CJP PROTEST: सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनाची हाक; मुंबई, नागपूरसह विविध शहरांत निदर्शने

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 5 h ago
सोनम वांगचुक आणि CJP च्या 'चलो संसद' मार्चच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातील विविध शहरांत विद्यार्थ्यांची व कार्यकर्त्यांची निदर्शने.
सोनम वांगचुक आणि CJP च्या 'चलो संसद' मार्चच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातील विविध शहरांत विद्यार्थ्यांची व कार्यकर्त्यांची निदर्शने.

 

मुंबई

पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला आणि दिल्लीतील 'चलो संसद' मार्चला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये विद्यार्थी, तरुण आणि नागरिकांनी तीव्र निदर्शने केली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी आणि विविध विद्यार्थी संघटनांनी राज्यभर आंदोलने पुकारली आहेत.

दिल्लीत संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) कार्यकर्त्यांनी काढलेल्या मोर्चानंतर दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले. मुंबईतील चैत्यभूमीवर जमलेल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसच्या नेत्यांनी या कारवाईचा निषेध करत विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

मुंबई विद्यापीठाबाहेर आणि ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. नागपुरातील संविधान चौक, छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौक, लातूर तसेच पुण्यातील भारतीय चित्र आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (FTII) विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये एकत्र येत या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला. नीट परीक्षेतील अनियमितता आणि शिक्षण क्षेत्रातील ढासळलेली व्यवस्था याविरोधात तरुण मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.