Parag Shah MLA Beggar: ३ हजार कोटींचे मालक असलेल्या आमदाराने मागितली रस्त्यावर भीक, जाणून घ्या कारण

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
पराग शाह
पराग शाह

 

मुंबई

महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारांपैकी एक असलेले भाजपचे पराग शाह यांनी एका दिवसासाठी आपला संपूर्ण लवाजमा सोडून भिकाऱ्याचा वेश परिधान केला. घाटकोपरमधील रस्त्यांवर त्यांनी काही तास भीक मागितली. जैन आध्यात्मिक गुरू नम्रमुनी यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी जीवनाचे वास्तव समजून घेण्यासाठी हा प्रयोग केल्याचे सांगितले. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून राजकीय व सामाजिक वर्तुळात याची मोठी चर्चा सुरू आहे.

घाटकोपर पूर्व मतदारसंघाचे आमदार असलेल्या पराग शाह यांनी जैन धर्मातील विशेष महिन्यात आपल्या गुरूंच्या सूचनेनुसार हा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी आपली सुरक्षा व्यवस्था, आलिशान गाड्या आणि महागड्या वस्तू बाजूला ठेवल्या. कोणालाही ओळखता येऊ नये म्हणून त्यांनी मेकअप केला आणि एका सामान्य भिकाऱ्याप्रमाणे घाटकोपरच्या रस्त्यांवर उतरून भीक मागितली.

जीवनाचे खरे वास्तव समजून घेण्याचा प्रयत्न

आपला हा अनोखा अनुभव सांगताना आमदार पराग शाह म्हणाले की, नेहमी लोकांच्या गिर्दीत असणाऱ्या लोकप्रतिनिधीला सामान्य किंवा हलाखीच्या परिस्थितीत लोक कशी वागणूक देतात, हे पाहणे डोळे उघडणारे होते. जे लोक एरवी भेटण्यासाठी रांगेत उभे राहतात, तेच लोक मी भिकाऱ्याच्या वेशात गेल्यावर माझ्यापेक्षा मोठे वाटू लागले. हेच आयुष्याचे मूळ वास्तव आहे.

या प्रयोगादरम्यान त्यांना मुंबईकरांच्या मदत करण्याच्या वृत्तीचाही अनुभव आला. एका व्यक्तीने त्यांना 'बाबा जा, जेवून घे' असे सांगत २० रुपये दिले. तर एका वडापाव-समोसा विक्रेत्याने पैसे नसतानाही हसतमुखाने समोसा दिला. मुंबई ही गरजूंना मदत करणारी नगरी आहे, याचा प्रत्यक्ष प्रत्यय आल्याचे त्यांनी नमूद केले. भीक मागून जमा झालेले अन्न त्यांनी रस्त्यावर बसूनच खाल्ले आणि नंतर मेकअप काढून ते पुन्हा त्या ठिकाणी गेले व लोकांशी संवाद साधला.

३३८३ कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले आमदार

पराग शाह हे बांधकाम (रिअल इस्टेट) क्षेत्रातील मोठे व्यावसायिक असून त्यांनी यापूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणूनही काम केले आहे. २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची एकूण संपत्ती ३ हजार ३८३ कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. त्यावेळी ते राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले होते. एवढी संपत्ती आणि राजकीय पद असूनही त्यांनी अध्यात्मिक गुरूंच्या सांगण्यावरून रस्त्यावर उतरून घेतलेला हा अनुभव सध्या विशेष चर्चेत आला आहे.