चेन्नई
भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रो (ISRO) आगामी काळात आपल्या मोहिमांचा मोठा विस्तार करणार असून, २०२९ पर्यंत देशात चार कार्यात्मक लाँच पॅड्स कार्यरत असतील, अशी महत्त्वाची घोषणा ISRO चे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी केली आहे. चेन्नई येथील एका विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात बोलताना त्यांनी इस्रोचा आगामी रोडमॅप स्पष्ट केला.
जागतिक पातळीवर उपग्रह प्रक्षेपणाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी तमिळनाडूतील तुतिकोरीन जिल्ह्यातील कुलसेकरापट्टिनम येथे २,००० एकरांवर स्वतंत्र स्मॉल सैटेलाइट लाँच व्हीकल (SSLV) कॉम्प्लेक्स उभारण्यात येत असल्याचे नारायणन यांनी सांगितले. इस्रोचे खाजगीकरण होणार नाही, परंतु व्यावसायिक आणि जागतिक गरजा पूर्ण करण्यासाठी खाजगी उद्योगांसोबत सहकार्य वाढवणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या इकोसिस्टमला हातभार लावण्यासाठी इस्रो स्टार्टअप्स आणि खाजगी उद्योगांना तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करणार आहे.
गगनयान मोहिमेबाबत बोलताना इस्रोप्रमुखांनी सांगितले की, आगामी दोन महिन्यांत पहिली मानवरहित गगनयान चाचणी घेतली जाईल. त्यानंतर मानवरहित दोन आणखी चाचण्या पार पडतील. या सर्व चाचण्यांनंतर प्रत्यक्षात मानवनिर्युक्त मोहीम हाती घेतली जाईल. या मोहिमेसाठी इस्रोने सुमारे ८,००० जमिनीवरील प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण केले असून, चार अंतराळवीर सध्या विशेष प्रशिक्षण घेत आहेत. याशिवाय, जपानच्या अंतराळ संस्थेसोबत मिळून 'चंद्रयान-५' मोहीम राबवली जाणार असून, यात ३५० किलो वजनाचा रोव्हर चंद्रावर पाठवला जाईल, जो १०० दिवस पृष्ठभागावर प्रयोग करेल.