डॉ. फातिमा सुलताना : राजस्तानात वाघांचा अधिवास परत मिळवून देणारी प्राध्यापिका

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 14 h ago
डॉ. फातिमा सुलताना
डॉ. फातिमा सुलताना

 

नीलम गुप्ता

एक काळ असा होता, जेव्हा राजस्थानातील कोटा, बुंदी आणि झालावाड या हाडोती प्रदेशात पसरलेली दर्रा आणि रामगडची जंगले ही वाघांचे निसर्गरम्य आश्रयस्थान असत. त्याचवेळी ही जंगले तत्कालीन राजांची शिकार भूमी म्हणूनही ओळखली जात. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मात्र या दोन्ही ओळखी हळूहळू पुसल्या गेल्या. 

सवाई माधोपूर जिल्ह्यातील रणथंबोरच्या जंगलाला राजस्थान सरकार आणि केंद्र सरकारने 'व्याघ्र प्रकल्प' म्हणून घोषित केले आणि त्याचे रक्षण केले. याउलट, दर्रा आणि रामगडची जंगले दुर्लक्षितच राहिली. परिणामी, या जंगलांमधून वाघ पूर्णपणे नामशेष झाले. मध्य प्रदेशातील गांधी सागर अभयारण्याला जोडणारा इथला नैसर्गिक वन्यजीव कॉरिडॉर कायमचा तुटला.

रणथंबोरपासून रामगड, दर्रा आणि थेट गांधी सागरपर्यंत पसरलेले सुमारे १७,००० चौरस किलोमीटरचे दाट जंगल एकेकाळी सलग पसरलेले होते. तेथे वाघ मुक्तपणे संचार करत असत. काळाच्या ओघात ही पर्यावरणीय साखळी पूर्णपणे नष्ट झाली. गेल्या दहा वर्षांत मात्र या परिस्थितीला कलाटणी मिळण्यास सुरुवात झाली आहे. 
 

पूर्वी अवघ्या २५० चौरस किलोमीटरवर पसरलेल्या दर्रा अभयारण्याचा विस्तार आज सुमारे ८०० चौरस किलोमीटरपर्यंत झाला आहे. आता या अभयारण्याचे रूपांतर 'मुकुंदरा हिल्स टायगर रिझर्व्ह'मध्ये झाले आहे. तसेच, रामगड अभयारण्य आता 'रामगड विषधारी टायगर रिझर्व्ह' म्हणून ओळखले जाते.

हा अभूतपूर्व बदल कसा घडला?
या यशाचे बहुतांश श्रेय कोटा येथील जेडीबी महिला महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्राच्या माजी प्राध्यापिका आणि संशोधक डॉ. फातिमा सुलताना यांच्या अतुलनीय संशोधनाला जाते.

प्रा. सुलताना आपल्या आठवणींना उजाळा देत सांगतात, "मी १९८८ मध्ये कोटा येथील शासकीय महाविद्यालयातून प्राणशास्त्र विषयात एम.एससी. पूर्ण केले. मी वर्गात प्रथम आले होते. त्यामुळे माझी तत्काळ बारान येथील शासकीय महाविद्यालयात व्याख्याता म्हणून नियुक्ती झाली. नोकरीच्या काळात माझ्या चार वेळा बदल्या झाल्या. त्यापैकी एक नियुक्ती झालावाड येथे होती."

कोटा आणि झालावाड दरम्यान रस्ता मार्गाने सतत प्रवास करताना दर्रा येथील समृद्ध जंगलाने त्यांना भुरळ घातली. "मी संशोधन केलेच, तर याच जंगलांवर करेन, असा विचार माझ्या मनात वारंवार यायचा," असे त्या सांगत.

या प्रवासाला खरा वळण मिळाले ते जोधपूर येथील एका उजळणी वर्गादरम्यान. तेथे त्यांची भेट वन्यजीव तज्ज्ञ प्रा. पी. पी. बडकरे यांच्याशी झाली. त्यांनी उपस्थितांना रणथंबोरच्या परिसंस्थेची माहिती दिली.

"मी त्यांना दर्रा अभयारण्यावर संशोधन करण्याची माझी इच्छा बोलून दाखवली. त्यावर ते हसले आणि म्हणाले, 'हे काम अत्यंत कठीण आहे. ते तुला जमणार नाही.' मी लगेच उत्तर दिले, 'मी कठोर परिश्रम करायला तयार आहे.'"

त्यांना आपले कौशल्य सिद्ध करायचे होते. त्यांनी कोटा येथील जेडीबी महिला महाविद्यालयात डॉ. अनुराधा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी.साठी नोंदणी केली. त्यांच्या संशोधनाचा विषय "राजस्थानच्या हाडोती प्रदेशातील दर्रा अभयारण्यातील प्राणी विविधतेचा अभ्यास" असा होता. त्यांनी २००७ मध्ये आपली पीएच.डी. पूर्ण केली.
 

संशोधन पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या प्रबंधाच्या प्रती कोटा येथील वन व वन्यजीव विभाग आणि जयपूर येथील मुख्यालयात सादर केल्या. त्या म्हणतात, "माझ्या या संशोधनामुळे वनविभागाने पहिल्यांदाच दर्राच्या पर्यावरणीय महत्त्वाची गंभीर दखल घेतली आणि चर्चा सुरू केली."

त्यानंतर लगेचच त्यांना राजस्थानच्या वनविभागाकडून एक अधिकृत पत्र मिळाले. त्यात त्यांना 'पर्यावरणशास्त्रज्ञ' म्हणून संबोधित करण्यात आले होते. या प्रदेशात वाघांचे पुनर्वसन शक्य आहे का आणि ते कसे करता येईल, याचा सविस्तर अहवाल तयार करण्याची विनंती वनविभागाने त्यांना केली.

"मी फेब्रुवारी २०१२ मध्ये माझा अहवाल सादर केला. त्यातील शिफारशींच्या आधारे राजस्थान सरकारने एप्रिल २०१३ मध्ये या क्षेत्राला 'मुकुंदरा हिल्स टायगर रिझर्व्ह' म्हणून घोषित केले. त्यानंतर लगेचच रणथंबोर येथील दोन वाघांना येथे आणण्यात आले." तथापि, आणखी एक पर्यावरणीय आव्हान बाकी होते.

रणथंबोरमधील वाघांची वाढती संख्या पाहता त्यांना अधिक मोठ्या अधिवासाची गरज होती. यासाठी रणथंबोर आणि मुकुंदरा यांच्या दरम्यान असलेले रामगड विषधारी अभयारण्य पुनरुज्जीवित करणे गरजेचे होते. या अभयारण्याचा विकास केल्यास एक सुरक्षित वन्यजीव कॉरिडॉर तयार होणार होता. यामुळे वाघ आणि इतर प्राणी सुरक्षितपणे संचार करून नवीन प्रदेशात आपले स्थान निर्माण करू शकत होते.

"वनविभागाने मला रामगड विषधारी अभयारण्यासाठीही असाच अधिवास संभाव्यता अहवाल तयार करण्यास सांगितले," प्रा. सुलताना सांगतात. "मी २०२२ मध्ये हा अहवाल सादर केला. माझ्या शिफारशी या व्यवस्थापन योजनेचा मुख्य पाया ठरल्या. मी या प्रकल्पात डेटा विश्लेषक आणि तांत्रिक तज्ज्ञ म्हणूनही योगदान दिले."

आज रामगड विषधारी हे केवळ एक वन्यजीव अभयारण्य राहिलेले नाही. ते वाघांच्या संरक्षणासाठीचे एक अत्यंत महत्त्वाचे केंद्र बनले आहे. प्रा. सुलताना म्हणतात, "आता रणथंबोरचा वाघ रामगडमार्गे मुकुंदरा हिल्समध्ये सुरक्षितपणे जाऊ शकतो आणि नैसर्गिकरीत्या परत येऊ शकतो. हे केवळ वन्यजीवांसाठीच नव्हे, तर निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठीही फायदेशीर ठरले आहे. पर्यटक आता या तिन्ही जंगलांच्या सुंदर पट्ट्यात ३ ते ४ दिवस घालवू शकतात."
 

प्रा. सुलताना आपल्या या यशाचे श्रेय वन्यजीवांबद्दलच्या आपल्या आजीवन ध्यासाला देतात. "वनविभागाकडे या अभयारण्यांबद्दलची विखुरलेली माहिती होती. परंतु वाघांच्या पुनर्वसनासाठी मार्गदर्शन करू शकेल असा कोणताही एकत्रित वैज्ञानिक दस्तऐवज नव्हता. म्हणूनच त्यांनी माझे अहवाल स्वीकारले."

आपल्या डॉक्टरेटच्या संशोधनादरम्यान आलेल्या अथांग अडचणींची आठवण त्या सांगतात. प्रा. सुलताना म्हणतात, "मी जेव्हा संदर्भासाठी साहित्य शोधू लागले, तेव्हा कोटा किंवा जयपूरमधील ग्रंथालयांमध्ये आणि सरकारी कार्यालयांमध्ये काहीही उपलब्ध नव्हते. अगदी डेहराडूनच्या 'वाइल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'मध्येही माहिती नव्हती. मला मिळालेल्या एकमेव संदर्भामध्ये फक्त दर्रा अभयारण्याचे भौगोलिक स्थान दर्शवणारे अक्षांश आणि रेखांश दिले होते."

विशेष म्हणजे, तेथे काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनाही या क्षेत्राबद्दल फारशी माहिती नव्हती. अखेर कोटा वनविभागाच्या अभिलेखागारात त्यांना १९१८ सालातील एक दुर्मीळ दस्तऐवज सापडला. त्यातून ऐतिहासिक माहिती मिळाली. तरीही अभयारण्यातील वनस्पती आणि प्राण्यांची सद्यस्थिती नोंदवण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष जंगलात जाऊन खूप काम करावे लागले.

प्रा. सुलताना सांगतात, "माझ्यावर अध्यापनाची जबाबदारी असल्याने मी फक्त सुट्टीच्या दिवशीच जंगलात जाऊ शकत होते. कधीकधी माझे पती माझ्यासोबत येत असत. माझी मुलगी खूप लहान होती, त्यामुळे मला तिला अनेकदा सोबत न्यावे लागे. मी तिला वन अधिकाऱ्याच्या कार्यालयात बसवून जंगलात निघून जात असे. संध्याकाळी उशिरा परतताना, माझी मुलगी सुरक्षित आहे ना हे पाहण्यासाठी मी धावत सुटत असे."

त्या दिवसांची आठवण काढून प्रा. सुलताना हसतात.  त्या म्हणतात, "मी या संशोधनासाठी किती वेडी होते, याचे मला कधीकधी नवल वाटते. संशोधनाच्या ध्यासापोटी मी माझ्या लहान मुलालाही धोक्यात टाकले होते."

वाघांच्या परिसंस्थेशिवाय, प्रा. सुलताना यांनी युजीसीच्या अनुदानातून दर्राच्या जंगलात मोठ्या संख्येने आढळणाऱ्या अस्वलांच्या परिसंस्थेवर आणि जैवविविधतेवर एक स्वतंत्र अभ्यास केला. या संशोधनामुळे त्यांना ग्रीस आणि जपानमधील आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये आपले शोधनिबंध सादर करण्यासाठी निमंत्रणे मिळाली.

"मी जगभरातील शास्त्रज्ञांसमोर माझे शोधनिबंध सादर केलेच, शिवाय अनेक तांत्रिक सत्रांचे अध्यक्षपदही भूषवले. ते माझ्या आयुष्यातील अत्यंत अभिमानास्पद क्षण होते. माझ्या कष्टाचे चीज झाले याची जाणीव मला झाली."

प्रा. सुलताना फेब्रुवारी २०२६ मध्ये अंता येथील शासकीय महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावरून निवृत्त झाल्या. त्याआधी त्यांनी कोटा येथील जानकी देवी बजाज (जेडीबी) महिला महाविद्यालयात सुमारे २८ वर्षे सेवा बजावली. तेथे त्यांनी प्राणशास्त्र विभागाच्या प्रमुख आणि नंतर प्राचार्य म्हणून काम पाहिले.

आपल्या कार्यकाळात त्यांनी प्राणशास्त्राच्या अभ्यासक्रमात 'फॉरेस्ट्री अँड वाइल्डलाईफ मॅनेजमेंट' (वनविद्या आणि वन्यजीव व्यवस्थापन) हा विशेष विषय सुरू केला.

प्रा. सुलताना म्हणतात, "प्राणशास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी शिक्षिका होण्यापूर्वी वन्यजीव संरक्षणाची सखोल माहिती मिळवावी, अशी माझी इच्छा होती."

त्यांचा हा उपक्रम अतिशय यशस्वी ठरला. त्या पुढे म्हणतात, "आमच्या महाविद्यालयातील अनेक मुलींनी हा विषय निवडला. आज सवाई माधोपूरसह संपूर्ण राजस्थानमधील अनेक महाविद्यालयांनी या विषयाचा आपल्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे."
 

यापूर्वी, २०१० मध्ये त्यांच्याच प्रयत्नांमुळे कोटा विद्यापीठात एका स्वतंत्र 'वन्यजीव विभागा'ची स्थापना झाली होती. प्रा. सुलताना यांनी केवळ शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू केले नाहीत, तर अनेक परिषदा, कार्यशाळा आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना वन्यजीव आणि चंबळ नदी प्रणाली व तिच्या उपनद्यांचा अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित केले.

त्यांच्या कार्यामुळे अनेक पिढ्यांमधील संशोधकांना या भागातील समृद्ध जैवविविधतेचा शोध घेण्याची प्रेरणा मिळाली. आजपर्यंत त्यांनी ५० हून अधिक एम.फिल. आणि पीएच.डी. संशोधकांना मार्गदर्शन केले आहे. तसेच त्यांचे १०० हून अधिक शोधनिबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. वन्यजीव संशोधन हा त्यांचा वैयक्तिक ध्यास असला, तरी त्याचा प्रभाव शैक्षणिक क्षेत्रापुरता मर्यादित राहिला नाही.

त्यांच्या कार्याने हाडोती प्रदेशातील संरक्षण व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणला आहे. परिसंस्थेच्या पुनरुज्जीवनामुळे इको-टुरिझमच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. वन्यजीवांचे रक्षण मजबूत झाले असून दीर्घकाळ दुर्लक्षित असलेली जंगले पुन्हा बहरली आहेत. एकेकाळी राजांची शिकार भूमी असलेली ही जंगले आता सुरक्षित अधिवास बनली आहेत. येथे वाघ आणि इतर असंख्य प्रजाती मुक्तपणे वावरत आहेत.

उच्च शिक्षणात वन्यजीव अभ्यासाचा समावेश करून त्यांनी मध्य प्रदेशपर्यंत पसरलेल्या हजारो चौरस किलोमीटरच्या जंगलात आणि नदी परिसंस्थेत भविष्यातील संशोधनाची भक्कम पायाभरणी केली आहे.

भविष्यातील संशोधकांना आता संदर्भासाठी डेहराडूनला जाण्याची गरज उरलेली नाही, असे त्या सांगतात. कारण या प्रदेशाची संपूर्ण माहिती आता स्थानिक पातळीवरच उपलब्ध आहे.

वन्यजीव संरक्षण, पर्यावरणीय संशोधन आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या या अभूतपूर्व योगदानाबद्दल त्यांना १४ हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

प्रा. सुलताना आपल्या विद्यार्थिनींना नेहमी देत असलेला संदेश सांगून शेवटी म्हणतात, "मी माझ्या मुलींना नेहमी सांगते की, 'मी फक्त एक मुलगी आहे,' असा विचार कधीही करू नका. मीसुद्धा एक मुलगीच होते, पण आज मी काय साध्य केले आहे ते पहा. माझे वन्यजीव संशोधन, माझे शोधनिबंध आणि माझी पुस्तके ही सर्व कामे मी माझी महाविद्यालयीन जबाबदारी सांभाळून पूर्ण केली. मी ज्या ज्या संस्थेत काम केले, तिथे काहीतरी नवीन निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जर मी हे करू शकते, तर तुम्हीही नक्कीच करू शकता."
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter