सेमीकंडक्टर क्षेत्रात भारत बनणार जागतिक हब; पंतप्रधान नरेंद्र मोदींची 'सेमीकॉन इंडिया 2026' मध्ये मोठी घोषणा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 43 m ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

नवी दिल्ली 

भारतातील सेमीकंडक्टर परिसंस्थेचा (Ecosystem) वेगाने विस्तार होत असून जागतिक चिप उत्पादनासाठी भारत हा एक अत्यंत विश्वासार्ह आणि पसंतीचा पर्याय म्हणून समोर येत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 'सेमीकॉन इंडिया २०२६' (SEMICON India 2026) या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना त्यांनी जागतिक उद्योजकांना भारतात गुंतवणुकीचे आवाहन केले.

उद्योगांच्या यशासाठी आवश्यक असणारी सर्व धोरणात्मक आणि कायदेशीर मदत पुरवण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध असल्याचे पंतप्रधान म्हणाले. जागतिक स्तरावर सेमीकंडक्टर पुरवठा साखळीत विविधता आणण्याच्या प्रयत्नांमध्ये भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सेमीकंडक्टर मिशन २.० साठी १३.५ अब्ज डॉलरची तरतूद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, देशात आतापर्यंत १२ चिप निर्मिती प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे आणि आगामी टप्प्यात ही संख्या आणखी वाढेल. या क्षेत्राला अधिक गती देण्यासाठी 'इंडिया सेमीकंडक्टर मिशन २.०' (ISM 2.0) अंतर्गत निधीची तरतूद ८ अब्ज डॉलरवरून थेट १३.५ अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

या परिषदेदरम्यान 'ॲप्लाइड मटेरियल्स' (Applied Materials) या जागतिक आघाडीच्या कंपनीने 'व्हिजन २०३५' अंतर्गत भारतातील सेमीकंडक्टर क्षेत्राला जागतिक मूल्य साखळीशी जोडण्यासाठी ५ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा केली.

आर्थिक प्रगती आणि जागतिक विश्वास

भारतीय अर्थव्यवस्थेची जलद गतीने होणारी वाढ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतावरील वाढता विश्वास यांचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील जीडीपी (GDP) वाढीचा आणि जपानी रेटिंग एजन्सी 'जेसीआरए'ने (JCRA) भारताच्या क्रेडिट रेटिंगमध्ये केलेल्या सुधाराचा हवाला दिला.

केवळ चिप डिझायनिंग किंवा असेंबलीपुरते मर्यादित न राहता फेब्रिकेशन, ॲडव्हान्स पॅकेजिंग, संशोधन, उपकरणे आणि साहित्य या संपूर्ण सेमीकंडक्टर साखळीची देशातच उभारणी करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील परदेशी अवलंबित्व मोठ्या प्रमाणावर कमी होईल.