व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम यांसारख्या लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर असलेल्या युझरनेम फीचरच्या सुरक्षेवरून केंद्र सरकार सतर्क झाले आहे. आयटी मंत्रालयाने पाठवलेल्या नोटिशीला उत्तर म्हणून व्हॉट्सॲप पाठोपाठ आता टेलिग्रामनेही आपले स्पष्टीकरण सादर केले आहे. दोन्ही कंपन्यांकडून आलेल्या प्रतिसादांची सध्या सरकारकडून तपासणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
युझरनेम फीचरवर का आहेत आक्षेप?
युझरनेम फीचरमुळे युजर्सना फोन नंबर शेअर न करता एकमेकांशी संवाद साधणे शक्य होते. मात्र, यामुळे ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, डिजिटल अरेस्ट स्कॅम्स आणि चुकीची ओळख धारण करून (Impersonation) होणारे हल्ले वाढू शकतात, अशी भीती केंद्र सरकारने व्यक्त केली आहे. या चिंतेमुळे सरकारने व्हॉट्सॲपला हे फीचर लाँच न करण्याचे निर्देश दिले होते, त्यावर व्हॉट्सॲपने हे फीचर सरकारशी चर्चा पूर्ण होईपर्यंत भारतात लाँच करणार नसल्याचे आश्वासन दिले आहे.
इतर प्लॅटफॉर्मवरही दबाव
व्हॉट्सॲपप्रमाणेच आयटी मंत्रालयाने टेलिग्राम आणि सिग्नललाही नोटिसा धाडल्या होत्या. या प्लॅटफॉर्मवर अस्तित्वात असलेल्या युझरनेम फीचरमुळे फसवणुकीचे धोके कसे कमी केले जात आहेत, असा सवाल मंत्रालयाने विचारला आहे. भारतात व्हॉट्सॲपचे ५० कोटींहून अधिक युजर्स आहेत, तर टेलिग्रामचे प्रमाण त्यामानाने कमी आहे.
नियामक तपासणीचा ससेमिरा
गेल्या काही दिवसांत मेटा (व्हॉट्सॲप-इन्स्टाग्राम) आणि टेलिग्राम या दोन्ही कंपन्या विविध कारणांमुळे नियामक तपासणीच्या (Regulatory Scrutiny) रडारवर आहेत. इंस्टाग्रामवरील जाहिरातींमध्ये बाल लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्री आढळल्यामुळे मेटाला नोटीस बजावण्यात आली आहे.
तर, दुसरीकडे टेलिग्रामवर चित्रपट आणि ओटीटी कंटेंटच्या पायरेटेड प्रती मोठ्या प्रमाणावर पसरवल्या जात असल्याच्या तक्रारीनंतर सरकारने त्यांना कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञान कंपन्यांवर सरकारचा दबाव वाढताना दिसत आहे.