मलिक असगर हाशमी
पर्यावरण रक्षण आणि हवामान बदलाच्या संकटाविरुद्ध काम करणाऱ्या महिलांची संख्या भारतात हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे. या मोजक्या महिलांमध्ये मेरठ जिल्ह्यातील हिना सैफी हे नाव आता ठळकपणे समोर आले आहे. एका छोट्या आणि सामान्य गावातून आलेल्या हिनाने आपल्या अथक प्रयत्नांमुळे देशभर ओळख निर्माण केली आहे.
मेरठमधील एका नामांकित संस्थेतून एमबीए पूर्ण केलेल्या २५ वर्षीय हिनाचा हा प्रवास सोपा नव्हता. सुरुवातीला तिचे हे ध्येय गाठणे अशक्य वाटत होते. पण हळूहळू लोक तिच्या कार्यात सहभागी झाले आणि तिची चळवळ वाढत गेली. आज तिच्या संस्थेने भारतभरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
हिना मेरठच्या सिसोला गावात राहते. संयुक्त राष्ट्रांच्या ‘#WeTheChangeNow’ या मोहिमेसाठी निवडलेल्या १७ तरुण हवामान नेत्यांमध्ये तिचा समावेश आहे. या जागतिक मोहिमेचा ती एक महत्त्वाचा चेहरा बनली आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातील तरुणांनी शोधलेले पर्यावरणाचे उपाय जगासमोर मांडणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. हिना २०१८ सालापासून ‘१०० टक्के उत्तर प्रदेश मोहीम’ आणि ‘द क्लायमेट अजेंडा’ यांसारख्या मोठ्या उपक्रमांशी जोडलेली आहे.
समाजाने पर्यावरणाबाबत जागरूक राहिल्यास निसर्ग मोठ्या प्रमाणात जतन आणि संरक्षित होऊ शकतो, अशी हिनाची ठाम खात्री आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा सामान्य नागरिक पर्यावरणाशी पूरक सवयी आणि जीवनशैलीत बदल करतील. याच विचारातून तिने लोकसहभाग आणि पर्यावरण जागृतीला आपल्या जीवनाचे ध्येय बनवले आहे.
आपल्या गावातील ढासळती परिस्थिती पाहून हिनाला ही प्रेरणा मिळाली. गावात वाढते वायू प्रदूषण आणि लोकांमध्ये पर्यावरणाबाबत असलेली अनभिज्ञता तिने अनुभवली. दैनंदिन सवयी बदलण्यासाठी दीर्घकालीन प्रयत्न गरजेचे आहेत, हे तिला उमजले. यासाठी ती आणि तिची टीम 'स्वच्छ हवेसाठी पदयात्रा' काढतात. गावात पत्रके वाटणे, जाहीर सभा घेणे आणि घराघरात जाऊन पर्यावरण सर्वेक्षण करणे अशी कामे ती सातत्याने करते.
वायू प्रदूषणावर दीर्घकालीन उपाय म्हणून सौर ऊर्जेच्या तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे असल्याचे हिना मानते. ग्रामीण भागात सौर पंप बसवणे आणि सार्वजनिक इमारतींवर सौर पॅनेल लावण्यासाठी ती सक्रियपणे मोहीम राबवते. भारताच्या हवामान बदलाच्या जागतिक वचनबद्धतेमध्ये (NDCs) हे प्रयत्न मोलाचे योगदान देतात. २०३० पर्यंत सौर ऊर्जेसह इतर बिगर-जीवाश्म इंधन स्रोतांचा वाटा ४० टक्क्यांपर्यंत नेण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. हिना सध्या मेरठमधील ‘एन ब्लॉक’ या स्थानिक स्वयंसेवी संस्थेसोबत मिळून हे काम करते.
हवामान बदलाच्या लढाईत हिनासोबत देशातील १६ इतर तरुण हवामानवीर आहेत. हे सर्वजण संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर आपापले संघर्षाचे आणि यशाचे किस्से मांडतात. त्यातून ते इतर तरुणांनाही या चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करतात. ‘वी द चेंज’ मोहिमेचे हे चेहरे हवामान न्याय आणि पर्यावरण रक्षणासाठी नवा मार्ग तयार करत आहेत.
अभिनेत्री आणि संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांची वकील दिया मिर्झा यांनीही या मोहिमेचे कौतुक केले आहे. हिना आणि तिच्या सहकाऱ्यांच्या गोष्टींनी मला खूप प्रेरणा दिली आहे, असे मिर्झा यांनी म्हटले आहे. त्यांच्या या कामामुळे अनेकांना पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावण्याची प्रेरणा मिळू शकते.
भारतातील संयुक्त राष्ट्रांचे निवासी समन्वयक सांगतात की, ही मोहीम लोकांना हवामान संकटाचा सामना करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यास प्रोत्साहन देते. तसेच, ही मोहीम राज्य सरकारे आणि स्थानिक समुदायांना अर्थपूर्ण कृती करण्यासाठी प्रेरित करते आणि तरुणांच्या नेतृत्वाखालील निसर्ग-पूरक बदलांचे कौतुक करते.
हिनाचा स्वतःचा प्रवासही तितकाच संघर्षाचा आहे. सिसोला गावात फक्त आठवीपर्यंत शाळा होती. हिनाला पुढील शिक्षणासाठी गावाबाहेर पाठवण्यास तिचे आई-वडील सुरुवातीला तयार नव्हते. पण अशा वेळी तिच्या आईने तिला खंबीर साथ दिली. तिला खातौलीमध्ये मावशीकडे राहण्यासाठी पाठवले, जिथे तिने माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करणे हे दुसरे मोठे आव्हान होते, पण ‘एन ब्लॉक’ संस्थेच्या मुकेश कुमार यांनी तिच्या पालकांना महाविद्यालयात पाठवण्यासाठी तयार केले.
सिसोला गावातील आर्थिक स्थिती बिकट होती. बहुतेक पुरुष दगड खाणीत काम करायचे, तर महिला आणि मुले स्थानिक फुटबॉल बनवण्याच्या कारखान्यात काम करायचे. एका फुटबॉलच्या शिलाईसाठी त्यांना अवघे २० रुपये मिळायचे. गरिबीमुळे बालमजुरी ही सामान्य बाब होती. आठवीच्या पुढे शिक्षण नको, असा सल्ला हिनालाही दिला गेला होता. पण तिने हार मानली नाही. अभ्यासाचा खर्च भागवण्यासाठी तिने फुटबॉल कारखान्यात पार्ट-टाइम काम केले.
अशा परिस्थितीत वाढल्यामुळे शिक्षण, गरिबी आणि पर्यावरणाचा ऱ्हास यांचा संबंध तिला जवळून समजला. कचरा तलाव किंवा नद्यांमध्ये टाकणे किंवा उघड्यावर जाळणे तिला दिसले. गावात स्वच्छता नव्हती, लोक उघड्यावर शौचास जात असत आणि सांडपाण्याच्या गटारांमध्ये कचरा साचलेला असायचा. शिक्षण घेतल्याशिवाय बदल शक्य नाही, हे हिनाला उमजले होते. शिक्षकांसोबत मिळून तिने पालकांचे समुपदेशन केले आणि त्यांना मुलांना शाळेत पाठवण्यासाठी तयार केले.
२०१८ मध्ये हिना आपल्या गावातील पहिली मुलगी ठरली, जिने लखनौमध्ये पर्यावरण कार्यशाळेत भाग घेतला. तिथे तिने वायू प्रदूषण आणि हवेच्या गुणवत्तेबाबत (AQI) माहिती घेतली. घरी परतल्यावर तिने महिला आणि मुलांचे गट तयार केले. पर्यावरण जागृतीसाठी तिने २० मुलींची एक विशेष टीम बनवली. ‘विमेन क्लायमेट कलेक्टिव्ह’च्या माध्यमातून ती आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आपला आवाज उठवते.
नुकताच हिनाने ‘सूरज से समृद्धी’ नावाचा एक नवा ग्रामीण उपक्रम सुरू केला आहे. या मोहिमेद्वारे ती ग्रामस्थांना ऑफ-ग्रिड सौर ऊर्जा प्रणालीच्या फायद्यांविषयी माहिती देते. शाळेतील मुलांमध्ये लहानपणापासून पर्यावरणाची आवड निर्माण करण्यासाठी ती चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित करते. सामाजिक परिवर्तनामध्ये महिलांची भूमिका सर्वात महत्त्वाची असते, कारण पर्यावरणाच्या संकटाचा सर्वाधिक फटका महिलांनाच बसतो, असे तिचे मत आहे.
आज हिनाच्या प्रयत्नांमुळे सिसोला गावाचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. पालक आता आपल्या मुलींना गावाबाहेरील महाविद्यालयांत पाठवण्यासाठी उत्सुक आहेत. गाव आता स्वच्छ झाले आहे, कचरा व्यवस्थापन सुधारले आहे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढली आहे. विकास कामे आणि शाश्वत उपायांवर चर्चा करण्यासाठी हिना नियमितपणे गावातील प्रमुखांशी संवाद साधते.
मेरठमधील एका दुर्गम गावातून संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक व्यासपीठापर्यंतचा हिना सैफीचा हा प्रवास, अडथळ्यांवर मात करून समाजात सकारात्मक बदल घडवू इच्छिणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी एक मोठी प्रेरणा आहे. जिद्द, शिक्षण आणि तळागाळातील कृती एखाद्या व्यक्तीचेच नव्हे तर संपूर्ण समुदायाचे आयुष्य कसे बदलू शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.