अंदमानच्या समुद्रात सापडला नैसर्गिक वायूचा खजिना!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 7 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारताच्या ऊर्जा स्वावलंबनाच्या आणि अंतर्गत ऊर्जा सुरक्षेच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे. सरकारी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ऑइल इंडिया लिमिटेडने  अंदमानच्या समुद्रात दुसऱ्यांदा नैसर्गिक वायूचा मोठा साठा शोधून काढला आहे. या नव्या शोधामुळे आगामी काळात अंदमानचा हा सागरी भाग देशातील एक प्रमुख हायड्रोकार्बन उत्पादक क्षेत्र म्हणून नावारूपास येण्याची शक्यता बळावली आहे.

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी शुक्रवारी या महत्त्वपूर्ण कामगिरीची माहिती दिली. अंदमान बेटांच्या पूर्व किनारपट्टीपासून सुमारे १५ किलोमीटर दूर, ३५५ मीटर पाण्याच्या खोलीवर असलेल्या विजयापुरम्-३ या शोध विहिरीमध्ये हा नैसर्गिक वायूचा साठा सापडला आहे. यापूर्वी सप्टेंबर २०२५ मध्ये याच ब्लॉक मधील 'विजयापुरम्-२' विहिरीमध्ये गॅसचा साठा सापडला होता. ऑइल इंडियाने या भागात हाती घेतलेल्या शोध मोहिमेत आतापर्यंत तीन विहिरी खोदल्या असून, त्यापैकी दोन विहिरींमध्ये हायड्रोकार्बनची उपलब्धता स्पष्ट झाली आहे.

'समुद्र मंथन मिशन' अंतर्गत मोठी कामगिरी
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या यशाबद्दल ऑइल इंडियाचे कौतुक केले. त्यांनी लिहिले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ च्या स्वातंत्र्यदिनी घोषित केलेल्या समुद्र मंथन मिशन अंतर्गत भारताच्या सागरी क्षेत्रातील हायड्रोकार्बन साठ्यांचा पूर्ण वापर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खोल आणि अति-खोल समुद्रात विहिरी खोदण्याचे नियोजन आहे. अंदमानमधील हा शोध भारताच्या ऊर्जा सुरक्षेला बळ देणारा ठरेल."

ऑइल इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, 'इओसीन फॉर्मेशन'मध्ये १,९०० मीटरपेक्षा जास्त खोलीवर प्राथमिक चाचणी घेण्यात आली. यावेळी विहिरीतून सातत्याने गॅस बाहेर पडत असल्याचे दिसून आले, ज्यावरून तिथे नैसर्गिक वायूची मोठी उपस्थिती असल्याचे सिद्ध झाले. या विहिरीमधील दाब आणि उत्पादनाची गती अत्यंत उत्साहवर्धक असून हे रिझर्व्हायर उत्तम क्षमतेचे असल्याचे संकेत मिळाले आहेत.

पुढील उपक्रम आणि तांत्रिक विश्लेषण
या लागोपाठ लागलेल्या शोधानंतर ऑइल इंडियाने या संपूर्ण परिसराचे सविस्तर मूल्यांकन करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये जुन्या सिस्मिक डेटाचे पुनरुत्पादन करण्यासोबतच सुमारे ६०० चौरस किलोमीटर क्षेत्राचा नवा 3D सिस्मिक डेटा गोळा करण्यात आला आहे. सध्या या डेटाचे विश्लेषण आणि प्रक्रियेचे काम सुरू असून, यावरून आगामी काळात इतर ठिकाणी करावयाच्या खोदकामाची दिशा निश्चित केली जाईल. अंदमानचा हा सागरी भाग अजूनही पूर्णपणे शोधला गेला नसला, तरी या दोन मोठ्या शोधांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील खोल समुद्र संशोधन तज्ज्ञांच्या मदतीने भारताला या क्षेत्राचा अधिक वेगाने विकास करता येणार आहे.