नवी दिल्ली
उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या (Emerging Technologies) क्षेत्रात भारताने जागतिक स्तरावर सुरुवातीच्या आघाडीच्या देशांमध्ये स्थान मिळवले पाहिजे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. तंत्रज्ञान आणि सेमीकंडक्टर उद्योगाच्या भविष्यासाठी सरकार स्थिर, स्पष्ट आणि प्रतिसादात्मक धोरण (Responsive Policy Environment) देण्यास कटिबद्ध असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. नवी दिल्लीत पार पडलेल्या सेमीकंडक्टर क्षेत्रातील जागतिक कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (CEOs) उच्चस्तरीय गोलमेज परिषदेत ते बोलत होते.
पंतप्रधान कार्यालयाने (PMO) दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्वांटम कम्प्युटिंग आणि सेमीकंडक्टर क्षेत्रातील संशोधन व विकासावर सविस्तर चर्चा झाली. भारताकडे उत्तम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञानाचा वेगाने स्वीकार आणि मजबूत पायाभूत सुविधांचा पाया उपलब्ध आहे. त्यामुळे उद्योग जगताने कौशल्य विकास आणि इनोव्हेशनमध्ये अधिक सहभाग नोंदवावा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.
भारतातील सेमीकंडक्टर इकोसिस्टम ही आता प्राथमिक टप्प्यातून निघून मोठ्या संधी आणि विस्ताराच्या टप्प्यात प्रवेश करत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. तंत्रज्ञानातील बदल आणि उद्योगांच्या गरजेनुसार सरकारी धोरणांमध्येही आवश्यक ते बदल केले जातील. उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनी प्रशासकीय आणि धोरणात्मक सुधारणांसाठी आपल्या सूचना मांडाव्यात, त्यावर सरकार नक्की सकारात्मक विचार करेल, असे त्यांनी सांगितले.
या परिषदेत १ कोटी तरुणांना 'एआय' (AI) चे प्रशिक्षण देण्याच्या लक्ष्याचा पुनरुच्चार करण्यात आला. भारताचे विशाल टॅलेंट आणि जागतिक कंपन्यांचा अनुभव एकत्र आल्यास रोजगाराच्या व विकासाच्या मोठ्या संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 'इंडिया सेमीकंडक्टर मिशन २.०' (ISM 2.0) अंतर्गत भारतात चिप मॅन्युफॅक्चरिंग, डिझायनिंग, संशोधन व विकास (R&D) आणि प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती होत असल्याचे सीईओ यांनी मान्य केले.
या गोलमेज परिषदेला मायक्रॉन, इन्फिनिऑन, ॲप्लाईड मटेरियल्स, एएसएमएल, टाटा इलेक्ट्रॉनिक्स, एएमडी, इंटेल, फॉक्सकॉन, लॅम रिसर्च आणि आयबीएम रिसर्च यांसारख्या जगातील अव्वल तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते. भारताला जागतिक पातळीवर स्पर्धात्मक सेमीकंडक्टर हब बनवण्यासाठी सहकार्य देण्याचे आश्वासन या सर्व उद्योजकांनी दिले.