BIHAR FLOODS: १५ जिल्ह्यांतील ४७ लाखांहून अधिक नागरिक प्रभावित, तटबंध फुटल्याने खळबळ

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
बिहारमध्ये पूरस्थिती गंभीर
बिहारमध्ये पूरस्थिती गंभीर

 

पाटणा 

बिहारमधील पूरस्थिती शुक्रवारी अधिकच गंभीर बनली असून, १५ जिल्ह्यांतील ४७ लाख ३३ हजारांहून अधिक नागरिक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. गंगा आणि तिच्या उपनद्या धोकादायक पातळीवरून वाहत असल्यामुळे अनेक ठिकाणी तटबंध (embankments) फुटण्याच्या आणि धूप होण्याच्या घटना घडल्या आहेत. विशेषतः भागलपूर जिल्ह्यात तटबंधांना चार ठिकाणी मोठे तडे गेल्याचे समोर आले आहे.

भागलपूरमधील गोपालपूर ब्लॉकमधील ब्रम्होत्तर धरणाला पडलेला तडे जलसंपदा विभागाच्या तांत्रिक टीमने आणि स्थानिकांच्या मदतीने रात्रीभर मेहनत घेऊन नियंत्रणात आणले. मात्र, रंगरा ब्लॉकमधील धोबनिया जमींदारी धरणाला मोठा पाझर फुटल्यामुळे पुराचे पाणी रस्ते आणि वस्तीत शिरले. उपमुख्यमंत्री विजय कुमार चौधरी यांनी सर्व तटबंधांवर चोवीस तास कडक नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पाटण्यातील गांधी घाटाजवळ गंगेची पाणीपातळी २०१६ च्या उच्चांकी पातळीला ओलांडून अजूनही वर जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रशासकीय मदत आणि बचाव कार्य

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यभरात १ हजार २२१ कम्युनिटी किचन चालवले जात असून, १५ मदत छावण्यांमध्ये १२ हजारहून अधिक नागरिकांच्या राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली आहे. स्थलांतर आणि वाहतुकीसाठी १ हजार ८७६ बड्या नावा चालवल्या जात आहेत. तसेच जवळपास ४८ हजार ४०० कोरड्या शिधा किट आणि १० हजार ८२३ क्विंटल पशू खाद्य वाटप करण्यात आले आहे. मदत आणि बचावासाठी राज्यभरात एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या एकूण ३७ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. हवामान विभागाने आगामी दोन दिवस काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.



Latest News