नवी मुंबईतील एका रहिवाशाची तब्बल १.५५ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर टोळीतील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. उमंग विजयभाई लकोड (वय २४) असे या तरुणाचे नाव असून, त्याला गुजरातच्या वडोदरा येथून नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. तो मूळचा अहमदाबादमधील अमराईवाडी येथील रहिवासी असून, त्याने इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे.
डिजिटल अरेस्टचा धक्कादायक प्रकार
मार्च २०२४ मध्ये फसवणुकीची ही घटना घडली. भामट्यांनी व्हॉट्सॲप आणि सिग्नल ॲपद्वारे पीडित व्यक्तीशी संपर्क साधला. त्यांनी स्वतःला दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) अधिकारी असल्याचे भासवून पीडित व्यक्तीला बनावट अटक वॉरंट आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नावाने बनावट पत्र पाठवले. त्यानंतर व्हिडिओ कॉलद्वारे पीडित व्यक्तीला 'डिजिटल अरेस्ट' करून घाबरवले. कायदेशीर कारवाईतून वाचवण्याच्या बहाण्याने आरोपींनी विविध बँक खात्यांमध्ये तब्बल १,५४,९८,००० रुपये भरण्यास भाग पाडले.
१००० सिम कार्डांचा पुरवठा
तांत्रिक विश्लेषणातून आरोपीपर्यंत पोहोचलेल्या नवी मुंबई पोलिसांनी लकोडला अटक केली. त्याच्याकडून ३४७ सिम कार्ड, तीन मोबाईल फोन, डेबिट कार्ड आणि धनादेश पुस्तके जप्त करण्यात आली आहेत. चौकशीत समोर आले की, लकोडने आतापर्यंत १००० हून अधिक सिम कार्ड सक्रिय करून ती कंबोडियातील सायबर गुन्हेगारांकडे तस्करीद्वारे पाठवली आहेत. या सिम कार्डांचा वापर करून देशभरातील अनेक नागरिकांना टार्गेट केले जात होते.
सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या प्रकारांबाबत पोलिसांनी नागरिकांना सतर्क केले आहे. टेलिग्राम, इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सॲपवरून येणाऱ्या अनोळखी मेसेजला प्रतिसाद देऊ नका किंवा टास्क जॉबच्या आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या सायबर क्राईम हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.