Ashadi Wari 2026 : पुणेकर मुस्लिम करतायेत वारकऱ्यांची अविरत सेवा

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 15 h ago
पुण्यातील मुस्लिमांकडून वारकऱ्यांची मनोभावे सेवा
पुण्यातील मुस्लिमांकडून वारकऱ्यांची मनोभावे सेवा

 

भक्ती चाळक 

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या मातीला संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत चोखामेळा अशा अनेक संतांच्या विचारांचा वारसा लाभला आहे. या सर्व संतांनी जगाला सर्वधर्मसमभाव आणि माणुसकीचा संदेश दिला आहे. याच संतांच्या विचारांचा सर्वात मोठा सोहळा म्हणजे पंढरपूरची वार्षिक आषाढी वारी. 

दरवर्षी आषाढ महिन्यात लाखो वारकरी हातात टाळ-मृदंग घेऊन, डोक्यावर तुळशीवृंदावन ठेवून विठू माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने पायी निघतात. संपूर्ण महाराष्ट्रभरातून निघालेल्या या पालख्या पुण्यात मुक्कामी आल्यावर शहराचे रूप पूर्णपणे बदलून जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणेकर मुस्लिमांनी माणुसकीचा धर्म जपत वारकऱ्यांची सेवा केली आहे.

फुट मसाज आणि मोफत औषधोपचार
 
 
वारीमध्ये पायी चालणाऱ्या वारकरी बांधवांच्या पायाला फोड येतात, शरीर थकते. अशा वेळी त्यांच्या तात्काळ आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी 'वर्क चॅरिटेबल ट्रस्ट' आणि 'लव्ह शेअर अँड केअर फाउंडेशन' एकत्र आले. या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने रास्तापेठेतील संत गाडगे महाराज मठ येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात वैद्यकीय तज्ज्ञांच्या एका पथकाने वारकऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली. वारकऱ्यांना जागेवरच वैद्यकीय सल्ला देऊन मोफत औषधोपचार पुरवण्यात आले. या शिबिरात डॉ. आरिफ शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वारकऱ्यांवर अत्यंत काळजीपूर्वक वैद्यकीय उपचार केले.

दीर्घ प्रवासामुळे वारकऱ्यांच्या शरीरावर खूप ताण येतो. हीच बाब लक्षात घेऊन या शिबिरात एक विशेष फुट मसाज कक्ष सुरू करण्यात आला होता. सततच्या पायी चालण्यामुळे थकलेल्या आणि पायाच्या वेदनांनी व्याकुळ झालेल्या वारकऱ्यांना आराम मिळावा म्हणून ही सर्व धडपड सुरू होती. इथे तज्ज्ञांमार्फत मसाज थेरपीची उत्तम सेवा देण्यात आली. डी. वाय. पाटील नर्सिंग कॉलेजच्या स्वयंसेवकांनी अत्यंत आदराने आणि नम्रतेने वारकऱ्यांना ही फुट मसाज थेरपी सेवा दिली.

या प्रसंगी बोलताना ओवेस अन्सारी यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, "प्रेषित मोहम्मद यांच्या शिकवणीतून आम्हाला ही प्रेरणा मिळाली आहे. लोकांच्या वेदना दूर करणे आणि त्यांना त्रासातून मुक्त करणे हीच मानवतेची सर्वात मोठी सेवा मानली गेली आहे. आजच्या काळात अशी सेवा करणे ही काळाची गरज आहे."

या संपूर्ण शिबिराचे नेटके नियोजन आणि उत्तम व्यवस्था वर्क चॅरिटेबल ट्रस्टचे पुणे प्रमुख वसीम शेख, तसेच लव्ह शेअर अँड केअर फाउंडेशनचे पियुष शाह आणि आकाश भालिया यांनी सांभाळली. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे सर्व वारकऱ्यांना वेळेत आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सेवा मिळाली.

हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अल्पोपहार
 
 
पुण्यातील दुसरी कौतुकास्पद घटना म्हणजे 'पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्ट' आणि 'सामाजिक उद्धार संस्था' यांनी घेतलेला पुढाकार. या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने वारकऱ्यांसाठी अल्पोपहार वाटपाचा उत्तम कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आषाढी वारीनिमित्त पुण्यातून मार्गक्रमण करणाऱ्या हजारो वारकऱ्यांच्या सेवेसाठी हा उपक्रम राबवण्यात आला.

या उपक्रमात पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष जुबेर रशीद खान, सामाजिक उद्धार संस्थेचे अध्यक्ष सिराज खान, सत्तार शेख, तसेच जमीयतुल अन्सार ट्रस्टचे उपाध्यक्ष जाफर शेख, शाहिद शेख, सिद्दीक शेख, गौस शेख, चांद शेख आणि चामडे गल्लीतील सर्व मुस्लिम युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि सर्वांनी मिळून हा कार्यक्रम यशस्वी केला.

यावेळी वारकऱ्यांचे अत्यंत प्रेमाने स्वागत करत त्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील "अल्ला देवे, अल्ला दिलावे..." हा समतेचा आणि मानवतेचा संदेश यावेळी उपस्थितांसमोर मांडण्यात आला. हिंदू-मुस्लिम एकता, सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. वारकऱ्यांसह स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले. 

गणेश पेठेतील खान कुटुंबाची पाच वर्षांची अविरत सेवा
मध्यवर्ती भागात असलेल्या गणेश पेठेतूनही अशीच एक प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. लाखो वारकरी जेव्हा पंढरपूरच्या दिशेने प्रवास करतात, तेव्हा शहराच्या कानाकोपऱ्यातून निस्वार्थी सेवेची उदाहरणे पाहायला मिळतात. गणेश पेठेतील खान कुटुंब गेल्या ५ वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा अत्यंत भक्तीभावाने करत आहे. ते वारकऱ्यांना चहा, नाश्ता आणि उत्तम आदरातिथ्य पुरवत आहेत.

हे खान कुटुंब गणेश पेठेत राहते. आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ही सेवा सुरू केली होती. तेव्हापासून दरवर्षी पालखी सोहळा त्यांच्या घराबाहेरून जाताना ते ही परंपरा न चुकता पाळतात. या कुटुंबातील सदस्य सिकंदर खान यांनी या सेवेबद्दल आपले मत मांडले. ते म्हणाले, "आमच्या वडिलांनी ही सेवा सुरू केली होती आणि गेली पाच वर्षे आम्ही ती पुढे चालू ठेवली आहे. पालखीचा मार्ग आमच्या घराजवळूनच जात असल्यामुळे वारकऱ्यांची सेवा करणे आणि त्यांचे स्वागत करणे ही आमची जबाबदारी आहे, असे आम्हाला वाटते."

येरवड्यात १९३२ पासून सुरू असलेली परंपरा 
 
 
दरवर्षी लाखो वारकरी जेव्हा संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या नावाचा गजर करत पुण्यात प्रवेश करतात. अशावेळी येरवड्यातील उद्योजक इकराम खान आपल्या कुटुंबासह वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज असतात. यंदाही त्यांनी वारकऱ्यांसाठी जेवण, पिण्याचे पाणी, अल्पोपहार आणि इतर आवश्यक सुविधांची उत्तम सोय केली होती. शेकडो स्वयंसेवकांनी हजारो वारकऱ्यांना आनंदाने अन्नदान केले.

इकराम खान यांच्या कुटुंबाचा वारीसोबतचा हा संबंध आजचा नाही, तर तो तब्बल ९४ वर्षे जुना आहे. १९३२ मध्ये इकराम खान यांचे आजोबा मोसा खान यांनी पंढरपूर वारीतील वारकऱ्यांची सेवा करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांचे वडील ईसा खान यांनी ही परंपरा पुढे चालवली. ईसा खान यांनी केवळ वारीतच नव्हे, तर रामवाडी येथील राम मंदिरात होणाऱ्या वार्षिक रामनवमी उत्सवातही नेहमी सक्रिय सहभाग घेतला. यातून त्यांनी सामाजिक सलोख्याचा एक मजबूत पाया रचला.

आज या कुटुंबाची तिसरी पिढी हीच मूल्ये जपत पुढे जात आहे. इकराम खान आणि त्यांचा मुलगा अहद इकराम खान यांनी ही दशकांची जुनी परंपरा सुरु ठेवली आहे. ते वारकऱ्यांची सेवा करण्यासोबतच विविध सामाजिक उपक्रमांनाही नेहमी पाठिंबा देतात. 

आपल्या या परंपरेविषयी बोलताना इकराम खान भावूक होऊन सांगतात, "वारकऱ्यांची सेवा करणे ही केवळ आमची परंपरा नाही, तर आमच्या पूर्वजांनी आमच्या हाती सोपवलेली एक मोठी जबाबदारी आहे. माणुसकीची शिकवण माझ्या आजोबांनी आम्हाला दिली. या परंपरेने आमच्या कुटुंबाला पिढ्यानपिढ्या एकत्र ठेवले आहे आणि आमची तिसरी पिढी ही परंपरा पुढे नेत असल्याचा आम्हाला अभिमान आहे."

'टीम एसआरके पुणे'कडून पालखी सोहळ्यात अल्पोपहाराचे वाटप
 
 
आळंदी ते पंढरपूर असा शेकडो किलोमीटरचा प्रवास हे वारकरी अत्यंत श्रद्धेने करत असतात. या खडतर प्रवासात वारकरी बांधवांना थोडा विसावा मिळावा आणि त्यांना मदत व्हावी, यासाठी 'टीम एसआरके'च्या सदस्यांनी एकत्र येत अनोखा उपक्रम राबवला. 'टीम एसआरके पुणे'च्या वतीने वारीतील वारकऱ्यांसाठी चहा, पाणी आणि अल्पोपहार वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. 

या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अर्थपूर्ण मोहिमेचा भाग व्हायला मिळाल्याबद्दल टीम एसआरके पुणेच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात आला आहे. पंढरपूरच्या दिशेने कूच करणाऱ्या प्रत्येक वारकरी बांधवाचा हा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि शांततेचा जावो, अशी सदिच्छाही यावेळी टीमच्या वतीने व्यक्त करण्यात आली. या उपक्रमाचे वारकऱ्यांसह स्थानिक नागरिकांकडूनही कौतुक होत आहे.

मुस्लिम उपसरपंचाकडून तुकोबांच्या पालखीवर फुलांचा वर्षाव 
पुणेच्या हवेली तालुक्यातील कदमवाकवस्तीचे उपसरपंच नासिर पठाण आणि त्यांच्या कुटुंबाने संत तुकाराम महाराजांच्या पालखीवर झेंडूंच्या फुलांचा वर्षाव केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. 

अनेक वर्षानुवर्षे राबवत असलेल्या पुण्यातील मुस्लिमांच्या या उपक्रमांचे स्थानिक नागरिक, वारकरी आणि विविध सामाजिक संघटनांकडून कौतुक होत असते. त्यांच्या निस्वार्थी सेवावृत्तीला आणि संतांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या या प्रयत्नांना संपूर्ण महाराष्ट्राचा मानाचा मुजरा.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter