१४ महिन्यांच्या गार्गीसाठी वाघोलीच्या मुस्लिमांनी दिला मदतीचा हात

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
पुण्याच्या वाघोलीतील जामा मशिदीत १४ महिन्यांच्या गार्गी जाधव हिच्या उपचारासाठी दुआ आणि आर्थिक मदत करताना मुस्लिम समाज
पुण्याच्या वाघोलीतील जामा मशिदीत १४ महिन्यांच्या गार्गी जाधव हिच्या उपचारासाठी दुआ आणि आर्थिक मदत करताना मुस्लिम समाज

 

भक्ती चाळक

माणुसकीला कुठलाही धर्म नसतो. संकटाच्या वेळी मदतीला धावून येणारी माणसेच ईश्वराचे खरे रूप असतात, याची प्रचिती नुकतीच पुण्याच्या वाघोलीत पाहायला मिळाली. अवघ्या १४ महिन्यांच्या चिमुकल्या गार्गी जाधव हिच्या आयुष्याची झुंज सुरू असताना, वाघोलीतील जामा मस्जिदीने संवेदनशील मनाने आदर्शवत पुढाकार घेतला आहे.

१० कोटींचे आव्हान 
वैद्यकीय क्षेत्रापुढे आज अनेक दुर्मिळ आजारांचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या कठीण आजारांना लहान बालकेच अधिक प्रमाणात बळी पडतात. दुर्मिळ आजारांच्या निदानासाठी अपुऱ्या यंत्रणा, सरकारचे कमजोर धोरण आणि औषध उत्पादक मोजकेच असल्यामुळे या औषधांच्या किमती सर्वसामान्य कुटुंबाच्या अवाक्याबाहेर असतात. या सर्व कारणांमुळे आजाराने ग्रस्त रुग्णांच्या कुटुंबाला कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागते. 

अशाच एका भयंकर संकटाशी पुण्याच्या वाघोलीत राहणारे जाधव कुटुंब सध्या दोन हात करत आहे. त्यांची १४ महिन्यांची गोंडस मुलगी गार्गी सध्या ‘स्पायनल मस्कुलर ॲट्रॉफी टाईप १’ (SMA Type 1) या दुर्मिळ आजाराशी लढत आहे. गार्गीच्या या कठीण लढ्याची माहिती मिळताच वाघोलीतील मुस्लिम समाजाने तात्काळ मदतीचा हात पुढे केला.

वाघोली मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन आणि जामा मशिदीच्या विश्वास्तांनी या चिमुकल्या लेकीचा प्राण वाचवण्यासाठी पुढाकार घेतला. शुक्रवारी जुमाच्या नमाजाच्या वेळी मशिदीत आलेल्या शेकडो भाविकांना गार्गीच्या उपचारासाठी आर्थिक मदत करण्याचे आणि तिच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन करण्यात आले.

या सामाजिक बांधिलकीबद्दल बोलताना जामा मशिदीचे चेअरमन जानमोहोम्मद पठाण (निवृत्त एसीपी) यांनी ‘आवाझ-द-व्हॉईस’शी बोलताना आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “आमची संस्था अनेक वर्षांपासून जातीपातीचा विचार न करता काम करत असते. गरजू विद्यार्थ्यांना मदत असो वा रक्तदान, आम्ही नेहमी पुढे असतो.”

गार्गीच्या मदतीबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले, “गार्गीच्या आजाराबद्दल समजल्यावर एका निष्पाप बालिकेचा जीव वाचवणे हेच खरे मानवाचे कर्तव्य आहे, या नात्याने आम्ही पुढाकार घेतला. जुमाच्या नमाजासाठी येणाऱ्या प्रत्येक बांधवाला मदत करण्याचे आणि अल्लाकडे गार्गीसाठी दुआ मागण्याचे आवाहन केले.”

मदतीच्या रकमेबद्दल सांगताना ते म्हणाले, “आमच्या सर्व बांधवांच्या सहकार्यातून आम्ही ३५ हजार गोळा करून तिच्या उपचारासाठी आमचा छोटासा खारीचा वाटा उचलला आहे.”

चिमुकल्या गार्गीचा कठीण लढा
मूळचे अहिल्यानगरचे असलेले आणि सध्या पुण्याच्या वाघोलीतील आयव्ही स्टेट परिसरात राहणारे संदीप जाधव यांची गार्गी ही एकुलती एक मुलगी आहे. या दुर्मिळ विकारात शरीरातील एक महत्त्वाचे जनुक गायब असते. यामुळे शरीराच्या हालचालीसाठी लागणारे आवश्यक प्रोटीन तयार होत नाही. परिणामी बाळाच्या शरीराची हालचाल पूर्णपणे थांबते, मान पकडता येत नाही आणि संपूर्ण स्नायू निष्प्रभ होतात.

गार्गीची ही अवस्था पाहून पालकांनी तातडीने मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयातील नामांकित डॉ. नीलू देसाई यांच्याशी संपर्क साधला. डॉक्टरांनी तपासणी करून यावर झोलगेन्समा नावाचे अत्यंत महागडे इंजेक्शन देण्याचा सल्ला दिला. या एकाच इंजेक्शनची किंमत तब्बल १० कोटी रुपयांच्या घरात आहे.

एवढी अथांग रक्कम उभी करणे कोणत्याही सामान्य कुटुंबासाठी अशक्यच. त्यामुळे जाधव कुटुंबाने क्राउड फंडिंगद्वारे पैसे गोळा करण्यास सुरुवात केली. दात्यांच्या सहकार्याने आतापर्यंत साडेपाच कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. उर्वरित साडेचार कोटी रुपये जमा करण्यासाठी हे कुटुंब अजूनही रात्रंदिवस धडपडत आहे.

जामा मस्जिदीच्या उपक्रमावर वडिलांची कृतज्ञता
मस्जिदीत एकत्र येऊन मुस्लिमांनी गार्गीसाठी केलेली प्रार्थना आणि दिलेली आर्थिक मदत पाहून गार्गीचे वडील संदीप जाधव ‘आवाझ-द-व्हॉईस’शी बोलताना कमालीचे भावुक झाले.

आपल्या भावना व्यक्त करताना संदीप जाधव म्हणाले, “सकाळी वाघोलीच्या जामा मस्जिदीमधील तो व्हिडिओ पाहिला आणि माझे मन भरून आले. मस्जिदीतील सर्व मुस्लिम बांधवांचे मी मनापासून आभार मानतो. महाराष्ट्रातील प्रत्येक मंदिर, मस्जिद किंवा चर्चने असा मदतीचा हात पुढे केला, तर ती मदत माझ्या लेकीसाठी मोठी मदत होईल.”

एका बाजूला वैद्यकीय उपचारांचा प्रचंड खर्च आणि सरकारी धोरणांमधील त्रुटींमुळे नागरिक त्रस्त असताना, अशा प्रकारे सामान्य लोकांनी एकत्र येत एकमेकांना दिलेला आधार हाच समाजाचा मुख्य कणा आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter