डॉ. शाहिदा नगमा
ओनिका माहेश्वरी
झारखंडच्या कोळसानगरी धनबादमधून निघालेली एक मुलगी आज राजधानी दिल्लीत नामवंत स्त्रीरोग आणि आयव्हीएफ तज्ज्ञ म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करते, ही गोष्ट साधी नक्कीच नाही. डॉ. शाहिदा नगमा हे नाव आज केवळ एका यशस्वी डॉक्टरपुरते मर्यादित राहिलेले नाही. त्या संपूर्ण कुटुंबासाठी एक प्रेरणास्रोत बनल्या आहेत. त्यांना डॉक्टर होताना पाहून आज त्यांच्या कुटुंबातील अनेक मुली आपल्या मूळ गावाहून दूर जात इंजिनिअर, डॉक्टर अन् फाईन आर्टिस्ट बनून स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत.
त्यांची आई शबाना कमर या शिक्षिका आणि भारतीय सैन्यातून निवृत्त झालेले वडील खुर्शीद अहमद यांच्या पाठिंब्यामुळे डॉ. शाहिदा यांनी वैद्यकीय क्षेत्रात मोठे नाव कमावले. त्यांचा लहान भाऊसुद्धा डॉक्टर असून सध्या मेरठमध्ये कार्यरत आहे. डॉ. शाहिदा यांचे प्राथमिक शिक्षण कॉन्व्हेंट शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण आर्मी पब्लिक स्कूल (धौला कुआं, दिल्ली) येथून पूर्ण झाले.
दिल्ली कँट येथील आर्मी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस (ACMS) मधून एमबीबीएस आणि इंटर्नशिप पूर्ण करत त्यांच्या वैद्यकीय प्रवासाची सुरुवात झाली. यानंतर त्यांनी दिल्लीच्या प्रतिष्ठित वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज (VMMC) आणि सफदरजंग रुग्णालयातून स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी (MS) प्राप्त केली.
सफदरजंग रुग्णालयात तीन वर्षे सीनियर रेसिडेंट म्हणून काम करताना त्यांनी गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यात मोठे प्राविण्य मिळवले. पुढे सर गंगा राम रुग्णालयात प्रसिद्ध डॉ. आभा मजुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी 'रिप्रॉडक्टिव्ह मेडिसिन' (IVF) मध्ये फेलोशिप पूर्ण केली.
बालपणीचे स्वप्न अन् 'डॉक्टर नानांचा' प्रभाव
डॉ. शाहिदा यांच्या डॉक्टर बनण्याच्या स्वप्नाची मुळे त्यांच्या बालपणात रुजलेली आहेत. कुटुंबात सर्वजण ज्यांना प्रेमाने 'डॉक्टर नाना' म्हणायचे, ते ब्रिटनमध्ये एक नामांकित बालरोगतज्ज्ञ होते. जेव्हा जेव्हा ते भारतात येत, तेव्हा डॉ. शाहिदा त्यांच्याजवळ बसून त्यांच्या अनुभवांच्या गोष्टी ऐकत असत.
त्यांचा शांत स्वभाव आणि रुग्णांची काळजी घेण्याची अनोखी पद्धत पाहून बालपणीच डॉ. शाहिदा यांच्या मनात डॉक्टर होण्याचे बीज रोवले गेले. या संपूर्ण प्रवासात आई-वडिलांची साथ मोलाची ठरली. आधी भारतीय सैन्यात अन् नंतर बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर म्हणून सेवा बजावलेल्या त्यांच्या वडिलांनी मुलीच्या प्रत्येक स्वप्नाला नेहमीच प्रोत्साहन दिले.
बदलती जीवनशैली अन् इनफर्टिलिटीचे आव्हान
आजकाल कमी वयाच्या दांपत्यांमध्येही इनफर्टिलिटीची (व्यंध्यत्व) समस्या वेगाने वाढताना दिसत आहे. या गंभीर विषयावर बोलताना डॉ. शाहिदा सांगतात की, धावपळीची जीवनशैली, ९ ते ५ ची सततची पळापळ आणि प्रचंड मानसिक-शारीरिक ताण ही याची मुख्य कारणे आहेत.
ताणतणावामुळे शरीरात कॉर्टिसोल (Cortisol) नावाच्या संप्रेरकाचे (Hormone) प्रमाण वाढते. त्यामुळे इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, एफएसएच (FSH) आणि एलएच (LH) यांसारख्या मुख्य रिप्रॉडक्टिव्ह संप्रेरकांचे संतुलन बिघडते. याशिवाय अन्नातील भेसळ, दूषित पाणी आणि वाढते प्रदूषण यामुळेही प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम होत आहे.
नैसर्गिकरीत्या मूल होण्यात अडचणी येत असणाऱ्या दांपत्यांसाठी आयव्हीएफ (In Vitro Fertilization) ही एक आधुनिक अन् वरदान ठरणारी कृत्रिम वैद्यकीय तंत्रज्ञान पद्धती आहे.
आयुष्याला स्पर्शून गेलेला भावुक अनुभव
आपल्या करिअरमधील एक अत्यंत आठवणीत राहिलेला भावुक प्रसंग सांगताना त्या म्हणाल्या, "एकदा ग्रामीण भागातील एक दांपत्य आपल्या ११ वर्षांच्या मुलीसोबत माझ्याकडे आले होते. त्या लहान मुलीला लहान भाऊ किंवा बहीण हवी होती. तपासणीदरम्यान त्या महिलेच्या गर्भाशयात अडथळे (Adhesions) असल्याचे समोर आले."
त्या पुढे म्हणतात, "मी हिस्ट्रोस्कोपीच्या माध्यमातून ती समस्या दूर केली आणि गर्भाशयाची रचना सुधारण्यासाठी पहिल्यांदाच पीआरपी (PRP) तंत्रज्ञानाचा वापर केला. याचा सकारात्मक परिणाम म्हणून पहिल्याच आयव्हीएफ प्रयत्नात ती महिला गरोदर राहिली. जेव्हा पहिल्यांदा त्या बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू आले, तो क्षण त्या कुटुंबासाठी अन् माझ्यासाठी अत्यंत भावुक आणि अविस्मरणीय होता."
यशाचा टप्पा अन् अपत्यहीन दांपत्यांना महत्त्वाचा संदेश
सध्या डॉ. शाहिदा छतरपूर मेन रोड येथील रेडियन्स लाईफलाईन अँड फर्टिलिटी क्लिनिकमध्ये सेवा देत आहेत, तसेच त्या क्लाउडनाईन रुग्णालय (ईस्ट ऑफ कैलास, नवी दिल्ली) सोबतही जोडलेल्या आहेत. यापूर्वी त्यांनी बिर्ला फर्टिलिटी अँड आयव्हीएफमध्येही काम केले आहे.
निसंतानतेच्या समस्येशी लढा देणाऱ्या दांपत्यांना मोलाचा सल्ला देताना डॉ. शाहिदा म्हणतात, "आई-बाबा होण्याचा प्रवास प्रत्येकासाठी वेगळा असतो. एकमेकांना दोष देणे किंवा समाजाच्या टोमण्यांना बळी पडण्याऐवजी योग्य वेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. ताणतणावमुक्त राहून आणि योग्य मार्गदर्शनाच्या साहाय्याने हा प्रवास आनंदी करा."