मनिला
दक्षिण फिलिपिन्समधील मुस्लिमबहुल 'बांसामोरो स्वायत्त प्रदेशात' (Bangsamoro Autonomous Region in Muslim Mindanao) सोमवारी पहिली ऐतिहासिक संसदीय निवडणूक पार पडली. गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेला हिंसाचार आणि बंडखोरीचा मार्ग सोडून स्वायत्तता आणि लोकशाहीच्या दिशेने टाकलेले हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
इथल्या मुख्य शहरांमध्ये मतदारांनी अत्यंत उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावला. मुख्य शहरांपैकी एक असलेल्या कोटाबाटो येथे मतदान केंद्रावर झालेल्या किरकोळ गदारोळात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर रविवारी रात्री झालेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला. या काही तुरळक घटना वगळता बहुतांश भागांत मतदान अत्यंत शांततेत पार पडल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
ख्रिश्चनबहुल लोकसंख्या असलेल्या फिलिपिन्स देशात स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी करणाऱ्या सर्वात मोठ्या मुस्लिम बंडखोर गटाने २०१४ मधील शांतता करारांतर्गत व्यापक स्वायत्ततेच्या मोबदल्यात आपली ही मागणी मागे घेतली होती. या करारांतर्गत सुमारे ४० हजार बंडखोरांनी शस्त्रे खाली ठेवून नागरी जीवनात प्रवेश करण्याचे आणि मुख्य प्रवाहात सामील होण्याचे मान्य केले होते.
१९७० च्या दशकापासून दक्षिण फिलिपिन्समध्ये झालेल्या संघर्षात सुमारे दीड लाख लढाऊ आणि सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर देशातील हा सर्वात गरीब प्रदेश विकासापासून वंचित राहिला होता. अल-कायदा आणि इसिस (IS) सारख्या जहाल संघटनांचा प्रभाव असलेल्या या भागात शांतता प्रस्थापित होणे संपूर्ण आशिया खंडाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोलाचे मानले जात आहे.
या निवडणुकीत प्रादेशिक संसदेच्या ८० जागांसाठी मतदान पार पडले. या प्रदेशात पाच प्रांत, तीन शहरे आणि ६३ गावे समाविष्ट असून, सुमारे २४ लाख नोंदणीकृत मतदार आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, तब्बल ८० टक्के मतदानाची नोंद होण्याची शक्यता आहे.
संसदेच्या पहिल्याच सत्रात निवडून आलेले प्रतिनिधी या प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांची (Chief Minister) निवड करतील. निवडणुकीच्या सुरक्षेसाठी २० हजारांहून अधिक सैनिक आणि पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. निवडणूक आयोगाचे अध्यक्ष एरविन गार्शिया यांनी सांगितले की, "बांसामोरो जनतेने स्वतःची ओळख आणि आत्मनिर्णयाच्या हक्कासाठी केलेल्या अनेक पिढ्यांच्या संघर्षाचा हा ऐतिहासिक क्षण आहे."