श्रीहरिकोटा
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) अंतराळ संशोधन क्षेत्रात आणखी एक मोठे यश संपादन केले आहे. इस्रोने शुक्रवारी GSLV रॉकेटच्या सहाय्याने NVS-03 हा नवीन पिढीचा नेव्हिगेशन उपग्रह यशस्वीपणे त्याच्या निर्धारित कक्षेत स्थापित केला आहे. या यशस्वी प्रक्षेपणामुळे भारताची स्वतंत्र प्रादेशिक दिशादर्शक यंत्रणा 'नाविक' (NavIC) पुन्हा एकदा किमान चार उपग्रहांच्या आवश्यक ऑपेरशनल कॉन्फिगरेशनमध्ये आली आहे.
शुक्रवारी रात्री ११ वाजून ५१ मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या लॉन्च पॅडवरून ५० मीटर उंचीच्या GSLV रॉकेटने नियोजित वेळेत यशस्वी झेप घेतली. सुमारे १८ मिनिटांच्या उड्डाणानंतर, क्रायोजेनिक स्टेजसह सर्व टप्पे पार करत प्राथमिक पेलोड जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये (GTO) यशस्वीरित्या विलग करण्यात आला.
इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी या यशानंतर माहिती दिली की, NVS-03 च्या यशस्वी प्रक्षेपणामुळे देशाच्या पोझिशनिंग, नेव्हिगेशन आणि टाईमिंग (PNT) सेवा पूर्ववत झाल्या आहेत. हा उपग्रह भारताचा 'एक राष्ट्र, एक वेळ' या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या उपग्रहामध्ये स्वदेशी रुबिडियम अणुघड्याळाचा (Atomic Clock) समावेश असून, याद्वारे ट्रेन, वाहने आणि सागरी जहाजांच्या रिअल-टाइम ट्रॅकिंगसाठी मोठी मदत मिळणार आहे.
NVS-03 उपग्रहाचे वजन सुमारे २,२३२ किलो असून, तो L1, L5 आणि S बँडमध्ये सिग्नल प्रसारित करेल. या मोहिमेच्या माध्यमातून इस्रोने अंतराळ क्षेत्रातील भारताची सार्वभौम क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेन्द्र सिंह यांनीही इस्रोच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करत हा देशासाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण असल्याचे म्हटले आहे.