आरोग्यासाठी पोटाची चरबी आहे सर्वात मोठा शत्रू! केंद्रीय मंत्र्यांनी सांगितला लठ्ठपणाचा धोका

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 5 h ago
आरोग्यासाठी पोटाची चरबी आहे सर्वात मोठा शत्रू!
आरोग्यासाठी पोटाची चरबी आहे सर्वात मोठा शत्रू!

 

नवी दिल्ली

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आरोग्याबाबत एक अत्यंत महत्त्वाचा इशारा दिला आहे. सामान्य लठ्ठपणापेक्षा (Overall Obesity) 'सेंट्रल ओबेसिटी' म्हणजेच पोटाचा वाढलेला घेर हा आरोग्यासाठी सर्वात मोठा धोका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नवी दिल्लीत आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

डॉ. जितेंद्र सिंह यांच्या मते, एखाद्या व्यक्तीचे एकूण वजन जास्त असण्यापेक्षा, त्याच्या पोटावर आणि कमरेभोवती चरबी जमा होणे अधिक धोकादायक असते. भारतीय लोकांमध्ये 'सेंट्रल ओबेसिटी'चे प्रमाण अधिक असून, यामुळे टाईप-२ मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी वाढतो. केवळ 'बीएमआय' (BMI) पाहण्याऐवजी आता 'वेस्ट-टू-हिप रेशो'कडे (कमरेचा आणि नितंबाचा घेर) लक्ष देणे काळाची गरज आहे.

या कार्यक्रमात तज्ज्ञांनी सांगितले की, पोटातील अंतर्गत अवयवांभोवती जमा होणारी चरबी ही चयापचयावर (Metabolism) विपरित परिणाम करते. यामुळे शरीरातील इन्सुलिनच्या कार्याला बाधा येते. भारतीयांची शरीरयष्टी पाहता, अगदी कमी वजनाच्या व्यक्तींमध्येही 'सेंट्रल ओबेसिटी' असू शकते, ज्याला 'स्किनी फॅट' असेही म्हटले जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'फिट इंडिया' मोहिमेचा उल्लेख करत डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, तरुणांनी आपल्या जीवनशैलीत बदल करायला हवा. आहारात साखरेचे प्रमाण कमी करणे, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप या त्रिसूत्रीचा वापर करून या संकटावर मात करता येईल. लठ्ठपणा हा केवळ सौंदर्याचा प्रश्न नसून तो एक गंभीर वैद्यकीय आजार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारकडून लठ्ठपणा आणि त्यातून उद्भवणाऱ्या असंसर्गजन्य आजारांविरुद्ध (NCDs) व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे आणि बैठ्या कामामुळे पोटाचा घेर वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर वेळीच नियंत्रण मिळवले नाही, तर भारत भविष्यात मधुमेहाची जागतिक राजधानी बनण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.