DNYANVAPI: कायदेशीर मार्गानेच होणार फैसला; ज्ञानवापी आणि कृष्ण जन्मभूमी प्रकरणातील पक्षकारांची स्पष्ट भूमिका

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 14 h ago
ज्ञानवापी, कृष्ण जन्मभूमी आणि संभल मशिद प्रकरणातील पक्षकारांचा मध्यस्थीला नकार; कायदेशीर निर्णयाची मागणी.
ज्ञानवापी, कृष्ण जन्मभूमी आणि संभल मशिद प्रकरणातील पक्षकारांचा मध्यस्थीला नकार; कायदेशीर निर्णयाची मागणी.

 

वाराणसी 

उत्तर प्रदेशातील ज्ञानवापी, श्री कृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह आणि संभल शाही जामा मशिद या तीन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांच्या वादावर सामंजस्याने तोडगा काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे प्रयत्न अपयशी ठरताना दिसत आहेत. या प्रकरणांशी संबंधित सर्व पक्षकारांनी सामंजस्य प्रक्रियेपेक्षा (Mediation) न्यायालयाच्या निकालावरच भर देणे पसंत केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा 'समाधान समारोह'

२१, २२ आणि २३ ऑगस्ट रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या 'विशेष लोक अदालती'च्या पार्श्वभूमीवर, सर्वोच्च न्यायालयाने 'समाधान समारोह' उपक्रम सुरू केला आहे. याद्वारे प्रलंबित वादांवर सामंजस्याने तोडगा काढण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, या उपक्रमाला संबंधित दोन्ही बाजूंकडून फारसा प्रतिसाद मिळत नाहीये.

पक्षकारांची भूमिका

ज्ञानवापी प्रकरणातील हिंदू बाजूचे वकील मदन मोहन यादव यांनी स्पष्ट केले की, आम्हाला हा वाद केवळ कायदेशीर निकषांवरच सोडवायचा आहे. तर, अंजुमन इंतेझामिया मशिद कमिटीचे मोहम्मद यासीन यांनी देशात हजारो वाद प्रलंबित असताना मध्यस्थीमुळे तोडगा निघेल का, अशी शंका व्यक्त केली आहे.

मथुरा येथील श्री कृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह प्रकरणात, जिल्हा कायदेशीर सेवा प्राधिकरणासमोर झालेली मध्यस्थीची चर्चा मुस्लिम पक्षाच्या अनुपस्थितीमुळे निष्फळ ठरली. हिंदू बाजूने तिथे मंदिर असल्याचा दावा केला आहे, तर मुस्लिम बाजूने वाद कोर्टाद्वारेच सोडवावा, अशी भूमिका घेतली आहे. संभल येथील शाही जामा मशिद प्रकरणातील वकील शकील अहमद वारसी यांनीही हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून, ते सामंजस्याने सुटू शकत नाही, असे नमूद केले आहे.