हलिमा खातून : बालविवाहाविरुद्ध लढा देणारी रणरागिणी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 10 h ago
हलिमा खातून
हलिमा खातून

 

शम्पी चक्रवर्ती पुरकायस्थ

उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील हिंगलजंग तालुक्यात उत्तर महमूदपूर हे एक दुर्गम गाव आहे. सुंदरबनच्या या भागात गरिबी, अंधश्रद्धा आणि पुरुषसत्ताक विचारसरणीचा पगडा खूप जुना आहे. या सगळ्या जाचक अटींमुळे येथील महिलांचे जीवन वर्षानुवर्षे एका चौकटीत अडकले होते. परंतु, याच मातीतून आता हलिमा खातून हे एक अत्यंत धाडसी नाव समोर आले आहे. स्वतःच्या आयुष्यातील संघर्षाचे रूपांतर ताकदीत करून त्यांनी आज हजारो महिलांसाठी मुक्तीची नवी पहाट आणली आहे. त्या आज अनेक महिलांच्या गळ्यातील ताईत बनल्या आहेत.

हलिमा यांचा जन्म विडी कामगारांच्या कुटुंबात झाला. त्यामुळे महिलांची लाचारी त्यांनी लहानपणापासूनच जवळून पाहिली होती. बालविवाह, शिक्षणाचा अभाव आणि अगदी मूलभूत अधिकारांपासून वंचित राहिलेले जगणे त्यांनी अनुभवले होते. मात्र, हे जगणे म्हणजे नशिबाचा खेळ आहे, हे स्वीकारण्यास त्यांनी साफ नकार दिला. पुढे कोलकाता येथे उच्च शिक्षण घेत असताना त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. आपल्या गावासारख्या असंख्य खेड्यापाड्यांमधील महिला अजूनही शांतपणे भेदभाव आणि अन्याय सहन करत आहेत.

या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी वर्ष २००९ मध्ये 'ॲक्शनएड इंडिया' या संस्थेमध्ये प्रवेश केला. हा त्यांच्या तळागाळातील सामाजिक प्रवासाचा मुख्य आरंभ होता. गावात जाऊन त्यांनी केवळ महिलांच्या समस्या ऐकल्या नाहीत, तर त्यांना एकत्र आणले. महिलांना स्वतःच्या हक्कांसाठी लढण्याची पहिली शिकवण त्यांनी दिली.
 

त्यांच्या या संपूर्ण लढ्यातील सर्वात धाडसी आणि महत्त्वाचा भाग म्हणजे बालविवाहाविरुद्ध त्यांनी पुकारलेले युद्ध होय. अनेक ठिकाणी तर बालविवाह रोखण्यासाठी हलिमा स्वतः पोलिसांना सोबत घेऊन थेट लग्नाच्या मांडवात पोहोचल्या. समाजातील एका विशिष्ट वर्गाने त्यांना खूप विरोध केला, अनेक धमक्या दिल्या, तरीही त्या अधिक जिद्दीने आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. त्यांच्या या धाडसामुळे अनेक लहान मुलींना पुन्हा शाळेत जाता आले. स्वतःचे भविष्य स्वतः घडवण्याची एक मोठी संधी या मुलींना परत मिळाली.

हलिमा यांच्या अविरत प्रयत्नांमुळे 'हसनाबाद-हिंगलजंग मुस्लिम महिला संघा'ची स्थापना झाली. आज या संघात हजारो महिला एकत्र येऊन आपल्या हक्कांबद्दल उघडपणे बोलत आहेत. ज्या महिला कधीकाळी घराच्या चार भिंतींच्या आत बंदिस्त होत्या, त्या आज मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड, शिक्षणाचा अधिकार आणि आरोग्य सेवांची मागणी करत आहेत.
 

हलिमा यांचा हा मार्ग कधीच सोपा नव्हता. त्यांच्यावर संस्कृतीविरोधी विचार पसरवल्याचे खोटे आरोप करण्यात आले. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या. परंतु, या सगळ्या अडचणींना न जुमानता त्या कधीच थांबल्या नाहीत. उलट, त्यांनी प्रत्येक अडथळ्याचे रूपांतर आपल्या शक्तीत केले.

आज सुंदरबनच्या अनेक गावांमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत. ज्या समाजात पूर्वी महिलांच्या आवाजाला कोणतीही किंमत नव्हती, तिथल्या महिला आज निषेध करायला शिकल्या आहेत. त्या स्वतःचे निर्णय स्वतः घेत आहेत आणि समाजात आपले हक्काचे स्थान मिळवत आहेत. या संपूर्ण परिवर्तनाच्या केंद्रस्थानी हलिमा खातून उभ्या आहेत. त्यांनी केवळ स्वतःचे आयुष्य बदलले नाही, तर हजारो इतर महिलांच्या आयुष्याला एक नवीन आणि सन्मानजनक दिशा दिली आहे.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter