तुकाराम मुंडे : सिस्टीमला वठणीवर आणणारा आयएएस अधिकारी

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 7 h ago
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे

 

भक्ती चाळक 

भ्रष्टाचाराने पोखरलेली व्यवस्था, राजकारण्यांचा वरदहस्त असलेले बेकायदेशीर धंदे आणि सर्वसामान्यांची होणारी पिळवणूक... देशात सगळीच सिस्टीम खराब झालीय, असं म्हणून आपण हात वर करतो. पण याच सिस्टीममध्ये जेव्हा एखादा धडाडीचा अधिकारी येतो, तेव्हा अख्खी सिस्टीम कशी थरथर कापते, हे आपण सध्या अनुभवत आहोत. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंडे सध्या संपूर्ण देशात चर्चेत आहेत. 

पदभार स्वीकारताच अवघ्या दोन आठवड्यांत तुकाराम मुंडे यांनी घेतलेले धडाकेबाज निर्णय आणि कारवायांमुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात आशेचा एक नवा किरण जागा झाला आहे. प्रतिबंधित गुटखा, निकोटीन विकणाऱ्या संघटित टोळ्यांवर थेट मकोका (MCOCA) लावणं असो किंवा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबद्दल पतंजलीसारख्या बड्या ब्रँडला दणका देणं असो, मुंडेंच्या कारवाईचा धडाका सध्या संपूर्ण देश कौतुकाने पाहत आहे.
 

जेव्हा सिस्टीम शेषन यांच्या नावाने थरथरायची!
तुकाराम मुंडेंचा हा धडाका पाहून आजच्या पिढीला जुन्या काळातील एका महामेरूची आठवण येणे अगदी स्वाभाविक आहे. ते नाव म्हणजे टी. एन. शेषन! भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त. आज जेव्हा निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर आणि निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात, तेव्हा शेषन यांची आठवण अधिक तीव्र होते. 

११९० पूर्वी निवडणूक आयोग फक्त नावालाच अस्तित्वात होता. निवडणुकांमध्ये पैशांचा पाऊस पाडणे, मतदारांना लाच देणे आणि बूथ कॅप्चरिंग करणे ही सर्वसामान्य गोष्ट झाली होती. पण टी. एन. शेषन नावाचा हा निर्भीड अधिकारी खुर्चीवर बसला आणि त्यांनी संविधानाने निवडणूक आयोगाला दिलेले अधिकार काय असतात, हे संपूर्ण देशाला दाखवून दिले. त्यांनी आचारसंहितेचा असा बडगा उगारला की बडे-बडे राजकारणी आणि भ्रष्ट सिस्टीम त्यांच्या नावाने थरथरायची. शेषन यांनी निवडणुकांना केवळ एक प्रक्रिया न ठेवता, त्याला लोकशाहीचा खरा उत्सव बनवले.

टी. एन. शेषन आणि तुकाराम मुंडे या दोन्ही अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीमध्ये एक अद्भूत साम्य आढळते. ते म्हणजे, पदाचा आणि अधिकाराचा जनहितासाठी केलेला पुरेपूर वापर! दोन्ही अधिकाऱ्यांनी कधीही सत्तेसमोर किंवा राजकीय दबावासमोर मान झुकवली नाही. 'नो-नॉनसेन्स अ‍ॅटिट्युड' ही या दोघांची खरी ओळख. 

शेषन यांच्या काळात राजकारण्यांना आचारसंहितेचे पालन करावेच लागायचे, अन्यथा निवडणूक रद्द करण्याची ताकद शेषन यांच्यात होती. आज तोच बाणेदारपणा तुकाराम मुंडेंच्या कारवाईत दिसतोय. २००५ च्या बॅचचे आयएएस (IAS) अधिकारी असलेल्या मुंडेंची त्यांच्या २१ वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल २५ वेळा बदली झाली आहे. या बदल्या म्हणजेच त्यांच्या प्रामाणिकपणाचे आणि तडजोड न करणाऱ्या स्वभावाचे प्रमाणपत्र आहे. 

याआधी अपंगत्व कल्याण विभागाचे सचिव असताना तुकाराम मुंडे यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे घेणाऱ्यांचे रॅकेट उद्ध्वस्त केले होते. सिस्टीम कितीही खराब असली, तरी एकटा अधिकारी संपूर्ण यंत्रणा कशी स्वच्छ करू शकतो, हे मुंडे यांनी संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे.
 
 
'सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र'
२५ मे रोजी तुकाराम मुंडे यांनी महाराष्ट्राच्या एफडीए (FDA) आयुक्तपदाची धुरा हाती घेतली. पदभार स्वीकारताच त्यांनी 'सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र' हे घोषवाक्य जाहीर केले. सण-उत्सवाच्या काळातच फक्त जागे होणारे एफडीएचे अधिकारी आता मुंडेंच्या कडक शिस्तीमुळे २४ तास काम करताना दिसत आहेत. 

तुकाराम मुंडेंची नजर इतकी तीक्ष्ण आहे की भेसळयुक्त दूध, पनीर, कृत्रिमरीत्या पिकवलेले आंबे, प्रतिबंधित गुटखा, तंबाखू, भेसळयुक्त खाद्यतेल आणि अस्वच्छ बर्फापासून बनवलेले आईस्क्रीम... यांपैकी काहीही त्यांच्या नजरेतून सुटू शकलेले नाही. राज्यातील १३ कोटी जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना त्यांनी थेट इशारा दिला आहे.

गुन्हेगारांना पळता भुई थोडी!
मुंडे यांनी केवळ आदेश दिले नाहीत, तर स्वतः मैदानात उतरून रणनीती आखली. अन्न आणि औषध या दोन्ही विभागांना एकाच वेळी कारवाया करण्याचे आदेश देण्यात आले. हा एका सुनियोजित रणनीतीचा भाग होता. मुंडे यांनी दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, २५ मे ते ११ जून या अवघ्या काही दिवसांत सुमारे ३५४ प्रतिष्ठानांची अचानक तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ३ कोटी २७ लाख रुपयांचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त केला. या काळात तब्बल २३५ एफआयआर (FIR) दाखल करण्यात आले आहेत. ३५० पेक्षा जास्त आरोपींना बेड्या ठोकल्या असून २७४ दुकाने/कारखाने सील केले आहेत.

पतंजलीला दणका 
तुकाराम मुंडेंच्या या धडाक्यातून बड्या कंपन्याही सुटू शकलेल्या नाहीत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, कोकण आणि छत्रपती संभाजीनगर येथे एकाच वेळी छापे टाकून पतंजलीच्या दिव्य फार्मसीने तयार केलेली औषधे जप्त करण्यात आली. यामध्ये दृष्टी आय ड्रॉप, गिलॉय घन वटी, कुटज घन वटी, सिस्टोग्रिट डायमंड टॅब्लेट्स आणि न्यूरोग्रिट गोल्ड कॅप्सूल अशा तब्बल ५१ लाख रुपयांच्या मालाचा समावेश आहे.

औषधे आणि जादुई उपायांसंबंधी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४ अंतर्गत, कोणत्याही आजारावर चमत्कारी इलाज किंवा गॅरंटीड उपचार असा दावा करून जाहिरात देण्यास बंदी आहे. पतंजलीने आपल्या जाहिरातींमधून असे दावे केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. 

या कारवाईनंतर पतंजलीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत सरकार आपल्याला टार्गेट करत असल्याचा आरोप केला. मात्र, शासनाने हा आरोप फेटाळून लावला असून तूर्तास कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आश्वासन दिले आहे. लोकांच्या आरोग्याशी खेळ होत असेल, तर कोणालाही विशेष सवलत दिली जाणार नाही, हा मुंडेंचा पवित्रा ठाम आहे.

पुण्यातील विषारी दारू कांड 
पदभार स्वीकारताच मुंडेंना पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील विषारी दारू दुर्घटनेचा आढावा घेतला. यामध्ये १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मुंडेंनी तातडीने पावले उचलत संबंधित ठिकाणे सील केली आणि कडक कारवाई सुरू केली. तपास करत असताना ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील रेक्स इंटरनॅशनलच्या गोदामातून तब्बल ६,००० किलो घातक मिथेनॉल जप्त करण्यात आले. याच मिथेनॉलचा पुरवठा बनावट दारू तयार करणाऱ्यांना केला जात होता. या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी एफडीएने राज्यातील ९३८ मद्य परवानाधारक दुकानांची तपासणी सुरू केली असून आतापर्यंत ६०० हून अधिक परवान्यांची तपासणी पूर्ण झाली आहे.
 

काय आहे मुंडेंची 'E3' रणनीती?
 
आपल्या या संपूर्ण मोहिमेबद्दल बोलताना तुकाराम मुंडे यांनी त्यांची 'E3' रणनीती स्पष्ट केली.
 
१. Empower People (जनतेला सक्षम करणे): अन्न सुरक्षितता आणि औषध कायद्यांबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करणे.
२. Enable Businesses (व्यावसायिकांना सहकार्य): कायद्याचे पालन करणाऱ्या प्रामाणिक व्यावसायिकांना व्यवसायासाठी सुलभ वातावरण देणे. मुंडे म्हणतात, "जे कायद्याचे पालन करतात, आम्ही त्यांचे मित्र आहोत. त्यांनी घाबरण्याची गरज नाही."
३. Enforce Laws (कायद्याची कठोर अंमलबजावणी): जे नियमांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर कायद्याचा अंतिम बडगा उगारणे. "अशा बेकायदेशीर लोकांना लपायला आता संपूर्ण महाराष्ट्रात जागा उरणार नाही," असा सज्जड दम त्यांनी दिला आहे.

देशातील सिस्टीम खराब झालीय म्हणून, कायद्याचा योग्य वापर करून ती कशी सुधारता येऊ शकते हे तुकाराम मुंडे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. बऱ्याच काळाने देशाला असा धडाडीचा लोकसेवक मिळाल्याने सर्वसामान्यांचा व्यवस्थेवरचा विश्वास पुन्हा एकदा दृढ होत आहे. 
 
कार्यकाळापेक्षा जास्त वेळा बदल्या होऊनही मुंडेंचा बाणा तसूभरही वाकला नाही, हेच त्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वात मोठे यश आहे. मुंडेंच्या या धडाकेबाज कारवायांमुळे टपऱ्यांपासून मोठमोठाली दुकाने बंद होऊ लागलीयेत. त्यांचा हा फॉर्म्युला जर देशभर राबवला गेला, तर भ्रष्टाचाराने पोखरलेली सिस्टीम पुन्हा एकदा ताठ कण्याने उभी राहील, यात शंका नाही.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter