नवी दिल्ली
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणात केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (CBI) अधिकृतपणे गुन्हा (FIR) दाखल केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर आणि मुंबई पोलिसांच्या तपासावर गंभीर ताशेरे ओढल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. गेल्या ६ वर्षांपासून या घटनेची केवळ अकस्मात मृत्यू (ADR) म्हणून नोंद ठेवून सखोल तपास न केल्याबद्दल न्यायालयाने मुंबई पोलिसांना झापले होते. पोलिसांच्या तपासात उत्तरांपेक्षा प्रश्नच जास्त निर्माण होत असल्याचे सांगत न्यायालयाने तपासातील अनेक त्रुटींवर बोट ठेवले होते.
दिशा सालियन हिचा ८ जून २०२० रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका निवासी इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. त्यावेळी मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. या घटनेच्या अवघ्या एका आठवड्यानंतर, १४ जून २०२० रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मृतदेह वांद्रे येथील त्याच्या अपार्टमेंटमध्ये आढळला होता. या दोन्ही मृत्यूंचा परस्परांशी संबंध असल्याच्या चर्चांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
त्यानंतर झालेल्या व्यापक मागणीनंतर महाराष्ट्र सरकारने सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. सीबीआयने या प्रकरणात सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळेच झाल्याचा निष्कर्ष काढून क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला आहे, ज्यावर अद्याप सुनावणी प्रलंबित आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने दिशा सालियन मृत्यू प्रकरणातही स्वतंत्र एफआयआर नोंदवून सखोल तपासाला सुरुवात केली आहे.