अस्मा अन्सारी : फॅशन विश्वातील पारंपरिक समजांना मोडीत काढणारी उद्योजिका

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
मऊच्या अस्मा नफीस अन्सारी यांनी स्थापन केलेल्या एएनए ब्रँडची शार्क टँक इंडियापर्यंतची यशोगाथा
मऊच्या अस्मा नफीस अन्सारी यांनी स्थापन केलेल्या एएनए ब्रँडची शार्क टँक इंडियापर्यंतची यशोगाथा

 

ओनिका माहेश्वरी

"नकाब आणि अबाया बनवून विकण्याने काय कुणी उद्योगविश्वात स्वतःचा ठसा उमटवू शकते?" असा प्रश्न कुणालाही सुरुवातीला पडू शकतो. पण उत्तर प्रदेशातील मऊ या लहानशा जिल्ह्यातील अस्मा नफीस अन्सारी यांच्या यशोगाथेने हा समज पुरता मोडीत काढला आहे. स्वतःची जिद्द, मेहनत अन् धैर्याच्या बळावर अस्मा यांनी आज देशभरातील हजारो तरुण-तरुणींसमोर प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे.

'आवाझ द व्हाइस'शी बोलताना अस्मा सांगतात, "याच नकाब आणि अबायांच्या निर्मितीतून मी थेट 'शार्क टँक इंडिया'सारख्या प्रसिद्ध आणि मोठ्या व्यासपीठापर्यंत मजल मारली!"

मऊसारख्या लहानशा शहरातून निघून देशातील सर्वात मोठ्या बिझनेस रिॲलिटी शोपर्यंत पोहोचणे अजिबात सोपे नव्हते. मोठे यश मिळवण्यासाठी मोठ्या शहरातच जावे लागते, हा भ्रम अस्मा यांनी मोडून काढला. हिजाब अन् नकाब परिधान करणाऱ्या या तरुणीने सिद्ध केले की, स्वप्ने पूर्ण करायला बड्या शहरांपेक्षा मनातील ठाम निश्चय जास्त महत्त्वाचा असतो.
 

एनआयएफटी कोलकात्यापासून कॉर्पोरेट दुनियेपर्यंतचा प्रवास
अस्मा यांच्या या अद्भूत प्रवासाची पायाभरणी २०१७ मध्ये झाली. कोलकाता येथील प्रतिष्ठित 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी' (NIFT) मधून त्यांनी फॅशन डिझायनिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या उत्कृष्ट कलागुणांमुळे त्यांना 'बेस्ट ग्रॅज्युएशन अवॉर्ड'ने सन्मानित करण्यात आले होते.

शिक्षण संपताच त्यांना गुरुग्राममधील 'नॉटी नाटी' (Nauti Nati) या लहान मुलांच्या प्रसिद्ध ब्रँडमध्ये डिझायनर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. करिअरची गाडी उत्तम रुळावर धावत होती. पण गुरुग्राममध्ये घडलेल्या एका कटू प्रसंगाने त्यांचे विचार पूर्णपणे बदलून टाकले. त्यांच्या पोशाखावर अन् नकाबवर काहींनी अत्यंत अयोग्य टिप्पणी केली. या घटनेने त्यांच्या स्वाभिमानाला मोठा धक्का बसला.

आपल्या आवडीचा पोशाख परिधान करणे हा प्रत्येक स्त्रीचा वैयक्तिक अधिकार आहे अन् कपड्यांवरून कोणाच्याही क्षमतेचा अंदाज लावला जाऊ शकत नाही, याची जाणीव त्यांना झाली. याच वळणावर त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील ती आरामदायी नोकरी सोडून स्वतःचा वेगळा मार्ग निवडला.

मऊ शहरात पुनरागमन अन् 'एएनए'चा जन्म
गुरुग्राममधील नोकरी सोडून अस्मा आपल्या गावी मऊ येथे परतल्या. तिथे राहून त्यांनी धार्मिक ग्रंथांचा आणि विश्लेषणाचा सखोल अभ्यास केला. कुराणातील सुरह अन-नूरचा अभ्यास करताना त्यांना समजले की, पडदा किंवा हिजाब हा कमकुवतपणा नसून तो स्त्रीच्या सन्मानाचे आणि आत्मसन्मानाचे प्रतीक आहे.

याच विचाराने प्रेरित होऊन त्यांनी स्वतःचा मोडेस्ट क्लोथिंग (आच्छादित अन् सन्मानजनक कपडे) ब्रँड सुरू करण्याचा निर्णय घेतला. ऑक्टोबर २०२० मध्ये त्यांनी एएनए या ब्रँडची पायाभरणी केली. उर्दू भाषेत एएनएचा अर्थ स्त्रीचा स्वाभिमान, तिचे मूळ अस्तित्व आणि आत्मसन्मान असा होतो. त्यांच्या विचारांशी अन् ब्रँडच्या ध्येयाशी हे नाव तंतोतंत जुळणारे होते.
 

तीन बहिणींची साथ अन् सोशल मीडियाची क्रांती
एका छोट्या कस्टम-मेड प्रोजेक्टपासून सुरू झालेल्या या प्रवासाला अस्मा यांच्या दोन लहान बहिणी- झोहरा नफीस आणि बुशरा नफीस यांची मोलाची साथ मिळाली. या तिन्ही बहिणींनी सोशल मीडियाचे, विशेषतः इन्स्टाग्रामचे महत्त्व ओळखले आणि आपल्या डिझाईन्स डिजिटल प्लॅटफॉर्मवर सादर करण्यास सुरुवात केली.

थोड्याच दिवसांत भारतभरातूनच नव्हे तर परदेशातूनही तरुण महिला त्यांच्या ब्रँडशी जोडल्या गेल्या. पुढे अस्मा यांचे पती झीशान करीम हेही या व्यवसायात सहभागी झाले आणि कंपनीच्या व्यवस्थापनाला अधिक बळकटी मिळाली. मऊ शहरात अगदी छोट्या स्तरावर सुरू झालेल्या या स्टार्टअपने आज ३० हून अधिक लोकांना थेट रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

त्यांच्या या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली. माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्या हस्ते त्यांना फिक्की फ्लो युपी वुमन अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले. तसेच 'वुमन लीडर्स फोरम'मध्ये त्यांना 'वुमन आंत्रप्रिझर ऑफ द इयर २०२३' या पदवीने सन्मानित करण्यात आले.

तीन वर्षे नकाराचा सामना अन् शार्क टँकमधील यश
'शार्क टँक इंडिया'च्या मंचावर पोहोचणे अस्मा यांच्यासाठी एखाद्या स्वप्नासारखे होते. पण ही वाट अजिबात सोपी नव्हती. त्या सांगतात, "शार्क टँकच्या मंचावर पोहोचण्यासाठी मला सलग तीन वर्षे नकाराचा सामना करावा लागला होता."

दरवर्षी त्यांचा अर्ज नाकारला जायचा. पण हार मानण्याऐवजी त्या प्रत्येक अपयशातून शिकल्या अन् आपल्या डिझाईन्समध्ये सुधारणा करत राहिल्या.

अखेर चौथ्या वर्षी त्यांच्या 'एएनए' ब्रँडला शार्क टँकसमोर स्वतःचा व्यवसाय मांडण्याची संधी मिळाली. मऊच्या या लेकीने जेव्हा आपली कहाणी अन् बिझनेस मॉडेल देशातील बड्या उद्योगपतींसमोर मांडले, तेव्हा सर्व शार्क (गुंतवणूकदार) तिच्या जिद्दीने अन् कल्पकतेने प्रभावित झाले.

एएनए ॲपेरल्स : परंपरा अन् आधुनिकतेचा मेळ
आज 'एएनए ॲपेरल्स' तरुण महिलांच्या पसंतीस उतरत आहे. हा ब्रँड केवळ पारंपरिक हिजाब आणि अबाया न बनवता आधुनिक डिझाईन्स आणि ट्रेंडी लुकवर भर देतो.

कलात्मक कामगिरी : प्लेटेड स्लीव्हज असलेला काळा बंद अबाया आणि नाजूक भरतकाम असलेला राखाडी रंगाचा ओपन अबाया हे या ब्रँडचे सर्वात लोकप्रिय डिझाईन्स बनले आहेत.

वाजवी दर अन् कस्टम डिझाईन : प्रीमियम क्वालिटीचे कपडे असूनही दर सर्वांच्या खिशाला परवडणारे ठेवले आहेत, शिवाय ग्राहकांच्या आवडीनुसार कस्टम डिझाईनही बनवून दिले जातात.

फॅशन कन्सल्टेशन : अस्मा केवळ कपडे विकत नाहीत, तर त्या महिलांशी थेट संवाद साधून त्यांना फॅशनबाबत मोलाचा सल्लाही देतात.

अस्मा यांच्या मते, अबाया हा केवळ शरीर झाकणारा कपडा नसून, तो स्त्रीची संस्कृती, तिचे व्यक्तिमत्त्व आणि तिचा आत्मविश्वास व्यक्त करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे.

मऊ शहरातील एका छोट्याशा दुकानापासून सुरू झालेला हा प्रवास आज देशातील मोठ्या शहरांमध्ये फ्लॅगशिप स्टोअर्स उघडण्याच्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रँडचा विस्तार करण्याच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे.

जिद्द आणि आत्मसन्मान जपत पुढे निघाल्यास कोणतेही संकट प्रगतीचा मार्ग रोखू शकत नाही, हेच अस्मा नफीस अन्सारी यांच्या यशोगाथेने संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter



Latest News