मुंबईतील २५० वर्षे जुन्या जामा मस्जिदीत सर्वधर्मीयांसाठी पार पडला मस्जिद परिचय कार्यक्रम

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 53 m ago
मुंबईच्या ऐतिहासिक जामा मशिदीत रबी-उल-अव्वलनिमित्त आयोजित 'मस्जिद परिचय' कार्यक्रमातील सहभागी पाहुणे
मुंबईच्या ऐतिहासिक जामा मशिदीत रबी-उल-अव्वलनिमित्त आयोजित 'मस्जिद परिचय' कार्यक्रमातील सहभागी पाहुणे

 

रबी-उल-अव्वल या पवित्र महिन्याच्या निमित्ताने दरवर्षी मुंबईत 'प्रॉफेट फॉर ऑल' हे विशेष अभियान राबवले जाते. पैगंबर मोहम्मद साहेबांनी दिलेला शांतता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश प्रत्येक धर्माच्या अन् समाजाच्या घटकापर्यंत पोहोचवणे हा यामागचा मुख्य उद्देश असतो. 

मोहम्मद साहेब हे फक्त मुस्लिमांसाठीच नव्हे, तर संपूर्ण मानवजातीसाठी दयाळूपणा अन् करुणेचे प्रतीक म्हणून आले होते, हा विचार घराघरांत पोहोचवण्यासाठी यंदा मुंबईच्या ऐतिहासिक जामा मशिदीत 'मस्जिद परिचय' या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील विविध सामाजिक आणि धार्मिक संस्थांनी एकत्र येत या उपक्रमाला भव्य स्वरूप दिले.

द्वेषाच्या काळात महत्वपूर्ण उपक्रम
या स्तुत्य उपक्रमाचे मुख्य संयोजक आणि नामांकित सामाजिक कार्यकर्ते सईद खान यांनी या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "आम्ही अनेक वर्षांपासून या कार्यक्रमाचे आयोजन करत आलो आहोत. सध्याच्या काळात काही लोकांकडून समाजात भेदभावाचे अन् द्वेषाचे विष कालवले जात आहे. धार्मिक स्थळांबाबत इतर धर्मीय बांधवांच्या मनात गैरसमज निर्माण केले जात असताना, हे सर्व गैरसमज दूर करणे आवश्यक होते. लोकांना मशिदीत बोलावून प्रेमाचा संदेश देण्यासाठीच आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन केले."

या कार्यक्रमात हिंदू धर्माशी जोडलेल्या अनेक राजकीय आणि सामाजिक व्यक्तींनी हिरिरीने सहभाग घेतला. आलेल्या सर्व पाहुण्यांना संपूर्ण मशिदीची सफर घडवून आणण्यात आली. नमाज कुठे अन् कशी पठण केली जाते, वझू (स्वच्छता) कुठे केले जाते आणि मशिदीमध्ये दैनंदिन पातळीवर काय-काय चालते, याची सविस्तर माहिती पाहुण्यांना देण्यात आली.
 

ऐतिहासिक वारसा 
या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले माजी आमदार कपिल पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मशिदीच्या महत्त्वाबद्दल सांगितले.

ते म्हणाले, "ही २५० वर्षे जुनी मशीद केवळ एक इमारत नाही... हा एक जिवंत इतिहास आहे, आपला वारसा आहे! पैगंबर साहेबांच्या समानता अन् एकतेच्या संदेशाची ही सुंदर निशाणी आहे. प्रत्येक मुंबईकराने, मग त्याचा धर्म कोणताही असो, इथे येऊन ही वास्तू नक्की पाहिली पाहिजे."

मंदिरासारखाच अनुभव अन् आपलेपणाची जाणीव
मुंबई फॉर पीस या सामाजिक संस्थांच्या महासंघाचे संयोजक समीर वाघले यांनी मशिदीतील आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, "हा अतिशय सुंदर आणि कौतुकास्पद उपक्रम आहे. हिंदू असूनही मला इथे आल्यावर अगदी मंदिरासारखाच आपलेपणा, सन्मान अन् प्रेम अनुभवता आले. इथे दिलेली माहिती अन् मिळालेले प्रेम थेट हृदयाला भिडणारे होते."

या अभियानाबद्दल पुढे बोलताना ते म्हणाले, "मला वाटते की हे अभियान असेच पुढे चालले पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा सुंदर अनुभव घेता येईल. वेगवेगळ्या धर्मांमधील बंधुभावाचे दृश्य असेच असायला हवे—उघडी दारे, खुली मने अन् दूर होणारे सर्व गैरसमज."
 

महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांचा रंजक अनुभव
राष्ट्रपिता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मशिदीच्या ऐतिहासिक बांधकामाबद्दल बोलताना त्यांनी एक रंजक माहिती शेअर केली.

ते म्हणाले, "सुमारे २५० वर्षांपूर्वी ही जामा मशीद ज्या जागेवर बांधली गेली, ती मूळ जमिनीची जागा नव्हतीच! तो एक मोठा तलाव होता आणि ती जागा वक्फ म्हणून दान करण्यात आली होती. मी जागा दान करणाऱ्याचे नाव विचारले, पण ते तात्काळ समजू शकले नाही. तलाव बुजवायचा नाही, अशी अट दानदाराने ठेवली होती. म्हणूनच मशिदीचे बांधकाम तलावावर दगडांच्या भक्कम खांबांवर करण्यात आले आहे. आजही मशिदीच्या खाली तो तलाव अस्तित्वात असून त्यात मासे आणि कासव छान पोहताना दिसतात."

मशिदीच्या शिल्पकलेचे कौतुक करत ते पुढे म्हणाले, "मशीद दिसायला अत्यंत भव्य अन् प्रेक्षणीय आहे. नमाजासाठी मोठा हॉल, मौलवींसाठी मेहराब आणि अत्यंत बारीक, सुंदर नक्षीकाम इथे पाहायला मिळते. इथले भव्य झुंबर अन् लाकडी दरवाजे मनाला भुरळ घालतात. मी मुंबईच्या एका मशिदीच्या वरच्या मजल्यावर बापू (महात्मा गांधी) उभे असलेला एक जुना फोटो पाहिला आहे. या जामा मशिदीचा एक भाग हुबेहूब त्या फोटोतील मशिदीसारखा दिसतो. मला तो फोटो शोधून बापू खरंच या जामा मशिदीत आले होते का, याची खात्री करावी लागेल."

सर्व धर्मीयांना एकत्र आणणाऱ्या या उपक्रमाचे त्यांनी मनापासून कौतुक केले.
 

पूर्वग्रहांचे कुंपण ओलांडणारा उपक्रम
मशिदीची सफर घडवून आणताना स्वयंसेवकांनी अत्यंत आदरयुक्त आणि प्रेमळ वातावरणात सर्व छोट्या-मोठ्या गोष्टींची माहिती दिली. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या एका शाळेच्या माजी मुख्याध्यापिकेने आपला अनुभव अत्यंत भावुकपणे मांडला.

त्या म्हणाल्या, "ही भेट माझ्या शाळेतील मुलांसाठीही खूप उपयोगी ठरणार आहे, कारण यामुळे लोकांची दृष्टिकोनाची चौकट बदलेल. 'मस्जिद परिचय' कार्यक्रमामुळे मला शांतता अन् प्रेमाचा एक वेगळाच अनुभव मिळाला. यातून मिळालेल्या सकारात्मक ऊर्जेमुळे माझी विचारसरणी पूर्णपणे बदलून गेली आहे."

'प्रॉफेट फॉर ऑल' अभियानाचा व्यापक संदेश
मशीद ही कोणत्याही धर्माच्या किंवा समाजाच्या व्यक्तीसाठी नेहमी खुली असते, हा मुख्य संदेश या उपक्रमाद्वारे देण्यात आला. केवळ मशिदीची ओळख करून देणे एवढ्यावरच न थांबता, पैगंबर मोहम्मद साहेबांचे विचार हे संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आणि शांततेसाठी आहेत, हा विचार मुंबईच्या विविध भागांत राबवलेल्या कार्यक्रमांतून प्रभावीपणे मांडण्यात आला.

सध्याच्या काळात सामाजिक सौहार्द टिकवून ठेवण्यासाठी अन् माणसांमधील दुरावा मिटवण्यासाठी असे 'मस्जिद परिचय' उपक्रम संपूर्ण देशासाठी नक्कीच दिशादर्शक ठरणारे आहेत.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter



Latest News