वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) धोक्यांबाबत व्यक्त केली जाणारी भीती फेटाळून लावली आहे. तंत्रज्ञानावर मर्यादा घालण्याचे किंवा नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न हे एका 'षड्यंत्रा'चा भाग असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सॅम आल्टमन आणि इलॉन मस्क यांसारख्या प्रमुख टेक नेत्यांकडून एआयवर सरकारी देखरेखीची मागणी केली जात असताना ट्रम्प यांनी ही आक्रमक भूमिका घेतली आहे.
ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, "एआय जगतावर ताबा मिळवेल किंवा मानवी अस्तित्व नष्ट करेल अशा गोष्टी निव्वळ अफवा आहेत." तंत्रज्ञानावर कठोर निर्बंध लादल्यास अमेरिका या क्षेत्रात चीनच्या मागे पडू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
अँथ्रोपिकचे सीईओ डारिओ अमोदेई आणि ओपनएआयचे सॅम आल्टमन यांनी एआय तंत्रज्ञानाच्या वेगाने होणाऱ्या वाढीवर आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर सरकारकडून नियमावली तयार करण्याची मागणी केली होती. अमोदेई यांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका निबंधात एआयच्या अनियंत्रित वाढीमुळे सायबर हल्ल्यांचा धोका वाढू शकतो आणि आगामी ६ ते १२ महिन्यांत संपूर्ण इंटरनेट यंत्रणेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली होती.
ओपनएआयचे प्रमुख सॅम आल्टमन यांनीही आंतरराष्ट्रीय स्तरावर या तंत्रज्ञानाचे नियमन करण्याची गरज प्रतिपादन केली होती. मात्र ट्रम्प यांनी टेक नेत्यांच्या या मागण्यांना फेटाळत, "इतिहासात कधी कोणत्या उद्योगाच्या नेत्यांनी स्वतःवरच नियंत्रणे आणण्याची मागणी केली आहे का?" असा सवाल उपस्थित केला.
ट्रम्प प्रशासनाने एआय क्षेत्रातील अमेरिकेचे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी कठोर नियमांना विरोध दर्शवला आहे. उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांनीही तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी स्वतःहून सरकारकडे नियमांची मागणी करणे ही एक शंकास्पद बाब असल्याचे म्हटले आहे.
अमेरिकेतील आगामी मध्यवधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एआय नियमनाचा हा मुद्दा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांनी ट्रम्प यांच्या या भूमिकेवर टीका करत एआयमुळे होणारी रोजगार हानी आणि सुरक्षेच्या प्रश्नांवर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.