ओनिका माहेश्वरी
"माझ्या कुटुंबातून शाळेत पाऊल ठेवणारा मी पहिलाच मुलगा होतो. माझे वडील शेतकरी आहेत. स्वतःच्या अनुभवावरून मी एक निश्चय केला की, एकही मूल शिक्षणापासून वंचित राहता कामा नये."
काश्मीरच्या दुर्गम दऱ्याखोऱ्यात समाजसेवेचा नवा आदर्श उभा करणाऱ्या २४-२५ वर्षांच्या किफायतुल्लाह मलिक याचे हे उद्गार आहेत. नॅशनल सर्व्हिस स्कीम (NSS) मधील उत्कृष्ट कार्यासाठी २०२१-२२ या वर्षाच्या राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित झालेला किफायतुल्लाह आज एका नव्या क्रांतीचा नायक बनला आहे.
बांदीपोरा जिल्ह्यातील एका लहानशा गावातून सुरू झालेला हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. एक समर्पित सामाजिक कार्यकर्ता अन् बांदीपोराचा पहिला व्यावसायिक गिर्यारोहक अशी ओळख असणारा हा तरुण आज हजारो मुलांच्या स्वप्नांना नवी दिशा देतो आहे.
संघर्षातून उभी राहिलेली शिक्षणाची धडपड
किफायतुल्लाहचे प्राथमिक शिक्षण लवेपोरा येथील बॉईज मिडल स्कूलमध्ये झाले. पुढे श्रीनगरच्या अमर सिंग कॉलेजमधून समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र विषयात पदवी घेतल्यानंतर त्याने काश्मीर विद्यापीठातून समाजकार्यात (MSW) पदव्युत्तर पदवी संपादन केली.
शालेय जीवनात अनेक वर्गमित्रांनी गरिबी आणि घरच्या अडचणींमुळे शिक्षण मध्येच सोडल्याचे त्याने जवळून पाहिले होते. या कटू अनुभवातूनच त्याच्या मनात समाजसेवेची बीजे रोवली गेली. कॉलेजमध्ये असताना त्याने शाळा सोडलेल्या मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मित्रांचा एक गट तयार केला.
बांदीपोराचा पहिला ट्रॅकर असल्याने तो मुलांना ट्रेकिंगला न्यायचा, तिथे त्यांचे समुपदेशन करायचा आणि अभ्यासाची आवड निर्माण करायचा. जुनी पुस्तके गोळा करून गरजू मुलांपर्यंत पोहोचवण्यापासून सुरू झालेला हा प्रवास पुढे एका मोठ्या मोहिमेत बदलला.
बर्फाच्छादित भागात शिक्षणाची उजळली ज्योत
सध्याच्या उपक्रमांबद्दल बोलताना किफायतुल्लाह आवर्जून सांगतो, "आम्ही काश्मीरच्या ६ जिल्ह्यांतील २०५ गरजू कुटुंबांना ईदच्या अन्नाचे किट वाटले. त्याहून मोठा उपक्रम म्हणजे 'विंटर कम्युनिटी लर्निंग सेंटर्स'!"
काश्मीरमध्ये हिवाळ्यात प्रचंड बर्फवृष्टीमुळे अनेक दुर्गम भाग तीन-चार महिने उर्वरित जगापासून पूर्णपणे तुटतात. शाळा बंद असल्याने मुले अभ्यासापासून दूर जायची आणि पुढे जाऊन शाळा कायमची सोडून द्यायची. या समस्येवर मात करण्यासाठी त्याने छांदाजी, केत्सन आणि रेशवारी या तीन बर्फाच्छादित गावांमध्ये हिवाळी शिक्षण केंद्रे सुरू केली.
स्थानिक पदवीधर तरुण आणि शिक्षकांना सोबत घेऊन हिवाळ्याच्या काळात तब्बल ४०० मुलांचे शिक्षण अविरत सुरू ठेवले. 'संडे फॉर सोसायटी' उपक्रमांतर्गत मुलांचे संवादकौशल्य, नेतृत्वगुण अन् व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणण्यावर भर दिला गेला.
स्टेशनरी मदत ते महिलांचे सबलीकरण
डोंगराळ अन् आदिवासी भागात हिवाळ्यात रोजगाराची साधने नसतात, त्यामुळे वह्या-पुस्तकांचा खर्च परवडत नसल्याने पालक मुलांना शाळेतून काढून घेतात. ही अडचण ओळखून किफायतुल्लाह आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ५४० हून अधिक गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप केले.
याशिवाय त्यांनी आर्थिक अडचणीत असलेल्या मुलींच्या विवाहासाठी मदतनिधी उभारला. वैद्यकीय आणि नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या गरीब गुणवंत विद्यार्थ्यांची फी भरली. दुर्गम भागातील महिला उद्योजिकांनी तयार केलेल्या उत्पादनांना स्वतःच्या सोशल मीडियावरून प्रसिद्धी देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले.
बहुआयामी समाजसेवा आणि राष्ट्रीय सन्मान
केत्सन, डाखी, डंगरनार अशा अत्यंत दुर्गम भागांत जनजागृती शिबिरे आयोजित करून महिलांचे आरोग्य, सरकारी योजना, पर्यावरण संवर्धन आणि व्यसनमुक्ती यांवर त्याने व्यापक काम केले आहे. सध्या तो 'REACHA' संस्थेच्या स्मार्टपूर प्रोजेक्टचा जिल्हा समन्वयक म्हणून काश्मीरच्या ग्रामीण भागात डिजिटल साक्षरता पसरवण्याचे काम पाहत आहे.
त्याच्या या अखंड सेवेची दखल घेऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्याला सर्वोच्च राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय 'बेस्ट फॉरेस्ट फ्रेंड', 'ॲम्बेसेडर ऑफ ह्युमॅनिटी २०२४', 'ग्लोबल ह्युमन राईट्स अवॉर्ड' आणि 'ADG ॲप्रिसिएशन अवॉर्ड' यांसारख्या अनेक पुरस्कारांनी त्याला गौरवण्यात आले आहे.
आपल्या ध्येयाबद्दल बोलताना किफायतुल्लाह अत्यंत विश्वासाने सांगतो, "तुमची नीत साफ असेल, तर प्रत्येक जण मदतीला धावून येतो. मला शाळा सोडणाऱ्या मुलांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर कायमचा तोडगा काढायचा आहे. तरुणच देशाचे भविष्य आहेत आणि त्यांची विचारसरणी बदलली की खरा बदल घडेल."