BRICS Summit 2026: ध्रुवीकृत जगातही भारताने साधला संवाद, जयशंकर यांनी मांडले यशाचे सूत्र

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 54 m ago
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर

 

नवी दिल्ली:

सध्या संपूर्ण जग दोन मोठ्या युद्धांमुळे (रशिया-युक्रेन आणि पश्चिम आशिया) दुभंगलेले आणि ध्रुवीकृत (Polarised) झालेले आहे. अशा या तणावपूर्ण वातावरणातही भारताने आपल्या यजमानपदाखाली पार पडलेल्या 'ब्रिक्स' (BRICS) शिखर परिषदेत ऐतिहासिक एकमत घडवून आणले आहे. भारताच्या या मोठ्या राजनैतिक यशाची माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. अनेक देशांचे एकमेकांशी असलेले तीव्र मतभेद बाजूला ठेवून सर्वांना एकाच मंचावर आणण्यात आणि 'नवी दिल्ली जाहीरनामा' मंजूर करण्यात भारताने खऱ्या अर्थाने बाजी मारली आहे.

पश्चिम आशियाचा गुंता आणि इराण-युएई तडजोड

जयशंकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, या परिषदेतील सर्वात कळीचा आणि अवघड मुद्दा होता तो 'पश्चिम आशियातील संघर्ष'. 'ब्रिक्स'चे नवे सदस्य असलेल्या इराण आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) या दोन्ही देशांनी सुरुवातीला अत्यंत ताठर भूमिका घेतली होती. इराणला अमेरिकेचा आणि इस्रायलचा कडक निषेध हवा होता, तर युएईला इराणच्या हल्ल्यांचा निषेध नोंदवायचा होता. मात्र, भारताच्या यशस्वी मध्यस्थीमुळे आणि मॅरेथॉन चर्चेनंतर, या दोन्ही देशांनी तडजोड केली आणि शांतता, सुरक्षा आणि जागतिक व्यापार सुरळीत ठेवण्यावर भर देणाऱ्या 'नवी दिल्ली जाहीरनाम्या'वर सर्वसंमती दर्शवली. विशेष म्हणजे, हे एकमत टिकवण्यासाठी या जाहीरनाम्यात अमेरिकेचा थेट उल्लेख करणे हुशारीने टाळण्यात आले आहे.

दहशतवादावर 'झीरो टॉलरन्स' आणि पहलगाम हल्ल्याचा निषेध

या परिषदेतील आणखी एक मोठे यश म्हणजे दहशतवादाच्या मुद्द्यावर ब्रिक्स देशांनी घेतलेली कडक भूमिका. जयशंकर यांनी आवर्जून सांगितले की, "ब्रिक्सने अत्यंत स्पष्ट केले आहे की दहशतवादाचे कोणतेही कृत्य हे गुन्हेगारी स्वरूपाचेच आहे. विशेष म्हणजे, एप्रिल २०२५ मध्ये झालेल्या 'पहलगाम दहशतवादी हल्ल्या'चा या जाहीरनाम्यात थेट उल्लेख करून त्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे". दहशतवादाचा सामना करताना कोणतीही 'दुटप्पी भूमिका' खपवून घेतली जाणार नाही, हा कडक संदेश या परिषदेतून जगाला देण्यात आला आहे.

'ग्लोबल साऊथ'चा आवाज आणि नेत्यांचा मोकळा संवाद

या परिषदेत तब्बल ३२ शिष्टमंडळे उपस्थित होती. यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान आणि अबुधाबीचे क्राऊन प्रिन्स यांच्यासारख्या जागतिक नेत्यांचा समावेश होता. जयशंकर म्हणाले की, जे नेते एरवी कदाचित कधीच भेटले नसते, ते या परिषदेच्या निमित्ताने एकत्र आले आणि त्यांच्यात चांगल्या चर्चा झाल्या. विशेषतः इराणचे राष्ट्राध्यक्ष आणि अबुधाबीचे क्राऊन प्रिन्स यांची मंचाबाहेर झालेली द्विपक्षीय भेट ही जागतिक राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.

या परिषदेचा मुख्य अजेंडा 'ग्लोबल साऊथ'च्या अर्थव्यवस्था, विकास आणि तंत्रज्ञान यावर केंद्रित होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला 'संवाद, मुत्सद्देगिरी आणि विकास' (Dialogue, Diplomacy and Development) हा संदेश जगभरात पोहोचला आहे, असे जयशंकर म्हणाले.

"अनेकांना वाटले होते की या अटीतटीच्या काळात हे शक्य होणार नाही, पण नवी दिल्लीत मोदींच्या नेतृत्वाखाली हे यशस्वीरित्या घडले," अशा शब्दांत जयशंकर यांनी या ऐतिहासिक परिषदेचा अभिमानाने गौरव केला.