अस्लम शेख यांच्या योगदानामुळे ठिकेकरवाडीचा राष्ट्रीय गौरव

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 16 h ago
ठिकेकरवाडीचे माजी ग्रामसेवक अस्लम हुसेन शेख
ठिकेकरवाडीचे माजी ग्रामसेवक अस्लम हुसेन शेख

 

भक्ती चाळक

स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी ‘मॅनेजमेंट’ आणि ‘लीडरशिप’चा जो आदर्श जगासमोर ठेवला, त्याची सुरुवात जुन्नरच्या मातीतून झाली होती. रयतेचं कल्याण, पाण्याचं अचूक नियोजन, स्थानिक संसाधनांचा वापर आणि लोकसहभाग ही शिवरायांच्या नेतृत्वाची मुख्य सूत्रं होती.

याच ऐतिहासिक भूमीचा वारसा अंगी बाळगून एका सामान्य माणसाने गावाचा कायापालट करण्यासाठी शिवरायांच्या याच विचारांना आधुनिक रूप दिलं. पोटासाठी ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून झाडू हाती घेणाऱ्या अस्लम हुसेन शेख यांनी आपल्या कर्तृत्वाने ठिकेकरवाडी गावाला देशाच्या नकाशावर थेट पहिल्या क्रमांकावर नेऊन ठेवलं.

लहानपणीच हरवलं आई-वडिलांचं छत्र 
अस्लम हुसेन शेख यांचा जन्म अगदी सामान्य कुटुंबात झाला. त्यांनी नारायणगावच्या जिल्हा परिषद शाळेतून पहिली ते सातवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर आठवी ते दहावीपर्यंतचं शिक्षण गुरुवर्य राजाराम परशुराम सबनीस विद्यामंदिर इथे झालं. 

१९८२ साली ते अवघे आठवीत असताना त्यांच्या आई-वडिलांचं आकस्मिक निधन झालं. अचानक कोसळलेल्या या संकटामुळे त्यांचं संपूर्ण आयुष्य कोलमडून पडलं होतं. पण गावाने त्यांना एकटं सोडलं नाही. कै. भागूबाई शेलार, भामाबाई वाळके आणि त्यांच्या कुटुंबाने अस्लम यांचा सांभाळ केला. 

या माणसांमुळेच अस्लम दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करू शकले. या संपूर्ण प्रवासात त्यांची बहीण बेबीजान इनामदार हिने देखील पालकाची भूमिका बजावत त्यांच्या शाळेची आणि इतर सर्व जबाबदाऱ्या स्वीकारल्या.  

पुढे १९८४ मध्ये दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अस्लम यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न होता. त्यांनी वारूळवाडी ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून नोकरीची सुरुवात केली. त्या काळात कृषीरत्न पुरस्कार विजेते अनिल मेहेर यांनी अस्लम यांना शिपाई म्हणून काम करण्याची पहिली संधी दिली.

नोकरी करत असतानाच अस्लम यांनी पुढे शिकण्याची जिद्द सोडली नाही. त्यांनी पुढील दोन वर्षांच्या कालावधीत मांजरी फार्म येथील कृषी विद्यालयातून कृषी पदविका (अॅग्रीकल्चर डिप्लोमा) हा कोर्स विशेष प्राविण्यासह पूर्ण केला. त्यानंतर मंचर कॉलेजमधून एक्सटर्नल विद्यार्थी म्हणून १२ वीची परीक्षाही उत्तीर्ण केली.

१९८८ मध्ये त्यांचा विवाह शमीम शेख यांच्याशी झाला. त्यांनी अस्लम यांच्या जडणघडणीत मोलाची साथ दिली. मात्र दुर्दैवाने डेंग्यूच्या आजाराने त्यांचं निधन झालं. त्यानंतरच्या काळात अस्लम यांनी बिस्मिल्ला शेख यांच्याशी विवाह केला. आपल्या सर्व यशात बिस्मिल्ला यांचा मोठा वाटा असल्याचं ते सांगतात. सध्या त्यांना साजिद हा मुलगा आणि मुमताज ही मुलगी असून ते दोघेही विवाहबद्ध झाले आहेत.
 
अस्लम शेख आणि त्यांच्या पत्नी बिस्मिल्ला शेख 

अडथळ्यांची शर्यत पार करत ग्रामसेवक पदाला गवसणी
मधल्या काळात शासनाने शून्य आधारित अर्थसंकल्प घोषित केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय नोकरभरती बंद झाली होती. त्यामुळे कृषी पदविकेत विशेष प्राविण्य मिळवूनही अस्लम यांना नोकरी मिळत नव्हती. अखेर १९८९ मध्ये नारायणगाव ग्रामपंचायतीत लिपिक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९८९ ते २००६ पर्यंत त्यांनी तिथे लिपिक आणि वरिष्ठ लिपिक म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं..

पुढे २००६ मध्ये एक मोठी सुवर्णसंधी चालून आली. पुणे जिल्हा परिषदेने ग्रामपंचायत कर्मचारी १० टक्के कोट्यामधून कंत्राटी ग्रामसेवक भरती काढली. कृषी पदविकेच्या जोरावर अस्लम यांनी ही परीक्षा दिली. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांकाचे गुण मिळवून त्यांची ग्रामसेवक म्हणून निवड झाली. त्यानंतर त्यांनी जुन्नर तालुक्यातील आपटाळे, निरगुडे, आंबेगव्हाण, रोहोकडी आणि ठिकेकरवाडी अशा विविध ग्रामपंचायतींमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला.

ठिकेकरवाडीला बनवलं ‘ऊर्जा स्वराज’मध्ये देशात नंबर वन
२०२१ मध्ये अस्लम शेख यांनी ठिकेकरवाडी ग्रामपंचायतीचा चार्ज घेतला. त्यांच्या येण्याने गावाच्या विकासाला गती मिळाली. त्यांच्या कार्यकाळात गावाने ‘ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार २०२३’ अंतर्गत संपूर्ण देशात प्रथम क्रमांकाचं १ कोटी रुपयांचं बक्षीस पटकावलं.

नवी दिल्लीतील विज्ञान भवनात पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या भव्य कार्यक्रमात देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि १ कोटी रुपयांचा धनादेश देऊन ठिकेकरवाडीचे आदर्श सरपंच संतोष ठिकेकर, ग्रामसेवक अस्लम शेख आणि गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी यांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव करण्यात आला. 
 
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून पुरस्कार स्वीकारताना ठिकेकर वाडीचे सरपंच संतोष ठिकेकर आणि नगरसेवक अस्लम शेख 
 
हा विशेष सन्मान घेऊन जेव्हा हे त्रिकूट गावात परतलं, तेव्हा संपूर्ण ठिकेकरवाडीत पारंपारिक वाद्यांच्या गजर, फटाक्यांची आतिषबाजी आणि महिलांच्या टाळ पथकासह ऐतिहासिक विजयोत्सव साजरा केला होता.

ठिकेकरवाडीचे सरपंच संतोष ठिकेकर यांनी अस्लम यांच्या कामाबाबत आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, “आम्ही अस्लम चाचांसोबत अनेकवर्ष काम केले. ते प्रामाणिकपणे आपलं काम पार पडतात. ते चांगल्या पद्धतीने को-ऑपरेट करायचे. आम्हाला त्यांचं खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य लाभलं.”

अस्लम शेख यांच्या कार्यकाळातील नावीन्यपूर्ण उपक्रम
ठिकेकरवाडीत अवघी १८९ ते १९० कुटुंबं राहतात. या छोट्याशा गावाला अस्लम शेख आणि सरपंच संतोष ठिकेकर यांनी मिळून स्मार्ट गाव बनवलं. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक विकासकामं केली.  

१००% सौर ऊर्जेचा वापर : गावातील सर्व कुटुंबांना सौर ऊर्जेचा वापर करण्यासाठी विशेष अनुदान मिळवून दिलं. आज गावातील प्रत्येक घरात गरम पाण्यासाठी १००% सोलर वॉटर हीटर वापरले जातात.

स्वतःची वीजनिर्मिती : गावाने सोलर प्लांट, बायोगॅस प्लांट आणि वाऱ्याच्या वेगावर चालणाऱ्या पवनचक्कीच्या माध्यमातून तब्बल १०,००० वॅटपर्यंत विद्युत निर्मिती करून स्वतःचे वीज बिल शून्य केलं.

शेत जमिनीची संपूर्ण मोजणी : गावातील संपूर्ण शेत जमिनीची शासकीय मोजणी करून घेणारं ठिकेकरवाडी हे कदाचित महाराष्ट्रातील पहिलंच गाव ठरलं.

१००% ठिबक सिंचन : कृषी विभागाच्या मदतीने गावातील १०० टक्के शेतीला ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करण्यास सर्व शेतकऱ्यांना प्रवृत्त केलं गेलं.

मृदा आरोग्य तपासणी : जमिनीतील घटकांची कमतरता जाणून घेण्यासाठी गावाने विशेष मृदा तपासणी उपक्रम सुरू केला, ज्याचा लाभ शेतकरी आजही घेत आहेत.
 
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून अस्लम शेख यांच्यावर कौतुकाचा वर्षाव 
 
गावाचा ४५ पेक्षा जास्त पुरस्कारांनी सन्मान 
ग्रामपंचायतीच्या अचूक नियोजनामुळे ठिकेकरवाडी ग्रामपंचायतीला आजवर लहान-मोठे मिळून तब्बल ४५ पेक्षा जास्त पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यामध्ये ‘संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान’ अंतर्गत गावाला महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. यासोबतच देश पातळीवरील अत्यंत प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय गौरव ग्राम स्पर्धा पुरस्कार’ मिळवून हे गाव देशात पहिल्या क्रमांकाची ग्रामपंचायत ठरली.

अस्लम हे त्यांच्या कामाप्रती जितके प्रामाणिक आहेत ते तेवढेच सुजन नागरिक देखील आहेत. सध्याच्या काळातील सामाजिक परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना अस्लम सांगतात, “सध्या सामाजिक ध्रुवीकरणाचे फार विचित्र प्रयत्न सुरु आहेत. पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. लोक एकमेकांशी सलोख्याने राहत होते. आमच्या नारायणगावचं हे वैशिष्ट्य आहे.”

अस्लम पुढे म्हणतात, “मी लहानपणापासून पाहतोय अजूनपर्यंत इथे कधीही धार्मिक तेढ निर्माण होणारी घटना घडली नाहीय. सगळे सणवार आम्ही गुण्यागोविंदाने साजरे करतो. मी १० वर्ष महासरोदय गणेशोत्सव मंडळाचा सचिव आणि १० वर्ष उपाध्यक्ष म्हणून काम केलंय.”

आपल्या संपूर्ण प्रवासाचं सार सांगताना ते शेवटी एकच मोलाचा संदेश देतात. ते म्हणतात, “आपण सर्वांनी एकजुटीने आणि एक दिलाने राहिलं तरंच आपल्या देशाची उन्नती होणार आहे. आपण सर्वं एकजुटीने राहिल्यास आपला भविष्यकाळ उज्ज्वल आहे.”


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter