळ्याच्या जगात का परतेल? या प्रश्नाचे उत्तर गुवाहाटीच्या ज्येष्ठ विधिज्ञ शहनाझ रहमान यांच्या जीवनप्रवासात दडले आहे.
कोर्टाच्या पायऱ्या चढताना ज्यांनी नावलौकिक मिळवला, त्याच शहनाझ मॅडमसाठी वर्गातील फळा अन् विद्यार्थ्यांचे चेहरे हेच त्यांच्या जगण्याचे खरे ध्येय बनले. वकिलीने त्यांना ओळख दिली, पण शिक्षकी पेशाने त्यांच्या आयुष्याला खरा अर्थ दिला.
गुवाहाटीतील पंजाबारी येथील बिष्णुराम मेधी शासकीय विधी महाविद्यालयात त्या वरिष्ठ अधिवक्ता आणि व्याख्यात्या म्हणून कार्यरत आहेत. सोबतच त्या एक कुशल कायदेशीर मध्यस्थ (Legal Mediator) म्हणूनही ओळखल्या जातात. त्यांच्यासाठी अध्यापन ही केवळ एक नोकरी नसून आत्म्याचा आवाज आहे.
बालपणीचे स्वप्न
शहनाझ यांना लहानपणापासूनच शिक्षक व्हायचे होते. मनात हेच ध्येय ठेवून त्यांनी राज्यशास्त्र विषयात कॉटन कॉलेज (आताचे कॉटन युनिव्हर्सिटी) मधून पदवी पूर्ण केली. पुढे दिल्ली विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली. भविष्यात प्राध्यापक होता यावे, हाच पीएच.डी. करण्यामागचा मुख्य हेतू होता. याच काळात त्यांनी कायद्याची पदवी (LL.B.) सुद्धा पूर्ण केली.
पण आयुष्याचा पट नेहमी आपण आखतो तसाच चालतो असे नाही. पीएच.डी. पूर्ण होत असतानाच त्यांच्या वाटचालीला एक नवीन वळण मिळाले. त्या काळात अध्यापनाच्या संधी सहजासहजी उपलब्ध नव्हत्या. मोठ्या बहिणीच्या सल्ल्यानुसार त्यांनी कोर्टात वकिलीचा सराव सुरू केला. पाहता पाहता कायदेविश्वात त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, कोर्टाच्या गदारोळातही शिक्षिका बनण्याचे ते बालपणीचे स्वप्न त्यांच्या मनात पेटतच होते.
आपल्या या आठवणींना उजाळा देताना शहनाझ रहमान 'आवाझ - द व्हॉईस'शी बोलताना म्हणाल्या, "१९८८ मध्ये मला बी. बरुआ कॉलेजमध्ये अंशकालीन (Part-time) व्याख्याती म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पाठोपाठ, तत्कालीन शासकीय विधी महाविद्यालयाचे प्राचार्य हरेन कलिता यांनी मला अतिथी व्याख्याती म्हणून आमंत्रित केले. ही संधी मिळताच मी क्षणाचाही विचार न करता होकार दिला. तिथून माझा खरा प्रवास सुरू झाला. अतिथी व्याख्याती ते अंशकालीन आणि शेवटी १९९५ मध्ये मी शासकीय विधी महाविद्यालयात पूर्णवेळ व्याख्याती म्हणून रुजू झाले."
पुस्तकांपलीकडचे शिक्षण आणि कोर्टाचा अनुभव
दिवसा कोर्टात केस लढायच्या आणि संध्याकाळी वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना शिकवायचे, असा त्यांचा दिनक्रम सुरू झाला. दोन्ही क्षेत्रांची तुलना करताना त्यांना जाणवले की, वकिली हा व्यवसाय असू शकतो, पण अध्यापन ही त्यांच्या मनाची गरज आहे.
त्यांच्या या दुहेरी अनुभवाचा मोठा फायदा विद्यार्थ्यांना झाला. कायदा हा केवळ पुस्तकातला विषय नसून तो प्रत्यक्ष समाज आणि कोर्टाशी जोडलेला आहे. आपल्या प्रत्यक्ष अनुभवाच्या जोरावर त्यांनी विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे नेले. कोर्टातील प्रत्यक्ष कामकाज, कायदेशीर जागरूकता शिबिरे आणि प्रत्यक्ष केस हाताळणी या गोष्टी त्या विद्यार्थ्यांना अगदी सहज सोप्या भाषेत समजवून सांगू लागल्या. त्यांच्या मते, विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तके वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष परिस्थिती समजून घेतली की विषय अधिक खोलवर समजतो.
संकटाच्या काळात अध्यापन बनले संजीवनी
शहनाझ यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि भावूक टप्पा आला, जेव्हा त्या मेघालय सरकारसाठी सरकारी वकील म्हणून काम पाहत होत्या. अचानक त्यांच्या पतीचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. अवघ्या एका तासात त्यांच्या हसत्या-खेळत्या विश्वाचा चक्काचूर झाला. मनात दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना वकिलीसारख्या एकाग्रता आणि मानसिक ताकद मागणाऱ्या व्यवसायात लक्ष केंद्रित करणे त्यांना कठीण जाऊ लागले.
अशा अत्यंत कठीण प्रसंगात शिक्षकी पेशाने त्यांना पुन्हा सावरले. वर्गात जाणे, तरुण विद्यार्थ्यांशी बोलणे, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे या सगळ्यामुळे त्यांच्या मनातील दुःख हळूहळू हलके होऊ लागले.
आपल्या या कठीण काळाबद्दल सांगताना त्या भावूक होऊन म्हणाल्या, "पतीच्या निधनानंतर मी पार खचून गेले होते. पण या शिकवण्याच्या कामाने मला आई, मार्गदर्शक, मित्र आणि एका कुटुंबासारखा आधार दिला. विद्यार्थ्यांच्या सहवासात मी माझे दुःख काही काळासाठी विसरून जायचे. या कामाने मला जगण्याची नवी उमेद आणि ताकद दिली. म्हणूनच मी अध्यापनाला माझ्या आयुष्यातील एक प्रकारची थेरपी (उपचार) मानते."
विद्यार्थ्यांचे यश हीच खरी पावती
आज शहनाझ मॅडमचे अनेक माजी विद्यार्थी नामवंत वकील, न्यायाधीश आणि विविध क्षेत्रांत उच्च पदांवर कार्यरत आहेत. त्या अभिमानाने सांगतात, "जेव्हा एखादा माजी विद्यार्थी कोर्टात समोर येतो आणि सांगतो, 'मॅडम, मी तुमचा विद्यार्थी होतो', तेव्हा मनाला मिळणारा आनंद आणि अभिमान हा जगातल्या कोणत्याही मोठ्या पदापेक्षा किंवा पैशापेक्षा खूप मोठा असतो. विद्यार्थ्यांचे यश हीच एका शिक्षकाची खरी ओळख असते."
नवीन पिढीच्या विधी विद्यार्थ्यांना सल्ला देताना त्या म्हणतात, "नवीन मुलांनी नेहमी प्रामाणिकपणा, निष्ठा आणि जिद्दीने काम केले पाहिजे. अभ्यासात जितकी एकाग्रता हवी, तितकीच ती वकिलीच्या व्यवसायातही गरजेची आहे. फक्त एक चांगला वकील होण्यापेक्षा एक प्रामाणिक आणि विश्वासू वकील होणे जास्त महत्त्वाचे आहे."
तंत्रज्ञानाच्या युगात मूळ अभ्यासाचे महत्त्व
आजच्या डिजिटल युगात शिक्षणाची पद्धत बदलली आहे. ऑनलाइन माहितीचा साठा उपलब्ध आहे. पण, शहनाझ मॅडमच्या मते मूलभूत पुस्तके, मूळ कायदे, संशोधन आणि विश्लेषणाला कोणताही पर्याय नाही.
तंत्रज्ञानाचा वापर नक्कीच करावा, पण त्यावर पूर्णपणे अवलंबून राहू नये. विद्यार्थ्यांनी स्वतः पुस्तके वाचण्याची, कायदेशीर कागदपत्रे तयार करण्याची आणि स्वतःचे विचार मांडण्याची सवय कधीही सोडता कामा नये, असे त्या निक्षून सांगतात.
भविष्यातील निर्धार : शेवटच्या श्वासापर्यंत शिक्षण
भविष्यकालीन ध्येयाबद्दल बोलताना शहनाझ रहमान यांचा निर्धार अत्यंत पक्का दिसतो. त्या म्हणतात, "मी पुढे शिकवणार की नाही? हा माझ्यासाठी प्रश्नच नाही. कारण मी माझा निर्णय कधीच घेतला आहे. आता प्रश्न फक्त एवढाच आहे की मी कुठे आणि कसे शिकवत राहणार? उद्या जर मी या कॉलेजमध्ये नसेल, तरीही मी शिकवणे सोडणार नाही. खाजगी विद्यापीठे, ट्रेनिंग सेंटर्स किंवा इतर कोणत्याही माध्यमातून मी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत राहीन. जोपर्यंत शरीरात त्राण आहे, तोपर्यंत मी शिकवत राहीन."
वकिलीच्या क्षेत्राने शहनाझ रहमान यांना प्रतिष्ठा दिली, नाव दिले आणि ओळख दिली. पण अध्यापनाने त्यांना जगण्याचा खरा अर्थ दिला. जेव्हा आयुष्य त्यांना पूर्णपणे मोडून काढत होते, तेव्हा या वर्गाने त्यांना पुन्हा पायावर उभे केले.
शिक्षका दिनाच्या पूर्वसंध्येला शहनाझ यांची ही कथा आपल्याला एका सुंदर सत्याची आठवण करून देते, दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश पाडण्यासाठी आपण पेटवलेली छोटीशी वात, अनेकदा आपल्या स्वतःच्या अंधारलेल्या वाटेवरचा खरा दिवा ठरते.