Apple Pay Launch In India: भारतात 'ॲपल पे'ची धमाकेदार एंट्री, ॲक्सिस बँकेसोबत केली पार्टनरशिप

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 44 m ago
Apple Pay भारतात लाँच; ॲक्सिस बँकेसोबत केली भागीदारी
Apple Pay भारतात लाँच; ॲक्सिस बँकेसोबत केली भागीदारी

 

नवी दिल्ली 

अमेरिकेची अग्रगण्य तंत्रज्ञान कंपनी ॲपलने (Apple) ॲक्सिस बँकेच्या (Axis Bank) सहकार्याने भारताच्या डिजिटल पेमेंट मार्केटमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. कंपनीने बुधवारी भारतात आपली लोकप्रिय 'ॲपल पे' (Apple Pay) सेवा सुरू करण्याची घोषणा केली.

आयफोन आणि ॲपल वॉचवर उपलब्ध

आता आयफोन, आयपॅड आणि ॲपल वॉच वापरणारे युजर्स या सर्विसचा आनंद घेऊ शकतील, तर लवकरच मॅकसाठीही (Mac) याचे सपोर्ट मिळणार आहे. ॲपल पे आणि ॲपल वॉलेटच्या उपाध्यक्षा जेनिफर बेली यांनी सांगितले की, "भारत हा अत्यंत डायनॅमिक आणि डिजिटल साक्षर असलेला देश आहे, जो सुरक्षिततेला प्राधान्य देत कॅशलेस भविष्याकडे वाटचाल करत आहे. आज भारतात ॲपल पे आणताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे."

सुरक्षितता आणि मर्चंट पार्टनरशिप

ॲपल डिव्हाइस युजर्स स्टोअर्समध्ये, ॲप्सवर आणि वेबवर पिन किंवा ओटीपी टाईप न करता सहजपणे पेमेंट करू शकतील. ॲक्सिस बँकेचे व्हिसा आणि मास्टरकार्ड क्रेडिट कार्डधारक त्यांची कार्डे ॲपल पेमध्ये जोडू शकतात. भारतातील हजारो इन-स्टोअर आणि ऑनलाइन मर्चंट्स तसेच एनएफसी (NFC) व्यवहार स्वीकारणाऱ्या ठिकाणी ही सेवा वापरता येईल.

व्यवहारादरम्यान युजर्सचे प्रत्यक्ष कार्ड नंबर डिव्हाइसवर किंवा ॲपलच्या सर्व्हरवर सेव्ह केले जात नाहीत. त्याऐवजी एक युनिक डिव्हाइस अकाऊंट नंबर दिला जातो, जो एन्क्रिप्टेड स्वरूपात सुरक्षितपणे स्टोअर केला जातो. तसेच आयफोन हरवल्यास 'फाइंड माय' (Find My) ॲपच्या मदतीने तो पटकन शोधता, लॉक करता किंवा पेमेंट सस्पेंड करता येते. लाँचिंगच्या वेळी ब्लिंकइत, चायोस, क्रोमा, झोमॅटो, टाटा 1एमजी, रिलायन्स ब्रँड्स यांसह देशभरातील दशलक्ष मर्चंट्सवर ॲपल पे स्वीकारले जाईल.