पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणामुळे इंधन क्षमतेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 11 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण (E20) केल्यामुळे वाहनांच्या मायलेजमध्ये ३ ते ५ टक्क्यांनी घट होऊ शकते, अशी कबुली केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने शुक्रवारी दिली. मात्र, हा किरकोळ परिणाम इंधनाचे इतर अनेक फायदे विचारात घेता नगण्य असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमाबाबत पसरलेल्या अफवांचे खंडन करण्यासाठी मंत्रालयाने एका विशेष प्रश्न-उत्तर दस्तऐवजाद्वारे सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.

इथेनॉल मिश्रणाचे फायदे
मंत्रालयाने स्पष्ट केले की, E20 हे इंधन E10 किंवा शुद्ध पेट्रोलपेक्षा अधिक स्वच्छ आणि कार्यक्षम आहे. इथेनॉल मिश्रणामुळे पेट्रोलचा ऑक्टेन रेटिंग वाढतो, ज्वलन प्रक्रिया जलद होते आणि इंजिनचा वेग (पिकअप) सुधारतो. तसेच, हे इंधन इंजिनच्या स्वच्छ कार्यक्षमतेसाठी उपयुक्त असून, यामुळे पर्यावरणाचे प्रदूषणही कमी होते. हे इंधन अचानक बाजारात आणलेले नसून, गेली अनेक वर्षे वैज्ञानिक चाचण्या आणि वाहन उत्पादकांशी सल्लामसलत केल्यानंतरच देशभर लागू करण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

वाहन सुरक्षितता आणि पुरवठा साखळी
जुनी वाहने आणि E20 इंधनाच्या सुसंगततेबाबतच्या शंका फेटाळताना मंत्रालयाने सांगितले की, देशभरात लाँच करण्यापूर्वी इंजिन टिकाऊपणा, गंजरोधक क्षमता आणि उत्सर्जनाच्या निकषांवर या इंधनाची सखोल चाचणी घेण्यात आली आहे. मारुती सुझुकी आणि हिरो मोटोकॉर्पसारख्या आघाडीच्या कंपन्यांनीही आपल्या वाहनांमध्ये E20 मुळे कोणतीही बिघाड झाल्याची तक्रार केलेली नाही.

देशभरातील १ लाखाहून अधिक पेट्रोल पंपांवर शुद्ध पेट्रोल, E10 आणि E20 असे विविध प्रकार एकाच वेळी पुरवणे लॉजिस्टिकच्या दृष्टीने खर्चिक आणि कठीण असल्याचेही मंत्रालयाने नमूद केले. E20 हे केवळ स्वस्त इंधन म्हणून नाही, तर भारताची कच्च्या तेलावरील आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊर्जा सुरक्षा बळकट करण्यासाठी राबवण्यात येत आहे. 

२०१४-१५ पासून या कार्यक्रमाने १.९७ लाख कोटी रुपयांचे विदेशी चलन वाचवले असून, शेतकऱ्यांच्या खिशात १.६६ लाख कोटी रुपये हस्तांतरित केल्याची माहितीही मंत्रालयाने दिली आहे.