मधुकुर पांडेय
"आयुष्यात यशाला कोणता शॉर्टकट नसतो, तुमची मेहनतच तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचवते. यशाच्या शिखरावर असताना संपूर्ण जग पाठीशी उभे राहते, पण कठीण प्रसंगात जो सावलीसारखा सोबत उभा राहतो, तोच खरा आपला माणूस."
उत्तर प्रदेशातील पहिली मुस्लिम महिला कथक नृत्यांगना अन् अभिनेत्री फरहान फातिमा हिचे हे विचार आजच्या तरुण पिढीला नवा मार्ग दाखवणारे ठरत आहेत. ३२ वर्षांच्या फरहानचा लखनौच्या विकास नगरमधून सुरू झालेला हा प्रवास आज दिल्ली आणि मुंबईच्या ग्लॅमरस विश्वापर्यंत जाऊन पोहोचला आहे; पण यशाच्या या झगमगाटामागे मोठी धडपड, कठोर शिस्त अन् कौटुंबिक विरोधाशी घेतलेली टक्कर दडलेली आहे.
स्वप्नांच्या आड आल्या रूढी, वडिलांनी दिला भक्कम आधार
एका पारंपरिक मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या फरहानसाठी कथक अन् अभिनयाची वाट निवडणे अजिबात सोपे नव्हते. जेव्हा तिने या क्षेत्रात पाऊल ठेवले, तेव्हा नातेवाईक अन् ओळखीच्या लोकांनी जोरदार विरोध दर्शवला. एका मुलीने एकटीने दिल्ली किंवा मुंबईत जाऊन काम करणे नातेवाईकांना मुळीच मान्य नव्हते.
अशा नाजूक प्रसंगी उत्तर प्रदेश पोलिसातील माजी डीएसपी अन् फरहानचे वडील अझहर अहमद तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. समाजाच्या दबावापुढे न झुकता त्यांनी लेकीच्या स्वप्नांना पंख दिले.
आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना फरहान सांगते, "माझ्या अब्बांनी नेहमी माझ्या मनातले ऐकले. मर्यादा राखून तुला जे योग्य वाटेल ते बिनधास्त कर, असा मोलाचा सल्ला त्यांनी मला दिला." वडिलांचा हाच मंत्र फरहानच्या आयुष्याचा मुख्य पाया बनला.
संस्कार अन् कलेचा सुरेख समतोल
कलाविश्वात काम करताना आपल्या वागण्याने कुटुंबाची मान नेहमी अभिमानाने उंचावेल, याची काळजी फरहानने कायम घेतली. अनेक वर्षांच्या संघर्षात तिने अशा अनेक मोठ्या भूमिका नाकारल्या, ज्या केल्यावर तिला स्वतःच्या कुटुंबासमोर मान वर करून उभे राहणे कठीण झाले असते.
आपल्या या निर्णयाचा तिला तिळमात्र पश्चात्ताप नाही. कथक आणि अभिनय हा तिचा छंद असला, तरी कुटुंबाची प्रतिष्ठा अन् मर्यादांशी तडजोड करणे तिला कधीच मंजूर नव्हते.
संस्कारांबद्दल बोलताना फरहान आवर्जून सांगते, "कला अन् संस्कृती आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवते. हेच संस्कार आपल्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवतात, त्यामुळे यात तडजोड करण्याचा प्रश्नच येत नाही."
भातखंडे विद्यापीठापासून ते बॉलिवूडच्या पडद्यापर्यंत
वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी फरहानने कथकचे रीतसर धडे घेण्यास सुरुवात केली होती. लखनौच्या प्रसिद्ध भातखंडे संस्कृत विद्यापीठात नामांकित नृत्यांगना वीणा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तिने 'कथक विशारद' ही पदवी संपादन केली. कथक कला केंद्राचे संचालक अन् प्रसिद्ध गुरू सुरेंद्र सैकिया यांच्या नेतृत्वाखाली, वयाच्या १३ व्या वर्षी बीरबल सहानी इन्स्टिट्यूटच्या मंचावर तिचा पहिला कार्यक्रम पार पडला.
तिची कला पाहून लखनौच्या नाट्यसृष्टीतील दिग्गजांनी तिला अभिनयात नशीब आजमावण्याचा सल्ला दिला. लखनौ दूरदर्शनवरील 'कसाईवाडा' ही तिची पहिली टेलीफिल्म प्रचंड गाजली. तिथून सुरू झालेला तिच्या अभिनयाचा प्रवास आजतागायत अविरत सुरू आहे.
मुंबईची चकाचौंध अन् संघर्षाची गाडी
अभिनयाच्या दुनियेत स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी फरहानने २०१३ मध्ये मुंबईत पाऊल ठेवले. मायानगरीच्या या अथांग प्रवासात तिची कडक परीक्षा झाली. जवळपास तीन वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर २०१६-१७ मध्ये दिग्दर्शक आनंद राय यांच्या 'नखरेवाली' चित्रपटात तिला महत्त्वाची भूमिका मिळाली.
त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. दिग्दर्शक कमल चंद्र यांच्या 'हमारे बारह' या चित्रपटासह तिने आतापर्यंत डझनाहून अधिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. 'ठुकरा के मेरा प्यार' या वेब सीरिजमधील तिच्या कामाचे तुफान कौतुक झाले.
टीव्ही मालिकांच्या दुनियेतही तिने आपली वेगळी छाप पाडली आहे.
स्टार प्लस: 'ये रिश्ता क्या कहलाता है', 'तोडकर दिल मेरा'
झी टीव्ही: 'भैय्या क्या चल रहा है'
सोनी सब: 'बालवीर', 'आरके लक्ष्मण की दुनिया'
सहारा वन: 'आखिर बहू भी तो बेटी है'
आपल्या मूल्यांशी आणि संस्कारांशी पक्की राहून स्वप्नांचा पाठपुरावा करणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी फरहान फातिमा आज एक आदर्श प्रेरणास्थान बनली आहे.