इस्लाममध्ये अल्लाहला निर्गुण निराकार मानले जाते. त्यामुळे त्यात मूर्तीपूजेला किंवा सगुण उपासनेला स्थान नाही. असे असले तरी अनेक मुस्लिम कलाकारांनी विविध कालखंडांमध्ये हिंदू देवतांची अत्यंत विलोभनीय चित्रं आपल्या कुंचल्यातून साकारली आहेत. यातून दोन्ही संस्कृतींचा सुंदर संगम पाहायला मिळतो. दोन संस्कृतींच्या मिश्रणातून, त्या देवतांच्या आकार, संकल्पना, कथा-पुराण यांविषयीच्या कुतूहलातून मुस्लीम चित्रकारांच्या या कलाकृती जन्मल्या आहेत.
महाराष्ट्रातील हिंदूंचे आराध्य दैवत साकारणारे मुस्लीम हात
महाराष्ट्रातील हिंदूंचे आराध्य दैवत आणि १४ विद्या व ६४ कलांचा अधिपती म्हणजे श्रीगणेश! गणपती हा बुद्धीचा आणि कलेचा देव आहे, असं मानलं जातं. शतकानुशतके केवळ हिंदूच नाही, तर अनेक मुस्लीम चित्रकारांनी आणि मूर्तिकारांनीही आपल्या कुंचल्यातून गणरायाचे विलोभनीय आणि जिवंत रूप साकारले आहे.
राजर्षी शाहू महाराजांचे लाडके चित्रकार: मास्टर आबालाल रेहमान
महाराष्ट्राच्या चित्रकलेचा इतिहास आबालाल रेहमान यांच्या उल्लेखाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. कोल्हापूरचे सुपुत्र आणि राजर्षी शाहू महाराजांचे दरबारी चित्रकार आबालाल रेहमान (मूळ नाव अब्दुल अजीज रेहमान) हे खऱ्या अर्थाने कलेला धर्माच्या पलीकडे नेणारे महान चित्रकार होते.
एका पारंपारिक मुस्लीम कुटुंबात जन्मलेल्या आबालाल यांना कलेचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला होता. त्यांचे वडील कुराणच्या हस्तलिखितांना सजवण्याचे काम करत असत. जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर आबालाल कोल्हापूरला परत येऊन शाहू महाराजांच्या दरबारात काम करू लागले.
आबालाल यांनी रेखाटलेले हे गणपतीचे चित्र पहा. हा गणपती ते आपल्या राजासाठी रेखाटत होते म्हणून असेल, तो प्रजेचं ऐकण्यासाठी बसलेल्या राजासारखाच दिसतो आहे. हे चित्र म्हणजे आबालाल यांच्या प्रतिभेचं आणि शाहू महाराजांच्या सर्वधर्मसमभावाचं उदाहरण आहे. एका मुस्लीम कलाकाराने हिंदू राजासाठी साकारलेली ही गणेशाची प्रतिमा, कलेच्या क्षेत्रात जात, धर्म किंवा परंपरेचं बंधन नसल्याचं द्योतक आहे. हे गणेशाचं चित्रं म्हणजे शाहू महाराजांच्या काळातील कोल्हापूरच्या मिश्र संस्कृतीची साक्ष देणारा ऐतिहासिक दस्तऐवजही आहे.
एम. एफ. हुसेन आणि त्यांचा लाडका 'गणेश'
जागतिक पातळीवरचे मोठे नाव म्हणजे मकबूल फिदा हुसेन यांच्याइतका भारतीय संस्कृतीचा आणि पुराणांचा अभ्यास फार कमी चित्रकारांनी केला असेल. हुसेन यांनी हिंदू पुराण कथांमधील अनेक देवदेवता आपल्या कान्व्हासवर साकारल्या. पारंपारिक भारतीय प्रतिमा, 'क्युबिस्ट' आणि लोककलेचा सुरेख संगम त्यात पाहायला मिळतो. गजाननाचे रूप मांडताना त्यांनी ठळक रेषा वापरल्या.
खेळकर आकार आणि गडद रंगांचा वापर केला. त्यांच्या या चित्रांमध्ये गणपतीसोबतच चंद्र, सूर्य किंवा वीणेसारखी पारंपारिक प्रतीकंही दिसून येतात. त्यांनी डझनावारी गणपतीची चित्रं काढली. त्यात गणपतीचे विविध रंगी एकाहून अधिक चेहरे आहेत, कधी तो नाचतो आहे, कधी बसलेला आहे, कधी खेळतो आहे, कधी वीणा वाजवतो आहे कधी पार्वतीच्या मांडीवर बसलेला आहे. या सर्व चित्रांत दिसणारी समान गोष्ट म्हणजे गणपतीच्या कपाळाची महिरपी ठळक रेष, आणि गडद रंग.
ए ए अलमेलकर यांची 'मिनिएचर' चित्रशैली
महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये जन्मलेले आणि जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून शिक्षण घेतलेले ए. ए. अलमेलकर हे भारताच्या आधुनिक चित्रकलेतील गाजलेले नाव. अलमेलकर यांनी आदिवासी जीवन आणि भारतीय लोककलेसोबतच भारतीय पुराणे आणि हिंदू देवता, विशेषतः श्रीगणेशाची रंगतदार आणि पारंपरिक धाटणीची चित्रं रेखाटली. त्यांच्या चित्रांमधील बारकावे आणि 'मिनिएचर' शैलीचा प्रभाव बाप्पाच्या चित्रांना वेगळाच जिवंतपणा देतो.
एस. एच. रझा यांची अध्यात्मिक चित्रं आणि 'बिंदू'
सय्यद हैदर रझा (S.H. Raza) यांची चित्रशैली थेट आकारांवर नसून ती 'बिंदू' आणि अध्यात्मावर आधारित होती. तरीही, त्यांनी भारतीय तत्त्वज्ञान, शिव, शक्ती आणि गणपती यांच्या ऊर्जा आपल्या रंगांतून ताकदीने मांडल्या. त्यांच्या चित्रांमधील भौमितिक आकार आणि रंग गणेशाच्या निर्गुण-निराकार रूपाचीच प्रचिती देतात.
चित्रकार फारुख नदाफ: कलेच्या माध्यमातून संस्कृती जपणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व
फारुख नदाफ हे महाराष्ट्रातील चित्रकला क्षेत्रातील समकालीन नाव आहे. सांगलीच्या 'कलाविश्व महाविद्यालया'तून आपले कलाशिक्षण पूर्ण केलेले फारुख नदाफ हे प्रामुख्याने जलरंग, तैलरंग आणि ॲक्रेलिक या माध्यमांवरील त्यांच्या विलक्षण पकडीसाठी ओळखले जातात. त्यांच्या कुंचल्यातून साकारलेली 'नृत्य करणारी गणपतीची चित्रं', ऐतिहासिक प्रसंग आणि ग्रामीण महाराष्ट्राचे जिवंत चित्रण कला रसिकांना भुरळ घालते. विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे, बालभारतीच्या अनेक मराठी पाठ्यपुस्तकांमधली बोलकी चित्रं आणि सुंदर मुखपृष्ठं साकारण्याचं महत्त्वाचं कामही फारुख नदाफ यांनीच लिलया पार पाडलं आहे.
बॉम्बे आर्ट सोसायटी आणि कॅमलिन आर्ट फाउंडेशनचे मानाचे पुरस्कार पटकावणाऱ्या या कलंदर कलाकाराने आपल्या कुंचल्यातून 'कलेला कोणताही धर्म नसतो' हीच आपली सर्वधर्मसमभावाची 'गंगा-जमनी' संस्कृती अत्यंत समर्थपणे पुढे नेली आहे. आता त्यांनी साकारलेला हा गणपती पहा. झुकते शांत, क्षमाशील डोळे, उंदराच्या चेहऱ्यावरचे मोहक हसरे भाव. कोणत्याही अभिमानाचा लवलेश नसलेला शांत, तल्लीन बाप्पा.
मुघल, दख्खनी लघुचित्रं आणि बंगालचे 'पतुआ' कलाकार
मुस्लीम चित्रकारांनी गणपती साकारण्याची ही परंपरा थेट मुघल आणि दख्खनच्या सुल्तानांच्या काळापर्यंत मागं जाते.
मुघल लघुचित्रं: सम्राट अकबराच्या काळात 'महाभारता'चं पर्शियन भाषेत भाषांतर झालं, ज्याला 'रझ्मनामा' म्हटलं जातं. यातील ऐतिहासिक लघुचित्रांमध्ये गणपतीचं चित्रण आहे. विशेष म्हणजे, या चित्रांमधील बाप्पाने पर्शियन पद्धतीचा 'जामा' घातलेला दिसतो.
बंगालची पटचित्रं: पश्चिम बंगालमध्ये 'पटचित्र' नावाची प्राचीन लोककला आहे. हे पटचित्र काढणारे आणि त्यावरील गाणी गाणारे बहुतांश कलाकार 'मुस्लीम' आहेत. 'रणजित चित्रकार' यांसारखे अनेक मुस्लीम पतुआ कलाकार पिढ्यानपिढ्या गणपती, दुर्गा आणि रामायणातील प्रसंगांची चित्रं काढत आहेत.
समकालीन कलाकार आणि बाप्पाला 'दृष्टी' देणारे हात
रायपूरचे मूर्तिकार शादाब: छत्तीसगडच्या रायपूरमध्ये राहणारा 'शादाब' हा तरुण कलाकार गेल्या १५ वर्षांपासून गणपतीच्या मूर्ती घडवत आहे. यंदाच्या वर्षी त्याने एकट्याने तब्बल २५० पेक्षा जास्त वेगवेगळ्या स्वरूपातील मूर्ती तयार केल्या आहेत. "कोणताही धर्म असो, दुसऱ्यांच्या श्रद्धेचा सन्मान करणं गरजेचं आहे," असं तो अभिमानाने सांगतो.
उदयपूरचे वकार हुसेन: काचेवरील कोरीव कामासाठी प्रसिद्ध असलेल्या वकार हुसेन यांनी काचेवर श्रीगणेशाच्या अनेक सूक्ष्म आणि मनमोहक मूर्ती साकारल्या आहेत.
मूर्तींना डोळे देणारे हात: पेण, कोल्हापूर, मुंबई आणि हैदराबादसारख्या शहरांमध्ये गणपतीच्या मूर्ती रंगवणारे अनेक मुस्लीम कलाकार आहेत. बाप्पाच्या डोळ्यांत रंग भरून त्याला 'दृष्टी' देण्याचं महत्त्वाचं काम हे हात लीलया पार पाडतात.
या सर्व मुस्लीम कलाकारांनी साकारलेल्या गणपतींच्या कलाकृतींमध्ये जाणवलेला समान धागा म्हणजे यापैकी एकही गणपती उग्र नाही. तो शांत, मंगल आहे. मंगलमुर्ती आहे. एखादा मुस्लीम चित्रकार किंवा मूर्तिकार कॅनव्हासवर किंवा मातीत श्रीगणेशाचं रूप साकारतो, तेव्हा तो त्या आकाराची, कथा पुराणांची भुरळ पडलेला एक कलाकार असतो फक्त. त्याचं ते काम त्याच्या हिंदू-मुस्लीम ओळखीच्या पलीकडे जाऊन निव्वळ कलाकार म्हणून जोखलं पाहिजे आणि त्याच भावनेने त्या कलाकृतीचं रसग्रहण केलं पाहिजे.