भारतभूमीच्या रक्षणासाठी पॅरा कमांडो शाकिब पठाण यांचे सर्वोच्च बलिदान

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 11 h ago
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वीर पॅरा कमांडो शाकिब पठाण यांना लष्करी इतमामात अखेरचा निरोप देतानाचे क्षण
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वीर पॅरा कमांडो शाकिब पठाण यांना लष्करी इतमामात अखेरचा निरोप देतानाचे क्षण

 

भक्ती चाळक

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यापासून ते कारगील युद्धापर्यंत, देशाच्या अखंडतेसाठी मुस्लिम जवानांनी दिलेले योगदान अतुलनीय राहिले आहे. ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान, परमवीर चक्र विजेते हवालदार अब्दुल हमीद आणि कॅप्टन हनिफुद्दीन यांसारख्या अनेक वीर पुत्रांनी सीमेवर शत्रूशी लढताना आपल्या प्राणांची आहुती दिली. भारतीय सैन्य दलाच्या सर्वात कठीण आणि मानाच्या '४११ पॅरा युनिट'मध्ये कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील नाशिकच्या एका सुपुत्राने देशासाठी सेवा बजावताना आपले प्राण गमावले. ३२ वर्षीय पॅरा कमांडो शाकिब पिरामद पठाण यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.

कर्तव्य बजावताना काळाचा घाला
नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील सोनांबे गावचे सुपुत्र पॅरा कमांडो शाकिब पठाण यांचे आग्रा येथे कर्तव्य बजावत असताना विजेचा धक्का बसल्याने दुर्दैवी निधन झाले. सैन्य दलाच्या आग्रा येथील निवास परिसरात ते आपले कर्तव्य पार पाडत होते. काम करत असताना त्यांना अचानक विजेचा तीव्र झटका बसला. हा करंट एवढा जोरदार होता की शाकिब यांचा जागीच मृत्यू झाला.

या अत्यंत दुःखद घटनेला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अधिकृत दुजोरा देण्यात आला होता. एका शूर, उमद्या आणि कर्तव्यदक्ष जवानाच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण सिन्नर तालुक्यावर आणि सोनांबे गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पॅरा कमांडो शाकिब पठाण हे अवघ्या पंधरा दिवसांपूर्वीच आपली सुट्टी संपवून पुन्हा देशसेवेसाठी कर्तव्यावर हजर झाले होते. आपल्या कुटुंबाला आणि गावकऱ्यांना पुन्हा लवकरच भेटण्याचे वचन देऊन ते आग्र्याला रवाना झाले होते. सुट्टीवरून परतल्यानंतर काही दिवसांतच ही दुर्दैवी घटना घडली. 

शाकिब पठाण यांनी भारतीय सैन्य दलात तब्बल दहा वर्षे देशाची प्रामाणिक सेवा बजावली. लष्करात गेल्यानंतर सुट्ट्या मिळणे किती कठीण असते, हे सर्वांनाच ठाऊक आहे. गेले दोन महिने ते सुट्टीवर आपल्या गावी सोनांबे येथे आले होते. हा काळ त्यांच्या कुटुंबासाठी अत्यंत आनंदाचा ठरला होता. या सुट्टीच्या काळात त्यांनी आपला एकुलता एक मुलगा साजन याचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला होता.

मुलगा साजनच्या पहिल्या वाढदिवसासोबतच त्यांनी इस्लाममधील हकिका विधीदेखील आनंदात पार पाडला होता. मात्र, कुटुंबासोबत घालवलेले हे क्षण त्यांच्या आयुष्यातील शेवटचे आनंदाचे क्षण ठरले. शांत, मनमिळावू, शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष असा शाकिब यांचा स्वभाव होता. त्यांचा हाच स्वभाव आज प्रत्येक गावकऱ्याच्या मनात कायमचा कोरला गेला आहे. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, चिमुरडा मुलगा साजन आणि दोन भाऊ असा मोठा परिवार आहे.

सोनांबे ते भारतीय सैन्य दलाचा खडतर प्रवास
शाकिब यांचे प्राथमिक शिक्षण सोनांबे येथील जनता विद्यालयात झाले. त्यानंतर पुढील बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी सिन्नर महाविद्यालयात पूर्ण केले. कॉलेजमध्ये असतानाच त्यांच्या मनात देशसेवेची जिद्द निर्माण झाली होती. देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची त्यांची इच्छा होती.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी गावातच असलेल्या 'पर्सनल करिअर अकॅडमी'मध्ये सैनिकी प्रशिक्षणाचे धडे गिरवले. अत्यंत खडतर मेहनत घेऊन ते भारतीय सैन्यात भरती झाले. भारतीय सैन्यात गेल्यानंतर सामान्य सैनिक म्हणून न थांबता, त्यांनी लष्करामधील अत्यंत कठीण आणि शौर्याचे समजले जाणारे 'पॅरा कमांडो' पद मिळवले. ४११ पॅरा युनिटमध्ये काम करताना त्यांनी आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली होती.

मुळचे नाशिकचे असलेले अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी देखील पॅरा कमांडो शाकिब यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, "नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सोनांबे गावचे सुपुत्र आणि भारतमातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे वीर जवान शाकिब पिरामद पठाण यांना आमची भावपूर्ण श्रद्धांजली!"

त्यांनी पुढे लिहिले की, "वीर जवान शाकिब पिरामद पठाण यांनी आपले कर्तव्य बजावताना दाखवलेले शौर्य, त्यांची असीम देशभक्ती आणि त्यांनी दिलेले सर्वोच्च बलिदान देशवासीय कधीही विसरणार नाहीत. त्यांचा हा त्याग आणि त्यांच्या आठवणी आपल्या सर्वांच्या हृदयात सदैव अमर राहतील. त्यांच्या पवित्र आत्म्यास आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही सर्वजण पठाण कुटुंबाच्या या अथांग दुःखात पाठीशी आहोत. या अत्यंत कठीण प्रसंगात त्यांच्या कुटुंबाला हे अतीव दुःख सहन करण्याची ताकद मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना."
शाकिब यांना जनसमुदायातून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण रक्षण अमोल गवारी यांनी आपल्या सोशल मीडियावरून 'शाकिब भैय्या अमर रहे' अशा घोषणा दिल्या आहेत. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, "भारत मातेच्या रक्षणासाठी आपले सर्वोच्च बलिदान देणारे नाशिक जिल्ह्यातील सोनांबे गावचे सुपुत्र, वीर जवान शाकिब पिरामद पठाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली! वीर जवान शाकिब पिरामद पठाण यांनी कर्तव्य बजावत असताना दाखवलेले शौर्य, असीम देशभक्ती आणि दिलेले सर्वोच्च बलिदान देशवासीय कधीही विसरणार नाहीत."

लष्करी इतमामात अखेरचा सलाम
सैन्य दलातील सर्व आवश्यक शासकीय आणि लष्करी सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर, शहीद शाकिब पठाण यांचे पार्थिव सोमवारी लष्करी सन्मानाने त्यांच्या मूळ गावी सोनांबे येथे आणण्यात आले. आपल्या लाडक्या सुपुत्राला शेवटचा निरोप देण्यासाठी संपूर्ण सिन्नर तालुका सोनांबे गावात गोळा झाला होता.

गावातील प्रत्येक घरावर दुःख दाटून आले होते. 'शाकिब पठाण अमर रहे' अशा घोषणांनी संपूर्ण परिसर हळहळून गेला होता. अखेर इस्लामिक रीती-रिवाजांनुसार आणि पूर्ण लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्कराच्या जवानांनी हवेत गोळ्या झाडून आपल्या या शूर सहकाऱ्याला अखेरची मानवंदना दिली. शाकिब पठाण यांनी देशासाठी दिलेले हे योगदान आणि सर्वोच्च त्याग नाशिक जिल्हा आणि हा देश कधीही विसरणार नाही. सिन्नरच्या या वीर पुत्राला मानाचा मुजरा!
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter