अमली पदार्थ रोखण्यासाठी मोदी सरकारच्या प्रयत्नांची ट्रम्प यांच्याकडून प्रशंसा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष ट्रंप
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष ट्रंप

 

नवी दिल्ली

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीर अफूची शेती रोखण्यासाठी आणि पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. अमेरिकन काँग्रेसला सादर केलेल्या अधिकृत निवेदनात ट्रम्प यांनी भारत, चीन आणि पाकिस्तानसह २३ देशांची प्रमुख अमली पदार्थ वाहतूक आणि उत्पादन करणारे देश म्हणून ओळख पटवली आहे.

ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, या २३ देशांच्या यादीत नाव येणे म्हणजे संबंधित देशाच्या अमली पदार्थविरोधी मोहिमेतील अपयश नव्हे. अमेरिकेच्या कायद्यानुसार भौगोलिक, व्यावसायिक आणि आर्थिक कारणांमुळे अमली पदार्थ किंवा रसायनांची तस्करी सहज शक्य होते, त्यामुळे देशांची नावे या यादीत समाविष्ट केली जातात. भलेही ते देश अमली पदार्थांवर कडक नियंत्रणाचे प्रयत्न करत असोत.

अमेरिका-भारत ड्रग पॉलिसी फ्रेमवर्क

'अमेरिका-भारत ड्रग पॉलिसी फ्रेमवर्क'च्या माध्यमातून दोन्ही देशांमधील सहकार्य यापुढेही सुरू राहील, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला. या यादीत भारताव्यतिरिक्त अफगाणिस्तान, कोलंबिया, मेक्सिको, जमैका, व्हेनेझुएला, पाकिस्तान आणि चीन यांसारख्या देशांचा समावेश आहे.

चीनला इशारा आणि अमेरिकेतील प्रगती

चीनबाबत बोलताना ट्रम्प यांनी बीजिंगला सिंथेटिक अमली पदार्थांसाठी लागणाऱ्या रसायनांच्या अवैध पुरवठ्यावर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले. चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या बैठकीतही हा मुद्दा मांडल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ट्रम्प प्रशासनाने सीमेवर अमली पदार्थांची तस्करी रोखण्यात आणि अमेरिकेत होणारे मृत्यू कमी करण्यात ऐतिहासिक यश मिळवल्याचा दावा केला.