Saudi Arabia Houthi Attack: मक्केजवळ हुतींचा ड्रोन पाडला; सौदी अरेबियात हाय अलर्ट

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
 सौदी अरेबियात हाय अलर्ट
सौदी अरेबियात हाय अलर्ट

 

रियाध

यमनमधील इराणसमर्थित हुती बंडखोरांकडून झालेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाच्या पश्चिम किनारपट्टीवरील मक्का शहरासह जिद्दा आणि ताइफ प्रांतांमध्ये हवाई हल्ल्याचा धोक्याचा इशारा (Air Raid Alert) जारी करण्यात आला. इतिहासभरात मक्का शहरात अशा प्रकारचा हवाई धोक्याचा इशारा जारी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सौदी अरेबियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेने मक्का शहराच्या प्रतिबंधित हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वीच हुतींचा एक ड्रोन हवेतच नष्ट केला.

हवाई धोक्याच्या या इशाऱ्यानंतर मदिना येथील प्रिन्स मोहम्मद बिन अब्दुलअजीज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हवाई वाहतूक काही काळासाठी रोखण्यात आली होती. यमनमधील हुती बंडखोर आणि सौदी समर्थित सरकार यांच्यात जुलैपासून पुन्हा सुरू झालेल्या संघर्षानंतर हुतींनी सौदी अरेबियावर सागरी बंदी घातली असून तांबड्या समुद्रातील जहाजांना लक्ष्य केले जात आहे.

ओआयसीचा इशारा आणि 'रेड लाईन'ची घोषणा

सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील ५७ मुस्लिम देशांच्या संघटनेने (OIC) या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. संघटनेचे प्रवक्ते तुर्की अल-मलिकी यांनी स्पष्ट केले की, दोन पवित्र मशिदी (मक्का आणि मदिना) तसेच तेथे येणाऱ्या हजारो भाविकांची सुरक्षा ही सौदी अरेबियासाठी 'रेड लाईन' (अंतिम सीमा) आहे. हुतींचे पुढील हल्ले रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व कठोर पाऊल उचलण्यास सौदी आघाडी मागे हटणार नाही, असा सडेतोड इशारा त्यांनी दिला.

दुसऱ्या बाजूला हुती बंडखोरांच्या राजकीय विभागाचे नेते हाजेम अल-असद यांनी मक्का शहराला लक्ष्य केल्याचा सौदी अरेबियाचा दावा फेटाळून लावला आहे. हा सौदी अरेबियाचा जुना आणि खोटा प्रचार असून यात कोणतेही तथ्य नाही, असे सांगत सौदीकडून सुरू असलेल्या आक्रमकतेला योग्य ते प्रत्युत्तर दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

तांबड्या समुद्रातील तणाव आणि जागतिक चिंता

गेल्या काही दिवसांत हुतींनी सौदी अरेबियावर अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले असून यात १३ हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत आणि तेलाच्या विहिरींना आग लागली आहे. तांबड्या समुद्रातील बाब अल-मंदब सामुद्रधुनी बंद झाल्यास संपूर्ण जगासाठी ते घातक ठरेल, असा इशारा कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे.

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या संघर्षात थेट हस्तक्षेप करण्याची सौदी क्राउन प्रिन्सची मागणी फेटाळून लावली आहे. तांबड्या समुद्रातील या वाढत्या तणावामुळे आशिया आणि युरोपदरम्यान होणाऱ्या जागतिक व्यापारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.