नवी दिल्ली
अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय जलसीमेत पाकिस्तान नौदलाच्या जहाजाने भारतीय नौदलाच्या जहाजाला मारलेल्या धडकेनंतर भारताने कठोर पाऊल उचलले आहे. या अयोग्य आणि अतीव बेजबाबदार कृत्याबद्दल परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) नवी दिल्लीतील पाकिस्तानच्या प्रभारी उपदूतांना (Charge d'Affaires) समन्स बजावून आपला तीव्र निषेध नोंदवला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय जलसीमेत घडलेल्या या घटनेत भारतीय नौदलाच्या जहाजाचे कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. मात्र, पाकिस्तानच्या नौदलाच्या जहाजाचे हे वर्तन एप्रिल १९९१ मध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या लष्करी सराव व सैन्याच्या हालचालींसंदर्भातील कराराच्या कलम १० चे थेट उल्लंघन करणारे आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानी राजदूतांना स्पष्ट सांगितले की, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्यांच्या संबंधित लष्करी युनिट्सनी योग्य ती खबरदारी घेणे आणि दोन्ही देशांमधील करारांचा आदर करणे आवश्यक आहे. याशिवाय, इस्लामाबाद येथील भारतीय उपदूतांनाही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे या प्रकरणी अधिकृतपणे असाच तीव्र विरोध नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.