Haircut Price Hike Maharashtra : इराण-अमेरिका संघर्षामुळे महाराष्ट्रात सलूनचे दर कडाडले

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 7 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला आता आणखी एक कात्री लागणार आहे. राज्यातील नाभिक समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनेने शनिवारपासून केस कापणे, दाढी करणे यासह इतर ग्रूमिंग सेवांच्या दरांमध्ये २० टक्क्यांची वाढ लागू केली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे वाढलेला आंतरराष्ट्रीय खर्च आणि सलून साहित्याच्या किमतीत झालेली वाढ याला कारणीभूत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या नागपूर येथील पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारपासून सुधारित दरपत्रक लागू करण्यात आले आहे. या नव्या दरपत्रकानुसार आता सामान्य सलूनमध्ये केस कापण्यासाठी १८० रुपये मोजावे लागणार आहेत, तर दाढी करण्यासाठी १२० रुपये आकारले जातील.

इराण-अमेरिका संघर्षाचा फटका
या दरवाढीबाबत सविस्तर माहिती देताना महामंडळाचे पदाधिकारी श्याम आस्करकर यांनी सांगितले की, पश्चिम आशियामध्ये इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष वाढल्याने सलूनमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध वस्तू आणि साहित्याच्या किमती वाढल्या आहेत. जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे ऑपरेटिंग खर्च वाढला असून सलून चालकांना लागणाऱ्या अनेक उत्पादनांचे भाव वधारले आहेत. त्यामुळे ही दरवाढ करणे भाग पडले आहे.

सामान्यतः नाभिक महामंडळाकडून दर दोन वर्षांनी जानेवारी महिन्यात दरांमध्ये सुधारणा केली जाते. मात्र, यावेळी सलून साहित्याच्या किमतींमध्ये अचानक मोठी वाढ झाल्याने मुदतीपूर्वीच मध्यंतरी हे दर वाढवणे आम्हाला भाग पडले आहे, असे आस्करकर यांनी स्पष्ट केले.

नवे दरपत्रक एका दृष्टीक्षेपात
सुधारित दरपत्रकानुसार विविध सेवांचे दर खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत:

केस कापणे (Haircut): १८० रुपये

दाढी करणे (Shaving): १२० रुपये

दाढी ट्रिम करणे (Beard Trimming): १५० रुपये

हेड मसाज (Head Massage): १८० रुपये

हेअर वॉश (Hair Wash): १२० रुपये

फेशिअल (Facial): ७०० रुपयांपासून सुरू

हेअर स्पा (Hair Spa): ६०० रुपये

एकूण अंदाजानुसार, महाराष्ट्रात १ लाखापेक्षा जास्त लहान-मोठी सलून दुकाने आहेत. नाभिक महामंडळाचा हा निर्णय प्रामुख्याने सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय सलूनसाठी लागू आहे. प्रीमियम किंवा लक्झरी सलूनवर याचा थेट संबंध नाही, जिथे सहसा केस कापण्याचे दर ५०० रुपयांपासून सुरू होतात.