J&K Encounter 2026: उधमपूरच्या घनदाट जंगलात लष्कराची धडक कारवाई; जैश-ए-मोहम्मदचे २ दहशतवादी ठार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 31 m ago
धमपूरच्या घनदाट जंगलात भारतीय लष्कर
धमपूरच्या घनदाट जंगलात भारतीय लष्कर

 

जम्मू

जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्याच्या उंच आणि दुर्गम भागात गुरुवारी सुरक्षा दलांनी राबवलेल्या धडक संयुक्त कारवाईत 'जैश-ए-मोहम्मद' (JeM) या बंदी घातलेल्या संघटनेच्या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या एका संशयित ओव्हर-ग्राउंड वर्करलाही (OGW) ताब्यात घेण्यात आले आहे.

कठुआ जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मजालता परिसरातील ब्रात्तल सोहन आणि खुब्बनच्या घनदाट जंगलात मुसळधार पाऊस, धुके आणि प्रतिकूल हवामानाचा सामना करत भारतीय सैन्य, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने (CRPF) ही संयुक्त मोहीम फत्ते केली.

गुप्त माहितीच्या आधारे राबवले 'ऑपरेशन ब्रात्तल'

भारतीय लष्कराच्या व्हाईट नाईट कॉर्प्सने (White Knight Corps) दिलेल्या माहितीनुसार, १६ आणि १७ सप्टेंबरच्या दरम्यानच्या रात्री उधमपूरमधील ब्रात्तल भागात दहशतवादी लपल्याची पक्की गुप्त माहिती मिळाली होती. अत्यंत कठीण चढण आणि कमी दृश्यमानता असतानाही सुरक्षा दलांनी या भागाला वेढा घातला.

ठार करण्यात आलेल्या दोन्ही पाकिस्तानी अतिरेक्यांची ओळख पटली असून, त्यांची नावे सद्दाम आणि मुस्तफा अशी आहेत. घटनास्थळावरून एक एके-सिरीज असॉल्ट रायफल (AK-series rifle), अमेरिकेत तयार झालेली एम-४ कार्बाइन (M4 carbine), एक ग्लॉक पिस्तूल, ४ हँड ग्रेनेड आणि मोठा दारूगोळा हस्तगत करण्यात आला आहे.

नॉर्दर्न कमांडरकडून सुरक्षा दलांचे कौतुक

लष्कराच्या नॉर्दर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा यांनी व्हाईट नाईट कॉर्प्स, पोलीस आणि सीआरपीएफच्या या वेगवान व अचूक कारवाईचे कौतुक केले. जम्मू-काश्मीरला पूर्णपणे दहशतवादमुक्त करण्यासाठी लष्कर कटिबद्ध असल्याचे त्यांनी X (ट्विटर) वर नमूद केले.

गेल्या आठवड्यात जंगलात काही संशयितांची हालचाल दिसून आल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागावर बारीक लक्ष ठेवले होते. बुधवारी रात्री ९ च्या सुमारास परिसरात पुन्हा संशयित हालचाल जाणवल्यानंतर चकमकीला सुरुवात झाली. गुरुवारी सकाळी दहशतवाद्यांनी वेढा तोडून पळण्याचा प्रयत्न करत गोळीबार केला असता, सुरक्षा दलांनी प्रत्युत्तराखल केलेल्या कारवाईत दोन्ही अतिरेकी मारले गेले. या वर्षातील उधमपूरमधील ही दुसरी मोठी चकमक ठरली आहे.