नवी दिल्ली
रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या बहुप्रतिक्षित 'रामायण' चित्रपटातील पहिले गाणे 'जय जय राम' अधिकृतपणे लाँच करण्यात आले आहे. ऑस्करविजेते संगीतकार ए. आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलेल्या या भक्तीमय गाण्याला पार्श्वगायक अरिजित सिंग आणि श्रेया घोषाल यांनी स्वरबद्ध केले आहे, तर या गाण्याचे बोल प्रसिद्ध कवी डॉ. कुमार विश्वास यांनी लिहिले आहेत.
हे दोन भागांत येणाऱ्या भव्य महाकाव्यात्मक चित्रपटातील पहिलेच गाणे असून, गाण्याची सुरुवात श्रीराम आणि सीता यांच्या विवाह सोहळ्याने होते. तसेच अयोध्येत रथातून प्रवास करताना राम-सीतेवर ग्रामस्थ फुलांचा वर्षाव करत असल्याचे दृश्य यात पाहायला मिळते. नितेश तिवारी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
या गाण्याविषयी बोलताना संगीतकार ए. आर. रहमान म्हणाले की, एका प्रार्थनेची पवित्रता आणि आपुलकी जपत त्याला सिनेसंगीताची भव्यता देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. 'जय जय राम' ही श्रीरामाच्या नामाची एक सोपी पण अत्यंत शक्तिशाली पुनरावृत्ती आहे. डॉ. कुमार विश्वास यांच्या शब्दांना अरिजित सिंग आणि श्रेया घोषाल यांनी आपल्या भावनांची सुरेल जोड दिली आहे. हे गाणे श्रोत्यांना शांतता आणि श्रीरामाशी एक व्यक्तिगत नाते जोडण्याची अनुभूती देईल.
चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा यांनी सांगितले की, श्रीराम हे भारतीय संस्कृतीचे आणि पिढ्यानपिढ्यांचे मार्गदर्शक राहिले आहेत. 'रामायण' चित्रपटाची खरी ताकद ही त्याच्या भावना, मूल्ये आणि भक्तीमध्ये आहे. या गाण्याच्या माध्यमातून श्रीरामांचे रक्षक आणि शक्तीचे स्त्रोत म्हणून स्मरण करण्यात आले आहे.
गाण्याचे गीतकार डॉ. कुमार विश्वास म्हणाले की, 'जय जय राम' हे तीन सोपे शब्द असले तरी त्यात एक संपूर्ण प्रार्थना सामावलेली आहे. श्रीरामांचा महिमा केवळ शब्दांत मांडणे अशक्य आहे, त्यामुळे प्रत्येक भक्ताचे त्यांच्याशी असलेले मार्गदर्शक, शक्ती आणि आश्रयस्थान म्हणून असणारे नाते या गाण्यातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. प्राइम फोकस स्टुडिओ आणि मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स निर्मित या चित्रपटात यश (रावण), सनी देओल (हनुमान), रवी दुबे (लक्ष्मण) आणि अरुण गोविल (दशरथ) यांच्या प्रमुख भूमिका आहेत.