मेघना गुलजार यांच्या 'दायरा' चित्रपटात करीना कपूर पोलिसाच्या भूमिकेत; १८ सप्टेंबरला होणार रिलीज

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 Months ago
करीना कपूर आणि पृथ्वीराज सुकुमारन
करीना कपूर आणि पृथ्वीराज सुकुमारन

 

नवी दिल्ली

भारतीय चित्रपटसृष्टीत २५ वर्षांहून अधिक काळ पूर्ण केल्यानंतर अभिनेत्री करीना कपूर खान आता आव्हानात्मक आणि वेगळ्या धाटणीच्या भूमिकांच्या शोधात आहे. प्रसिद्ध दिग्दर्शिका मेघना गुलजार यांच्या आगामी 'दायरा' (Daayra) या चित्रपटात करीना एका महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. १८ सप्टेंबर रोजी हा चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना करीनाने आपल्या या नवीन भूमिकेबद्दल आणि अभिनयाच्या प्रवासाबद्दल मोकळेपणाने भाष्य केले. या चित्रपटात तिच्यासोबत दाक्षिणात्य अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन मुख्य भूमिकेत असून, दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी एकाच गुन्ह्याचा तपास करताना वेगवेगळ्या विचारसरणीने कसे समोर येतात, हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

पारंपरिक साच्यापेक्षा वेगळी महिला पोलीस

आपल्या डीसीपी अजुनी (DCP Ajooni) या भूमिकेबद्दल बोलताना करीनाने स्पष्ट केले की, ही भूमिका पारंपरिक महिला पोलिसांच्या रुढ साच्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. "सामान्यतः चित्रपटांमध्ये महिला पोलिसांना पुरुषी देहबोली असलेली आणि हातात बंदूक घेऊन ॲक्शन करताना दाखवले जाते. मात्र मेघना गुलजार यांना या संवेदनशील विषयावर एक स्त्रीसुलभ, लिपस्टिक लावणारी, पण त्याच वेळी कामाच्या बाबतीत तितकीच कठोर आणि चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवून निर्णय घेणारी महिला पोलीस दाखवायची होती," असे करीनाने सांगितले.

आयुष्यात गोष्टी स्पष्ट असल्या तरी या चित्रपटातील भूमिका नैतिकदृष्ट्या अतिशय गुंतागुंतीची आणि करड्या छटा (grey shades) असलेली आहे, ज्यामुळे ही भूमिका साकारणे अधिक आव्हानात्मक होते, असेही ती म्हणाली.

मेघना गुलजार आणि मल्याळम चित्रपटांची इच्छा

'तलवार', 'राझी' आणि 'सॅम माणेकशॉ' यांसारख्या दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या मेघना गुलजार यांच्यासोबत काम करण्याची आपली बऱ्याच काळापासून इच्छा होती, असा खुलासा करीनाने केला. कलाकारांकडून उत्तम अभिनय करून घेणाऱ्या मोजक्या दिग्दर्शकांमध्ये मेघना यांचा समावेश होतो, असे ती म्हणाली.

सहकलाकार पृथ्वीराज सुकुमारन याच्या अभिनयाचे कौतुक करताना करीनाने मल्याळम चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. मोहनलाल यांच्यासारख्या ज्येष्ठ कलाकारांबद्दल मनात आदर असून भविष्यात संधी मिळाल्यास मल्याळम चित्रपटात नक्की काम करेन, असे तिने नमूद केले. जंगली पिक्चर्स आणि पेन स्टुडिओ निर्मित हा चित्रपट १८ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.



Latest News