Jammu NIA Court: पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा कमांडर सैफुल्लाहविरुद्ध एनआयए न्यायालयाचे वॉरंट जारी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 39 m ago
एनआयए
एनआयए

 

जम्मू 

एप्रिल २०२५ मधील पहगाम दहशतवादी हल्ल्यासह अनेक प्रमुख दहशतवादी कारवायांमध्ये मुख्य सूत्रधार असलेल्या आणि पाकिस्तानात लपलेल्या 'लष्कर-ए-तोयबा' (LeT) कमांडर सैफुल्लाह याच्याविरोधात जम्मूतील विशेष एनआयए (NIA) न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट (NBW) जारी केले आहे.

पाकिस्तानातील कसूर जिल्ह्यातील चांगा मांगा गावचा रहिवासी असलेला सैफुल्लाह हा साजिद जट्ट, अली भाई, हबीबुल्लाह मलिक, लंगडा, नुमी आणि उस्मान हबीब या अनेक बनावट नावांनी दहशतवादी वर्तुळात ओळखला जातो. तो गेल्या दोन दशकांपासून लष्कर-ए-तोयबा या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेसाठी सक्रियपणे कारवाया चालवत आहे.

एनआयएची कारवाई आणि 'टेलिग्राम'वरून सूचना

एनआयएने या वर्षाच्या सुरुवातीला पाकिस्तानातील दहशतवादी अब्दुल्ला उर्फ अबू हुरैरा याच्या नेतृत्वाखालील लष्करच्या एका मोठ्या मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता. या कारवाईत अब्दुल्लासह त्याचा पाकिस्तानी सहकारी उस्मान आणि तीन स्थानिक हस्तकांना अटक करण्यात आली होती. श्रीनगरच्या पांदच परिसरातून मार्च महिन्यात एका हस्तकाला ताब्यात घेतल्यानंतर गेल्या १६ वर्षांपासून फरार असलेल्या अब्दुल्लाचा शोध लागला होता.

या मॉड्यूलच्या चौकशीदरम्यान एनआयएला अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून काही टेलिग्राम (Telegram) आयडी मिळाले. या आयडींच्या माध्यमातून पाकिस्तानात बसलेला सैफुल्लाह काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा दले, नागरिक आणि सरकारी आस्थापनांवर हल्ले करण्यासाठी सूचना देत असल्याचे स्पष्ट झाले. तसेच तो बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यानुसार (UAPA) घोषित दहशतवादी असून पाकिस्तानातून काश्मीरमध्ये शस्त्रे, दारूगोळा आणि निधी पुरवण्याचे काम करत असल्याचे एनआयएने न्यायालयाला सांगितले.

कुलगाम ते पाकिस्तान प्रवास

न्यायालयाने एनआयएचा अर्ज आणि पुरावे विचारात घेतल्यानंतर सैफुल्लाहविरोधात अजामीनपात्र वॉरंट मंजूर केले. सैफुल्लाह हा २००५ ते २००७ दरम्यान दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात लष्करचा कमांडर म्हणून सक्रिय होता आणि त्यानंतर तो सीमेपार पाकिस्तानात पळून गेला होता.

त्याचा भारतातील शेवटचा ज्ञात पत्ता कुलगाम जिल्ह्यातील यमराच गाव असल्याने, न्यायालयाच्या आदेशानुसार हे अजामीनपात्र वॉरंट पुढील कायदेशीर कारवाईसाठी कुलगामच्या पोलीस अधीक्षकांकडे (SSP) सुपूर्द करण्यात आले आहे.