Manoj Jarange Maratha Quota Protest: मुंबई पोलिसांनी नाकारली परवानगी, तरीही जरांगे आंदोलनावर ठाम

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील
आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील

 

मुंबई 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत उपोषण करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आपण एकटेच मुंबईकडे रवाना होणार असून आझाद मैदानावर आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. जालन्यातील अंतरावाली सराटी गावात उपोषणाच्या १६ व्या दिवशी त्यांनी ही भूमिका जाहीर केली.

मुंबई पोलिसांनी १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या अनिश्चितकालीन उपोषणाला गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची कारणे देत परवानगी नाकारली होती. यावर भाष्य करताना जरांगे म्हणाले की, सरकारने मराठा समाजाच्या ताकदीला घाबरून ही परवानगी नाकारली आहे. गणेशोत्सवात कोणताही गोंधळ होऊ नये आणि मराठा समाजावर त्याचा आळ येऊ नये म्हणून आपण इतर समर्थकांना एकत्र न येण्याचे आवाहन केले असून, केवळ १० सहकारी आणि दोन रुग्णवाहिकांसह मुंबईकडे निघणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुनर्वचिाराचे आवाहन

दुसऱ्या बाजूला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांना गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलन करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकार आणि जरांगे यांच्यातील संवादाचे दरवाजे कायम उघडे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, जरांगे यांच्या बहुतांश मागण्यांवर सरकारने सकारात्मक पावले उचलली आहेत. काही मागण्या न्यायालयात आणि इतर घटनात्मक मंचांवर प्रलंबित आहेत. कायदेशीर आणि घटनात्मक चौकटीबाहेर जाऊन सरकार निर्णय घेऊ शकत नाही. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने भाविक रस्त्यावर असतात, अशा वेळी आंदोलन झाल्यास नागरिकांची गैरसोय होऊ शकते, त्यामुळे यावर पुनर्विचार व्हावा, असे फडणवीस म्हणाले.

कुणबी दाखले आणि आंदोलनाची पुढील दिशा

मराठा समाजाला जुन्या नोंदी आणि गॅझेटच्या आधारे इतर मागासवर्गीय (OBC) श्रेणीतून कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी शासन निर्णय (GR) जारी करावा, ही जरांगे यांची मुख्य मागणी आहे. मात्र या मागणीला ओबीसी संघटनांकडून विरोध होत आहे.

आपली प्रकृती खालावलेली असतानाही वैद्यकीय उपचार घेण्यास नकार देत जरांगे यांनी आंदोलनाचा लढा सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. "सरकारशी कोणत्याही मोकळ्या मैदानात चर्चा करायला आम्ही तयार आहोत, परंतु आम्हाला पोकळ आश्वासने नको तर थेट अंमलबजावणी हवी आहे," असे सांगत त्यांनी राजकीय नेत्यांना आगामी निवडणुकांमध्ये मराठा समाज आपले मत दाखवून देईल असा इशारा दिला.