Apple iPhone Duo Launched In India: ॲपलचा सर्वात महागडा फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात, किंमत ऐकून व्हाल चकित

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 54 m ago
ॲपलचा सर्वात महागडा फोल्डेबल स्मार्टफोन
ॲपलचा सर्वात महागडा फोल्डेबल स्मार्टफोन

 

नवी दिल्ली 

ॲपल या जागतिक स्तरावरील आघाडीच्या टेक कंपनीने बुधवारी आपला पहिलाच फोल्डबल स्मार्टफोन 'आयफोन ड्यूओ' (iPhone Duo) अधिकृतपणे लाँच केला आहे. कंपनीच्या इतिहासातील हा सर्वात महागडा मोबाईल फोन असून, भारतात हा फोन येत्या २३ ऑक्टोबरपासून उपलब्ध होईल. कंपनीच्या निवेदनानुसार, या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत सुमारे ३ लाख रुपये (२,९९,९०० रुपये) ठेवण्यात आली आहे.

आयफोन ड्यूओ हा स्टार व्हाईट आणि नाईट स्काय या रंगांमध्ये उपलब्ध असून, तो २५६ जीबी, ५१२ जीबी, १ टीबी आणि २ टीबी स्टोरेज क्षमतांमध्ये खरेदी करता येईल. भारत, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीनसह ७० हून अधिक देशांमधील ग्राहकांसाठी १६ ऑक्टोबरपासून याची प्री-ऑर्डर सुरू होणार आहे, तर प्रत्यक्ष विक्री २३ ऑक्टोबरपासून सुरू होईल. याशिवाय, ॲपलने नवीन 'आयफोन १८ प्रो' आणि 'आयफोन १८ प्रो मॅक्स' हे मॉडेल देखील जाहीर केले असून, त्यांची भारतातील सुरुवातीची किंमत अनुक्रमे १,६४,९0० आणि १,७९,९0० रुपये आहे. या सिरीजची प्री-बुकिंग १२ सप्टेंबरपासून सुरू होणार असून १८ सप्टेंबरपासून बाजारपेठेत उपलब्ध होईल.

भारतातील ॲपलची विक्रमी कामगिरी

गेल्या काही काळापासून भारतात ॲपलच्या विक्रीत विक्रमी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये आयफोनच्या रेकॉर्ड शिपमेंटमुळे ॲपलचा भारतातील महसूल १० अब्ज अमेरिकन डॉलर (सुमारे १ लाख कोटी रुपये) ओलांडल्याचा अंदाज आहे. काऊंटरपॉइंट रिसर्चनुसार, २०२६ या आर्थिक वर्षात ॲपलचे आयफोन शिपमेंट २४ टक्क्यांच्या वाढीसह १४ दशलक्ष युनिट्सवर पोहोचले आहे. ॲपलच्या एकूण भारतीय महसुलामध्ये आयफोनचा वाटा सर्वाधिक आहे.