बेंगळुरू
प्रतिबंधित आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आयसिससाठी (ISIS) तरुणांचे ब्रेथवॉश करून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग तपासाचा एक भाग म्हणून सक्तवसुली संचालनालयाने (ED) मंगळवारी कर्नाटकात विविध ठिकाणी छापे टाकले.
केंद्रीय एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेंगळुरू आणि त्याच्या आसपासच्या सुमारे आठ ठिकाणांवर ही कारवाई सुरू आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (PMLA) तरतुदींनुसार ही शोधमोहीम राबवली जात आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे हा तपास सुरू करण्यात आला आहे. इक्रा वेल्फेअर ट्रस्ट, गायडन्स फॉर मॅनकाईड आणि काही व्यक्तींच्या सहभागातून आयसिससाठी ही भरती मोहीम राबवण्यात आल्याचा संशय आहे.
एनआयएने या प्रकरणात पाच जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. हे सर्व आरोपी प्रतिबंधित संघटना आयसिसशी संबंधित असून, त्यांनी बेंगळुरूमधील तरुणांचे ब्रेथवॉश करून त्यांना आयसिसमध्ये सामील होण्यासाठी प्रवृत्त करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. 'इक्रा कॅम्प' नावाच्या व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेच्या आणि 'कुराण सर्कल' या साप्ताहिक अभ्यास वर्गाच्या माध्यमातून तरुणांची दिशाभूल करण्यात येत होती. सीएए/एनआरसी आंदोलनादरम्यानच्या भावनांचा गैरवापर करून तरुणांना भडकावण्याचे काम या गटाने केल्याचे ईडीचे म्हणणे आहे. तसेच, सीरियामध्ये जाण्यासाठी या तरुणांना बेकायदेशीरपणे निधी पुरवण्यात आला आणि तुर्कस्तानमार्गे सीरियात पाठवण्यात आले, असे तपासात समोर आले आहे.